30.1 C
New Delhi
Friday, April 3, 2026
Homeमनोरंजनभारतमातामध्ये 'सुपर डुपर'चा जल्लोषात प्रीमिअर !

भारतमातामध्ये ‘सुपर डुपर’चा जल्लोषात प्रीमिअर !

मराठी चित्रपटसृष्टीच्या सुवर्णकाळाचा साक्षीदार ठरलेले भारतमाता चित्रपटगृह तब्बल सहा वर्षांनंतर पुन्हा नव्या दिमाखात सुरु झाले आणि या नव्या रूपाच्या अनावरणाचा मान मिळाला तो झी स्टुडिओजच्या ‘सुपर डुपर’ या बहुप्रतीक्षित मराठी चित्रपटाला! या ऐतिहासिक क्षणाचे औचित्य साधत नुकताच या चित्रपटाचा भव्य प्रीमिअर सोहळा भारतमाता येथे अत्यंत जल्लोषात आणि मराठमोळ्या थाटात पार पडला.

ढोल-ताशांच्या गजरात, पारंपरिक वातावरणात साजऱ्या झालेल्या या सोहळ्याने उपस्थितांच्या अंगावर अक्षरशः रोमांच उभे केले. मराठी संस्कृतीचा अभिमान आणि चित्रपटाचा उत्सव अशा दुहेरी स्वरूपात हा कार्यक्रम रंगला. यावेळी राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, फिल्म सिटी कॉर्पोरेशनचे सहव्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजणीकर, झी स्टुडिओजचे चीफ बिझनेस ऑफिसर उमेश कुमार बन्सल, झी स्टुडिओज मराठीचे व्यवसायप्रमुख बवेश जानवलेकर, सुपर डुपर चित्रपटातील कलाकार तंत्रज्ञ, निर्माते विजय शिंदे आणि नरेश बोर्डे यांच्यासह मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवर उपस्थित होते.

या प्रसंगी राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार म्हणाले की, ‘’भारतमाता’ हे माझ्यासाठी आजोळ आहे. या ठिकाणाशी अनेक भावनिक आठवणी जोडल्या गेल्या आहेत. हे केवळ एक चित्रपटगृह नाही, तर अनेक पिढ्यांच्या आठवणींचा जिवंत ठेवा आहे. मराठी माणसाच्या संस्कृतीचा आणि परंपरेचा वारसा लाभलेलं हे एक महत्त्वाचं केंद्र आहे. मराठी चित्रपटाचा पहिला प्रीमियर इथे आयोजित केल्याबद्दल मी झी स्टुडियोजचे मनःपूर्वक आभार मानतो. सिंगल स्क्रिनचे चित्रपटगृह चालवणं सोपं नाही, त्यामुळे ते सातत्याने सुरू राहावं, यासाठी मी सर्व मराठी प्रेक्षकांना हात जोडून विनंती करतो की, त्यांनी या ठिकाणाला आपला पाठिंबा आणि आशीर्वाद द्यावेत. ‘सुपर डुपर’च्या संपूर्ण टीमचं मी मनापासून अभिनंदन करतो. उत्कृष्ट कलाकार आणि चित्रपटाचं तंत्र जाणणाऱ्या या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा.’’

दिग्दर्शक समीर आशा पाटील म्हणाले, ‘’ आशिष शेलार सर जेव्हापासून सांस्कृतिक कार्य मंत्री झाले, तेव्हापासून सांस्कृतिक मंत्रालयात एक सकारात्मक चित्र निर्माण झालं आहे. मराठी मनोरंजन क्षेत्रासाठी ते करत असलेल्या विविध उपक्रमातून, त्यांच्या कामातून सतत प्रेरणा मिळत राहते. या सोहळ्याला त्यांची उपस्थित लाभली, ही आमच्यासाठी आनंदाची बाब आहे. ‘सुपर डुपर’ हा चित्रपटही तितकाच आनंद, प्रेम आणि उत्साह घेऊन प्रेक्षकांसमोर येत आहे आणि हा चित्रपट सुपर डुपर हिट ठरेल, अशी मनापासून अपेक्षा व्यक्त करतो.”

तर झी स्टुडिओज मराठीचे व्यवसाय प्रमुख बवेश जानवलेकर म्हणाले, ” ‘भारतमाता’ थिएटरमध्ये आमच्या चित्रपटाचा प्रीमियर करण्याची ही संधी जेव्हा आमच्यासमोर आली, तेव्हा ती गमावण्याचा प्रश्नच नव्हता. ज्या चित्रपटगृहाने मराठी चित्रपटसृष्टीचा समृद्ध इतिहास घडवला आहे, त्याच ठिकाणी ‘सुपर डुपर’ हा चित्रपटही नवा इतिहास घडवेल, असा आम्हाला ठाम विश्वास आहे. या चित्रपटगृहाचे आशीर्वाद आमच्या चित्रपटाला लाभतील आणि प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळेल, अशी मनापासून अपेक्षा आहे.”

निर्मिती सावंत म्हणतात, “ माझं माहेर इथेच बीडीडी चाळीत असल्यामुळे ‘भारतमाता’ हे माझ्यासाठी माहेरचंच थिएटर आहे. लहानपणापासून इथे येऊन चित्रपट पाहाणं हा आमचा एक खास छंद होता. आज खूप आनंद होत आहे की, या चित्रपटगृहाची नव्याने पुनर्बांधणी झाल्यानंतर माझ्या चित्रपटाच्या प्रीमियरने त्याचं उद्घाटन होत आहे. ही माझ्यासाठी खूपच अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे.”

झी स्टुडिओज प्रस्तुत, नाईंटी नाईन प्रॉडक्शन्स आणि सिद्धिविनायक प्रॉडक्शन्स निर्मित ‘सुपर डुपर’ हा एक कौटुंबिक मनोरंजनाचा महासोहळा ३ एप्रिल पासून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. समीर आशा पाटील लिखित– दिग्दर्शित या चित्रपटाचे निर्माते विजय शिंदे आणि नरेश बोर्डे असून, उमेश कुमार बन्सल आणि बवेश जानवलेकर प्रस्तुतकर्ता आहेत. तर संजय जाधव यांनी छायांकनाची जबाबदारी सांभाळली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
haze
30.1 ° C
30.1 °
30.1 °
37 %
3.1kmh
40 %
Fri
34 °
Sat
32 °
Sun
33 °
Mon
33 °
Tue
35 °

Most Popular

Recent Comments