पुणे : भजन, जोगवा, गोंधळ, भारूड अशा भक्तीसंगीताच्या विविध प्रकारांचे अभिनव पद्धतीने सादरीकरण करीत ‘भूपाळी ते भैरवी’ या कार्यक्रमाने भजनाचार्य वै. मनोहरपंत तथा दादा सबनीस यांच्या आठवणींना सांगीतिक कार्यक्रमाद्वारे उजाळा देण्यात आल्या.
भजनाचार्य वै. मनोहरपंत तथा दादा सबनीस जन्मशताब्दी वर्षाच्या सांगतेनिमित्त आयोजित दोन दिवसीय कार्यक्रमाला आज (दि. 19) सुरुवात झाली. सदाशिव पेठेतील म. ए. सोसायटीचे भावे प्राथमिक शाळा सभागृह (रेणुका स्वरूप प्रशाला आवार) येथे ‘भूपाळी ते भैरवी’ हा कार्यक्रम राष्ट्रसेविका समिती नागपूर संचलित राणी लक्ष्मीबाई भजन मंडळाने सादर केला. भजन, जोगवा, गोंधळ, भारूड अशा भक्तीसंगीताच्या प्रकारांचे अभिनव सादरीकरण या वेळी करण्यात आले. राष्ट्रसेविका समितीच्या अखिल भारतीय सहकार्यवाह चित्राताई जोशी, संत वाङ्मयाचे अभ्यासक व आळंदी संस्थानचे माजी प्रमुख विश्वस्त विद्यावाचस्पती ह. भ. प. डॉ. अजित कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती.
जन्मशताब्दी वर्षाची सांगता रविवारी (दि. 20) सायंकाळी 5 वाजता नाना पेठेतील निवडुंगा विठोबा मंदिर संस्थान येथे ‘अष्टपदी भजन’ या कार्यक्रमाने होणार आहे.
सुरुवातीस मिलिंद सबनीस यांनी प्रास्ताविकात कार्यक्रमाविषयी माहिती सांगितली.
दादा सबनीस यांच्या आठवणींना उजाळा देताना चित्राताई जोशी म्हणाल्या, राष्ट्रसेविका समिती आणि दादा सबनीस मास्तर यांचा अनेक वर्षांचा स्नेह होता. नागपुरमधील मावशी केळकर यांनी दादांचे भजन ऐकल्यानंतर त्यांनी नागपुरात येऊन भगिनींना भजन शिकवावे असा आग्रह केला. त्यानंतर दादा अनेक वर्षे भजन शिकवित असत. दादांची राहणी अतिशय साधी होती, ते अत्यंत मनमिळावू होते. ते भजन शिकविताना भजनाचा अर्थही समजावून सांगत असत. त्यामुळे भजन म्हणताना भावनिर्मिती होत असे. दादांनी भगिनींना समाज ऋणाची जाण ठेवण्याचे संस्कारही दिले.
विद्यावाचस्पती डॉ. अजित कुलकर्णी म्हणाले, सबनीस कुटुबियांशी असलेल्या स्नेहातून मला भजनाची गोडी लागली. ते म्हणाले, भजनातून जीवनातील आनंद मिळण्यासाठी भगवंताशी तादात्म्यता आणि परम व्याकुळता असावी लागते जी सबनीस कुटुंबियात रुजलेली आहे. प्रत्येकाने भागवत भजनाचा धागा जीवनात धरून ठेवला तर जीवन सुसह्य होईल.
‘पुंडलिक वरदा हरी विठ्ठल’चा गजर करत ‘भूपाळी ते भैरवी’ या कार्यक्रमाची सुरुवात झाली. गणेश वंदनेनंतर ‘उठा सद्गुरू झाली पहाट’, ‘वासुदेव आला हो वासुदेव आला’, ‘गळा तुळशीची माळ’, ‘रंगा येई वो’, ‘प्रभो मला कर तुझ्या खडावा’, ‘श्रीरामचंद्र कृपाळू भज मन’, ‘नवरात्र अंबा मातेचे’, ‘गजानना गजानना’ अशा विविध रचना या वेळी सादर करण्यात आल्या. उत्तरा नवरे (संवादिनी), योगेश देशपांडे (तबला) यांनी साथसंगत केली तर निवेदन मोहिनी खोत यांनी केले.