‘मराठी कलांचा, गुणांचा प्रतिभा प्रशंसा सोहळा…’ अशी बिरुदावली मिरवणाऱ्या ‘आर्यन्स सन्मान चित्रपट-नाटक २०२४’ पुरस्कार सोहळ्याची घोषणा करण्यात आली आहे. मागच्या वर्षाप्रमाणे यंदाही हा पुरस्कार सोहळा भव्य-दिव्य स्वरूपात संपन्न होणार आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने मराठी नाटक-चित्रपट क्षेत्रातील अभिनेते-अभिनेत्री-तंत्रज्ञ एकत्र येणार आहेत. ‘आर्यन्स सन्मान चित्रपट-नाटक २०२४’ मध्ये सहभागी होण्याकरीता नाटक-चित्रपट निर्मात्यांना प्रवेश अर्ज भरून आपल्या कलाकृतीची एन्ट्री पाठवता येईल.
सध्या पुण्यातून विविध क्षेत्रात ‘आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीज्’ आपला विस्तार करीत आहे. आर्यन्स ग्रुप ऑटोमोबाईल, पेट्रोकेमिकल्स, सोलर पॉवर, गोल्ड रिफायनरी, हॉस्पिटॅलिटी, ग्रीन एनर्जी, एव्हिएशन, फार्मास्युटिकल्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, फायनान्स आणि ॲग्रिकल्चर अशा विविध क्षेत्रात कार्यरत आहे. पुण्यामधून आर्यन्स ग्रुप लवकरच मराठी वृत्तवाहिनी, मनोरंजन वाहिनी, क्रीडा वाहिनी आणि ओटीटी प्लॅटफॉर्मद्वारे मिडीया आणि मनोरंजनाच्या क्षेत्रात पदार्पण करीत आहे. यामुळे पुणे परिसरातील कलाकार, तंत्रज्ञ, निर्माते यांनाही आर्यन्स परिवारात सामावून घेता येणार आहे.
‘आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीज’च्या माध्यमातून विविध स्तरांवर वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. मनोरंजन विश्वातील सिनेमा-नाटक आणि मराठी कलागुणांना हक्काचे व्यासपीठ मिळावे या उद्देशाने मागील वर्षापासून आर्यन्स सन्मान चित्रपट-नाटक पुरस्कार सोहळ्याची सुरुवात करण्यात आली आहे. यंदाचे हे पुरस्काराचे दुसरे वर्ष आहे. इतर मोठमोठ्या पुरस्कार सोहळ्यांमध्ये विजेत्यांना केवळ ट्रॅाफी दिली जाते, पण राज्य सरकारच्या पुरस्कार सोहळ्याप्रमाणे ‘आर्यन्स सन्मान चित्रपट-नाटक २०२४’मध्येही विजेत्यांचा रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात येणार आहे. आर्यन्स ग्रुप च्या उत्तम नियोजनामुळे मागच्या वर्षी हा पुरस्कार सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला होता. या वर्षीही आर्यन्सची टिम ‘आर्यन्स सन्मान चित्रपट-नाटक २०२४’ सोहळ्यासाठी सज्ज झाली आहे.
‘आर्यन्स सन्मान चित्रपट-नाटक २०२४’ पुरस्कार सोहळ्यामध्ये एकूण २२ विभागांमध्ये मराठी चित्रपटांना पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येते. नाट्य विभागात १६ पुरस्कार दिले जातात. यंदा काही विभाग वाढवण्यात आले असून, पुरस्कारांची एकूण रक्कम १२.५० लाख रुपये करण्यात आली आहे. ९ ऑक्टोबर रोजी एका दिमाखदार नॅामिनेशन पार्टीमध्ये नामांकने घोषित करण्यात येतील आणि त्यानंतर नोव्हेंबर महिन्यात देखण्या पुरस्कार सोहळ्यात विजेत्यांना पुरस्कार प्रदान करण्यात येतील. या सोहळ्याला मराठी सिने व नाट्य विश्वातील तारे-तारकांची मांदियाळी अवतरणार आहे. दिनांक १ जून २०२३ ते दिनांक ३१ मे २०२४ या कालावधीत प्रदर्शित किंवा सेन्सॉर झालेल्या मराठी व्यावसायिक आणि प्रायोगिक नाटकांना तसेच चित्रपटांना पुरस्कार सोहळ्यात प्रवेश घेण्यासाठी अर्ज करता येणार आहे. अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली असून, १० सप्टेंबर २०२४ अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख असणार आहे. पुरस्कार सोहळ्यासाठी aaryanssanman.in या संकेतस्थळावर प्रवेश अर्ज उपलब्ध करण्यात आले आहे.