पिंपरी, – “हिंद दी चादर” श्री गुरु तेग बहादूर साहिब जी यांच्या ३५० व्या शहीदी समागमासाठी पिंपरी चिंचवड शहरातून मोठ्या संख्येने भाविक खारघर तेथे जाणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर त्यांच्या प्रवासादरम्यान कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी महापालिकेच्या वतीने सुयोग्य नियोजन करण्यात येत आहे. त्यामध्ये वाहतूक नियोजन, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, वैद्यकीय सहाय्य तसेच आवश्यक समन्वयात्मक उपाययोजनांबाबत संबंधित विभागांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे यांनी दिली.

श्री गुरु तेग बहादूर साहिब जी यांच्या ३५० व्या शहीदी समागमाचे औचित्य साधून शुक्रवार दि. २८ फेब्रुवारी व शनिवार १ मार्च २०२६ रोजी नवी मुंबई येथील खारघर परिसरात भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या समागमास पिंपरी चिंचवड शहरातील शीख, सिकलकर, बंजारा, लबाना, सिंधी, महोयाल, वाल्मिकी, उदासीन तसेच भागवत संप्रदायासह विविध समाजघटकांतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. या अनुषंगाने अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे यांनी पिंपरी येथील गुरूद्वारा येथे नियोजन बैठक घेतली, त्यावेळी ते बोलत होते.
या बैठकीस उप आयुक्त अण्णा बोदडे, कार्यकारी अभियंता कैलास दिवेकर, पिंपरी येथील गुरूद्वारा प्रबंधक गुरूमलसिंह, सुरिंदर सिंह नडीवाल, गुरूविंदरसिंह गिल, गोबिंदसिंह धावडा, सामाजिक कार्यकर्ते सुनिल चटोले तसेच विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी व नागरिक उपस्थित होते.
अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे म्हणाले, समागमासाठी पिंपरी चिंचवड शहरातून मोठ्या संख्येने भाविक खारघर येथे जाणार असल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या सुरक्षित, सुलभ व नियोजनबद्ध प्रवासासाठी महानगरपालिकेच्या संबंधित विभागांमार्फत आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. भाविकांच्या प्रवासादरम्यान कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी वाहतूक व्यवस्था, स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सुविधा, प्राथमिक वैद्यकीय मदत तसेच इतर आवश्यक समन्वयात्मक उपाययोजना राबविण्यात येणार आहेत. यासोबतच संबंधित शासकीय यंत्रणा व आयोजक संस्थांशी समन्वय साधून प्रवास व उपस्थितीच्या अनुषंगाने सर्वंकष सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येत आहे.
यावेळी बैठकीत समागमासाठी शहरातून जाणाऱ्या भाविकांच्या सोयी सुविधांबाबत अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे यांनी आढावा घेतला. तसेच गुरूद्वारा प्रबंधक यांच्या मागण्यांची नोंद घेऊन त्यावर आवश्यक ती कार्यवाही करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.


