बॅालिवूडला सुपरहिट चित्रपट देणारे अनिस बाझमी पहिल्यांदाच मराठीत
Marathi film । अंगावर काटा आणणाऱ्या ‘जारण’च्या टीझरने प्रेक्षकांमध्ये उत्सुकतेचा कडेलोट केला आहे. एका विवाहितेच्या आयुष्यात घडणाऱ्या असामान्य, भयावह घटनांची ही कथा आहे. “भूतकाळातून सुटका अशक्य आहे” या ओळीतून रहस्य अधिकच खोल जातं. अनिता दातेचा गूढ व धक्कादायक अवतार प्रेक्षकांच्या मनात भयाचं सावट निर्माण करतो. टीझरमधील दृश्यं हे एक भीषण रहस्य उलगडण्याची चाहूल देतात.
‘जारण’च्या थरारक पोस्टर्सने प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण केली होती. चित्रपटाचे पोस्टर्स पाहून सगळ्यांच्याच मनात या रहस्याबद्दल प्रश्न निर्माण झाले होते. या उत्सुकतेत भर पाडत ‘जारण’चा अंगावर शहारे आणणारा टीझर प्रदर्शित झाला आहे. एका विवाहितेच्या आयुष्यात आलेले विचित्र भय, तिच्या घरात घडणाऱ्या असामान्य घटना आणि त्यामागचे धक्कादायक गूढ या सगळ्याची झलक या टीझरमध्ये पाहायला मिळते. ‘भूतकाळातून सुटका अशक्य आहे’ या वाक्यातून कळते, की तिच्या भोवती घडणाऱ्या असामान्य गोष्टी केवळ वर्तमानाच्या नसून त्या भूतकाळाशी जोडलेल्या आहेत. टीझरमधील अनिता दातेची लाल साडी, मोकळे केस, कपाळावर कुंकू व डोळ्यात अनोखी ऊर्जा असलेला भयावह अवतार पाहायला मिळत असून ती जारणाची क्रिया करताना दिसत आहे. यावरून असेही कळतेय, की तिच्या या पात्रात काहीतरी भयानक रहस्य दडलेले आहे.
अनिस बाझमी प्रॅाडक्शन्स प्रस्तुत, ए अँड एन सिनेमाज, एलएलपी यांच्या सहयोगाने आणि ए३ इव्हेंट्स अँड मिडिया सर्व्हिस निर्मित ‘जारण’ चित्रपट येत्या ६ जून २०२५ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बॅालिवूडला ‘भुलभुलैया २’, ‘भुलभुलैया ३’, ‘वेलकम’ यांसारखे एकाहून एक सुपरहिट चित्रपट देणारे अनिस बाझमी ‘जारण’च्या निमित्ताने प्रस्तुतकर्ता म्हणून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहेत. या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन हृषीकेश गुप्ते यांनी केले असून अमोल भगत आणि नितीन भालचंद्र कुलकर्णी यांनी निर्मितीची धुरा सांभाळली आहे. तर मनन दानिया सहनिर्माते आहेत. चित्रपटात अभिनेत्री अमृता सुभाष व अनिता दाते यांच्या प्रमुख भूमिका असून किशोर कदम, ज्योती माळशे, विक्रम गायकवाड, राजन भिसे, अवनी जोशी, सीमा देशमुख यांचाही दमदार अभिनय पाहायला मिळणार आहे.

दिग्दर्शक हृषिकेश गुप्ते म्हणतात, “ ‘जारण’ ही एका कुटुंबाच्या आयुष्यात घडलेल्या मानसिक व भावनिक संघर्षाची कहाणी आहे. करणी, जारण यांसारख्या अंधश्रद्धा आणि त्यांचा मानवी आयुष्यावर होणारा परिणाम यावर आम्ही या चित्रपटातून भाष्य केले आहे. प्रत्येकाला विचार करायला लावेल, असा हा चित्रपट असून प्रेक्षकांना ‘जारण’ नक्कीच आवडेल, अशी मी आशा करतो.”
निर्माते अमोल भगत म्हणतात, “ चित्रपटाच्या पोस्टर्सना प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे, हे पाहून खूप आनंद होतो. आता चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांसाठी घेऊन आलो आहोत. पोस्टर्सप्रमाणे टीझरही प्रेक्षकांचे लक्ष वेधले असेल, याची मला खात्री आहे. या चित्रपटात अभिनेत्री अमृता सुभाष व अनिता दाते यांनी त्यांच्या भूमिका चोख बजावल्या असून चित्रपटात कुटुंबातील बारीकसारीक भावभावना, मानसिक तणाव, आणि अंधश्रद्धांमुळे नात्यात येणारा दुरावा हे सगळे पाहाणे प्रेक्षकांसाठी रंजक ठरेल.”