पुणे ः भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार उपक्रमांतर्गत आयोजित मोहिनीअट्टम आणि लावणी नृत्य कार्यक्रमाला प्रतिसाद मिळाला. इंडियन कौन्सिल फॉर कल्चरल रिलेशन्सतर्फे हा कार्यक्रम प्रस्तुत करण्यात आला.डॉ.माधुरी देशमुख-पाटील,राधिका अय्यर यांनी मोहिनीअट्टम सादर केले तर राजेंद्र केशवराव बडगे यांच्या सहकाऱ्यांनी गण,गोंधळ,मुजरा आणि दिलखेचक लावणी नृत्य सादर केले.
डॉ.माधुरी देशमुख -पाटील यांनी मोहिनी अट्टमची सुरुवात गणेश वंदनेने केली.नंतर ‘गीत गोविंद ‘ मधील अष्टपदी सादर केली. त्यानंतर त्यांनी कृष्णकाव्यम आणि महाभारतातील कुब्जा व्यक्तिरेखेवर आधारित पदम सादर केले.या प्रभावी सादरीकरणाला रसिकांनी दाद दिली.लावणी कार्यक्रमात देवयानी चांदवडकर,मृणाल कुलकर्णी-कांबळे,आरती पुणेकर यांनी बहारदार नृत्य केले.त्यांना किरण सोनवणे,चंद्रकांत लसनकुटे (संबळ) ,सागर दुपारगुडे (की बोर्ड), प्रमोद कांबळे, रोहन खळदकर (ढोलकी) , तेजस्विनी लोकरे (गायिका) , निलेश भंडारे (साईड रिदम) यांनी साथसंगत केली.’कैरी पाडाची’,’गं साजणी’,’नटले तुमच्यासाठी’,’विचार काय तुमचा ‘ अशा एकापेक्षा एक बहारदार लावण्यांनी उपस्थित मोहून गेले.
हा कार्यक्रम भारतीय विद्या भवनचे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह,(सेनापती बापट रस्ता) येथे झाला .हा कार्यक्रम विनामूल्य होता.भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सादर होणारा हा २०७ वा कार्यक्रम होता.भारतीय विद्या भवनचे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी प्रास्ताविक केले आणि कलाकारांचा सत्कार केला. इंडियन कौन्सिल फॉर कल्चरल रिलेशन्स(आयसीसीआर) चे विभागीय संचालक राज कुमार यांनी मनोगत व्यक्त केले.अनुप्रिता लेले- भिडे यांनी सूत्रसंचालन केले.