पुणे : विदुषी प्रभाताई अत्रे यांच्या ज्येष्ठ शिष्या आणि किराणा घराण्याच्या प्रसिद्ध गायिका आरती ठाकूर-कुंडलकर, उस्ताद राशिद खान यांचे शिष्य आणि रामपूर सहस्वान घराण्याचे प्रसिद्ध गायक पंडित प्रसाद खापर्डे आणि भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांचे पुत्र आणि शिष्य पंडित श्रीनिवास जोशी यांच्या प्रभावी आणि सुरेल गायनाने 23व्या ब्रह्मनाद संगीत महोत्सवाची सुरुवात झाली. महोत्सवाच्या पहिल्या दिवशी ‘मधुवंती’, ‘मिया मल्हार’ आणि ‘मारुबिहाग’ रागातील स्वरवर्षावाचा रसिकांनी आनंद घेतला.
पंडित संजय गरुड यांच्या ब्रह्मनाद कला मंडळातर्फे दोन दिवसीय महोत्सवाचे गणेश सभागृह, न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोड येथे आयोजन करण्यात आले आहे. आरती ठाकूर-कुंडलकर यांनी मैफलीची सुरुवात राग मधुवंतीमधील ‘हु तो तोरे कारन आयी बालमवा’ या पारंपरिक बंदिशीने केली. यानंतर पंडित विनयचंद्र मौद्गल्य रचित आडाचौतालमधील बंदिश सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. सुयोग कुंडलकर यांनी रचलेली तीन तालातील ‘मानत नाही करत बरजोरी’ ही रचना आपल्या सुमधूर स्वरात रसिकांसमोर पेश केली. किराणा घराण्याच्या प्रतिभावान आश्वासक गायिका आरती ठाकूर-कुंडलकर यांची मैफल उत्तरोत्तर रंगत गेली. त्यांनी मैफलीची सांगता त्यांच्या प्रथम गुरू लिलाताई घारपुरे यांच्याकडून आत्मसात केलेल्या संत नामदेवांच्या ‘सुखालागी करिसी तळमळ’ या रचनेने केली. सुयोग कुंडलकर (संवादिनी), ऋषिकेश जगताप (तबला), ऋग्वेद जगताप (पखवाज), अविराज मिले (टाळ), कस्तुरी कुलकर्णी, रुपाली माहुरकर (तानपुरा) यांनी साथसंगत केली.
त्यानंतर पंडित प्रसाद खापर्डे यांनी मैफलीत अनोखे रंग भरले. त्यांनी आपल्या सादरीकरणाची सुरुवात मिया की मल्हार या रागाने केली. ‘करिम नाम तेरो’ ही बंदिश सादर करून त्यांनी द्रुत लयीत ‘बदरा बरसन आए घुमड घुमड गरज गरज’ ही गुलाम मुस्तफा खाँ रचित बंदिश सादर करून घराण्याचे वेगळेपण दर्शविले. भावभक्तीने परिपूर्ण अशा ‘सुन सुन साधो जी, राजा राम कहो जी’ या संत कबीरांच्या भजनाने पंडित खापर्डे यांनी भक्तीपूर्ण वातावरणाची अनुभूती दिली. भरत कामत (तबला), सुयोग कुंडलकर (संवादिनी), दिनेश मोजाड (पखवाज), शिवाजी चामनर, विरेंद्र बोके (तानपुरा) यांनी साथसंगत केली.
महोत्सवाच्या पहिल्या दिवसाची सांगता पंडित श्रीनिवास जोशी यांच्या गायनाने झाली. त्यांनी राग मारुबिहागमधील ‘ना जाओ रे, रसिया आओना’ ही बंदिश बहारदारपणे सादर केली. याला जोडून पंडित भीमसेनजी गात असत ती ‘मजधारा रे परि मोहे ना’ ही द्रुत लयीतील रचना सादर केली. ‘कौन गली गयो शाम, बता दे सखी रि’ ही सुप्रसिद्ध ठुमरी सादर करून पंडित जोशी यांनी रसिकांना मोहित केले. मैफलीची सांगता भैरवीतील ‘अगा पंढरीच्या राया’ या संत कान्होपात्रा यांच्या अभंगाने करून रसिकांना भक्तीरसात चिंब केले. रोहन पंढरपूरकर (तबला), तुषार केळकर (संवादिनी), माऊली फाटक (पखवाज), दिनेश माझिरे, प्रसाद कुलकर्णी (तानपुरा) यांनी साथसंगत केली.
रसिकाग्रणी सुभाष चाफळकर यांचा अमृत महोत्सवानिमित्त विशेष सत्कार श्रीनिवास जोशी, विभास आंबेकर व पंडित संजय गरुड यांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ व मानचिन्ह देऊन करण्यात आला.
महोत्सवाचे उद्घाटन विजयमहाराज जगताप, हरेंद्र वाजपेयी, विकास पनवेलकर, माजी नगरसेवक काका चव्हाण, पंडित संजय गरुड, सुभाष चाफळकर, विभास आंबेकर, रवींद्र हेजीब यांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि सरस्वती पूजनाने झाले. कलाकारांचा सत्कार काका चव्हाण, विभास आंबेकर यांच्या हस्ते करण्यात आला. सूत्रसंचालन मंगेश वाघमारे यांनी केले.