Prayagraj Magh Mela 2026: प्रयागराज : प्रयागराज येथील पवित्र त्रिवेणी संगमावर शुक्रवारपासून माघ मेळा-२०२६चा अत्यंत भक्तिभावात आणि उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला. पौष पौर्णिमा या पहिल्या मुख्य स्नान पर्वाच्या निमित्ताने गंगा, यमुना आणि सरस्वतीच्या संगमावर पुण्यस्नानासाठी देशभरातून लाखो भाविकांनी हजेरी लावली. भाविकांच्या प्रचंड उपस्थितीमुळे संगम परिसरात श्रद्धेचा जनसागर उसळला होता. प्रशासनाने केलेल्या काटेकोर नियोजनामुळे हे पहिले स्नान पर्व शांततेत आणि सुव्यवस्थित पद्धतीने पार पडले.
४४ दिवस चालणारा भक्तिसोहळा
यंदाचा माघ मेळा ३ जानेवारीपासून सुरू झाला असून तो १५ फेब्रुवारी २०२६ रोजी महाशिवरात्रीपर्यंत चालणार आहे. पहाटेपासूनच भाविकांनी संगम तटाकडे गर्दी केली होती. कडाक्याच्या थंडीची पर्वा न करता अबालवृद्ध भाविकांनी श्रद्धेने संगमात पवित्र स्नान केले. ४४ दिवस चालणाऱ्या या मेळ्यात कल्पवास, विविध धार्मिक विधी, यज्ञ, प्रवचन आणि संतांचे सत्संग आयोजित करण्यात आले आहेत. देशभरातून आलेले साधू-संत, भाविक आणि कल्पवासी मेळ्याच्या आध्यात्मिक वातावरणात सहभागी झाले आहेत.
सुरक्षेसाठी एआय आणि ड्रोनचा वापर
मेळ्याची भव्यता आणि अपेक्षित गर्दी लक्षात घेता यंदा सुरक्षा व्यवस्थेत आधुनिक तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आला आहे. संपूर्ण मेळा क्षेत्रात ४०० हून अधिक आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) युक्त सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. गर्दी नियंत्रण आणि वाहतुकीवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोनद्वारे सतत नजर ठेवली जात आहे. जलसुरक्षेसाठी एनडीआरएफ (NDRF) आणि एसडीआरएफ (SDRF) चे जवान तैनात असून, दहशतवाद विरोधी पथक (ATS) आणि बॉम्ब शोधक-नाशक पथक (BDS) कडूनही नियमित तपासणी सुरू आहे.
पोलिसांना विशेष प्रशिक्षण
अतिरिक्त पोलीस आयुक्त अजय पाल शर्मा यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, “पहिल्या स्नान पर्वासाठी आम्ही पूर्णतः सज्ज होतो. केवळ तंत्रज्ञानावरच नव्हे, तर प्रत्यक्ष मैदानातही आमचे जवान सक्रिय आहेत. मेळ्यासाठी तैनात प्रत्येक पोलीस कर्मचाऱ्याला महिनाभराचे विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. गर्दी व्यवस्थापन आणि आपत्ती व्यवस्थापनात हे जवान प्रशिक्षित असून भाविकांचा प्रवास सुरक्षित आणि सुखकर व्हावा, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”
मेळा क्षेत्राचे विविध सेक्टरमध्ये विभाजन करण्यात आले असून प्रत्येक सेक्टरमध्ये पुरेशी पोलीस कुमक तैनात करण्यात आली आहे. प्रशासनाच्या या नियोजनाबद्दल भाविकांनी समाधान व्यक्त केले आहे. आगामी स्नान पर्वेही शांततेत आणि भक्तिभावात पार पडावीत, यासाठी प्रशासन सज्ज असल्याचे सांगण्यात आले आहे.


