व्हॅटिकन सिटी, – : रोमन कॅथलिक चर्चचे २६६ वे सर्वोच्च धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे सोमवारी निधन झाले. ते ८८ वर्षांचे होते. जगातील सर्वात मोठ्या धर्मसंघटनेतील — १.४ अब्ज कॅथलिक ख्रिश्चन धर्मीयांचे — ते आध्यात्मिक प्रमुख होते.
पोप फ्रान्सिस यांनी २०१३ मध्ये पोपपदी विराजमान होत नम्रता, दयाळूपणा आणि चर्चमधील सुधारणांना प्रोत्साहन देणाऱ्या नेतृत्वाची नवी दिशा दिली होती. रविवारी, २० एप्रिल रोजी, त्यांनी ईस्टर संडे च्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती आणि अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स यांची भेट घेतली होती.
मात्र, मागील काही महिन्यांपासून ते प्रकृती अस्वास्थ्याने त्रस्त होते. मार्च महिन्यात त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तात्पुरत्या उपचारानंतर प्रकृतीत सुधारणा झाली होती, परंतु काल अखेर त्यांनी आपला अखेरचा श्वास घेतला.

व्हॅटिकन सिटीने त्यांच्या निधनाची अधिकृत घोषणा केली असून, परंपरेनुसार पुढील धार्मिक विधी सुरू झाले आहेत. पोप फ्रान्सिस यांचे पार्थिव त्यांच्या खाजगी चॅपलमध्ये हलवण्यात आले आहे. व्हॅटिकन परंपरेनुसार, त्यांना पांढऱ्या कॅसॉकमध्ये सजवले जाईल आणि त्यांच्या पार्थिवाला जस्त आणि लाकडी शवपेटीत ठेवले जाईल. त्यानंतर त्यांना विशेष लाल रंगाचा पोशाख परिधान करण्यात येईल. तसेच, पोपची अधिकृत सही विशिष्ट पद्धतीने तोडली जाईल.
पोप फ्रान्सिस यांच्या निधनानंतर व्हॅटिकनमध्ये नऊ दिवसांचा शोक पाळला जाणार आहे, तर इटलीत राष्ट्रीय शोक जाहीर करण्यात येईल.
परंपरेनुसार, पोपच्या निधनानंतर सुमारे १५ ते २० दिवसांत कॉलेज ऑफ कार्डिनल्सची बैठक होणार असून, त्यात पुढील पोपची निवड केली जाईल.