पुणे, : ऊस तोडणी मशीनचा तोडणीदर ५० टक्यांनी वाढवून देणे, बँकेचे हप्ते आहेत त्या परिस्थितीत ३ वर्ष मुदत वाढ मिळावी आणि पाचट कपात १.५ टक्के असावी. या सारख्या अनेक महत्वपूर्ण मागण्या पूर्ण करण्यासाठी सोमवारपासून शिवाजीनगर येथील साखर आयुक्त कार्यालायासमोर सकाळी ११. वाजल्या पासून ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले. ही मागणी पूर्ण न झाल्यास संपूर्ण महाराष्ट्रातील १३०० मशीन मालक आपल्या मशीन घेऊन साखर संकुल sakar sankul व मुंबई येथे मंत्रालयाला घेरावा देण्याचा इशारा ही त्यांनी दिला.
‘दरवाड आमच्या हक्काची, नाही कोण्याच्या बापाची’ या घोषणांनी संपूर्ण साखर संकुल दणदणून सोडणारे महाराष्ट्र राज्य ऊस तोडणी मशिन मालक संघटनेचे आज शेकडो सदस्य ठिय्या आंदोलना बसले होते. या आंदोलनापूर्वी गेल्या बुधवारी साखर आयुक्त सिद्धराम सालीमठ यांना निवेदन देण्यात आले होते. मार्च महिन्यामध्ये मागण्या पूर्ण झाल्या नाही तर १० एप्रिल पासून साखर संकुलला घेरावा देण्यात येईल. येवढे करूनही मागणी पूर्ण झाली नाही तर संपूर्ण राज्यातील मशीन मालक आपल्या मशीन घेऊन मुंबई येथे मंत्रालयाला घेरण्याचा इशारा दिला आहे. असे झाल्यास सर्व गोष्टीसाठी शासन जवाबदार राहिल.
यावेळी संघटनेचे अध्यक्ष संजय साळुंके यांनी सांगितले की, अनुदान संदर्भात मागणी सुरू करण्यापूर्ण आम्ही माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांना निवेदन दिले होते. त्यांनी केवळ आश्वासन दिल्यामुळे आमच्यावर ही वेळ आली आहे.
संघटनेचे सचिव अमोल राजे जाधव यांनी सांगितले, गेल्या पाच वर्षापासून आमच्या मागणीसाठी लढा देत आहोत. परंतू शासन केवळ आश्वासनच देत आहे. यावेळेस जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आंदोलनाचे स्वरूप उग्र करू.
महाराष्ट्र राज्य ऊस तोडणी मशीन मालक संघटनेच्या वतीने ऊस मशीनचे तोडणीदार/वाहतूकदार वाढविणेबाबतची मागणी सुद्धा केली आहे. कृषी क्षेत्रातील प्रोत्साहन पर योजनेमुळे कृषी यांत्रिकीकरणात गतीने वाढ झाली आहे. यामुळे राज्यात ऊस तोडणी मशीन जवळपास १३०० मशिन कार्यरत असून यातील काहींना अनुदान मिळाले आहे. त्यातच २०१९ पासून जवळपास ९०० मशिनला अनुदान मिळालेले नाही. यासाठी वेळोवेळी आंदोलन करण्यात आले पण त्यांना न्याय मिळाला नाही.
डिझेल वृद्धिमुळे एक टन ऊस तोडणीसाठी मशीनला जवळपास ३ लीटर डिझेल लागत असून २६० ते २८० रू. खर्च येतो. मशिन चालविण्यासाठी ऑपरेटर/इनफिल्डर ड्रायव्हर यांचे पगार, टनानूसार ऑपरेटिंग खर्च ८० रूपये येतो. दुरूस्ती, ग्रीस व स्पेअर पार्टससाठी प्रति टनानूसार १०० रूपये खर्च येतो. म्हणजेच एक टन ऊस तोडणीसाठी ४६० रूपये खर्च येतो. इकडे कारखाने आम्हाला ४५० ते ५०० रूपये देताता. आम्हाला आवक कमी असून बँकेचे हप्ते भरणे ही अवघड झाले आहे.

आयुक्तांच्या जी.आर नुसार ४.५ टक्के पाचट कपात ही शेतकर्यांकडून ऊस तोडणीदार आणि वाहतूकदार यांच्याकडून एकूण १३.५ टक्के केली जात आहे. त्यामुळेच राज्यातील सर्व मशीन मालकांची ही समस्या लवकर सोडवावी अशी मागणी संघटनेने केली आहे.
आंदोलनात महाराष्ट्र राज्य ऊस तोडणी मशिन मालक संघटनेचे सचिव अमोलराजे वसंतराव जाधव यांच्या सहित आंदोलनात संजय साळुंके( सातारा), सागर पाटील (सांगली), गणेश यादव (पुणे), जगन्नाथ सपकाळ (लातूर), अभय कोल्हे व धनंजय काळे (धाराशिव), जयदीप पाटील (सांगली) तुषार पवार (सांगली) सहित राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील मशीन मालक सहभागी झाले होते.