पुणे – यंदा धरणे 100% भरली असूनही नागरिकांना टॅंकरपोटी मोजावा लागणारा अतिरिक्त शुल्काचा भुर्दंड आणि तरीही पुरेशा प्रमाणात पाणीसाठा होत नसल्याने टंचाईला तोंड द्यावे लागत असून याला रहिवासी वैतागले आहेत.खराडी, लोहगाव, ‘एनआयबीएम’सारख्या भागात आणि महापालिका हद्दीत समाविष्ट झालेल्या गावांसह शहरालगतच्या भागात ही पाणीसमस्या गंभीर आहे. पुण्यात जुलैत मुसळधार पाऊस पडला होता. या काळात पाण्याची मागणीही तुलनेने कमी असते. तरीही या भागातील पाणीसंकटाची तीव्रता कमी झालेली नव्हती. विविध भागांतील रहिवासी ऐन पावसाळ्यात पाणीटंचाईला तोंड देत आहेत. गेल्या चार महिन्यांत शहरातील विविध भागांना पाणीपुरवठा करणाऱ्या टॅंकरची संख्या ४० हजारपर्यंत वाढली आहे. पण या टॅंकरवाढीमुळे नागरिकांची नाराजी कमी झालेली नाही.
पुणे महापालिकेकडील आकडेवारीनुसार, एकट्या जुलैत तब्बल ४२ हजार २२० पाणी टॅंकरने या भागांना पाणीपुरवठा सुरू होता. पण असे असले तरी, यामुळे आमच्या भागाची पाणीसमस्या कायमस्वरुप सुटणार आहे का, असा प्रशासनाला अडचणीचा ठरणारा प्रश्न येथील रहिवासी विचारत आहेत.
पुण्याच्या जलव्यवस्थापनाच्या मर्यादा या समस्येमुळे अधोरेखित होत आहेत. पुणे महापालिकेची हद्द विस्तारली, परंतु या वाढलेल्या लोकसंख्येला पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठा करणे प्रशासनाच्या आवाक्याबाहेर चालले आहे. आठवड्याचे सर्व दिवस २४ तास पाणीपुरवठा प्रकल्प उभारण्याच्या घोषणा झाल्या. मात्र हे प्रकल्प पूर्ण न झाल्याने या भागांतील रहिवाशांना दररोज पाण्यासाठी टॅंकरवरच अवलंबून रहावे लागत आहे. त्यामुळे महापालिकेच्या आणि खासगी अशा दोन्ही टँकरसेवेवर रहिवाशांना मोठा खर्च करावा लागतो. हा खर्च कोट्यवधीच्या घरात गेला असल्याने नागरिकांवरील आर्थिक बोजा प्रचंड वाढला आहे.
सध्याची परिस्थिती पुण्याच्या जलव्यवस्थापनातील अपुरेपणा अधोरेखित करते. पीएमसीने सुरू केलेल्या २४/७ पाणीपुरवठा प्रकल्पामुळे अनेक घरांतील नळ कोरडेच आहेत. हा प्रकल्प पूर्ण करण्यात अयशस्वी झाल्यामुळे रहिवाशांना त्यांच्या दैनंदिन गरजांसाठी मोठ्या प्रमाणातक पाण्याच्या टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे, ज्यामुळे त्यांना खाजगी आणि पुणे महापालिका संचालित दोन्ही टँकरवर मोठा खर्च करावा लागतो. नागरिकांवरील आर्थिक बोजा कमालीच्या पातळीवर पोहोचला असून, खर्च कोट्यवधींच्या घरात गेला आहे.
विस्तारलेल्या या पुण्यात २५ वर्षांहून अधिक काळ पाणीटंचाईच्या तक्रारी आहेत. मात्र, यावर ठोस उपाययोजना अद्यापही करण्यात आलेली नाही. पाणीपुरवठा प्रकल्प पूर्ततेच्या दिशेने कोणतेही भरीव प्रयत्न होताना दिसत नाहीत. हा प्रश्न सुटण्याच्या आशेने रहिवाशांनी वारंवार प्रभाग कार्यालये आणि महापालिका आयुक्तांकडे धाव घेत दाद मागितली. अनेक पत्रे सादर केली आणि असंख्य बैठकांना हजेरी लावली. असे प्रयत्न करूनही पुणे महापालिकेकडून या समस्येबाबत कोणतीही लक्षणीय सुधारणा झालेली नसून, रहिवाशांना दिलासा मिळालेला नाही.