15.1 C
New Delhi
Friday, November 22, 2024
Homeमहाराष्ट्रएस. एन. बी. पी. आयोजित स्वरयज्ञ महोत्सवाला सुरुवातकलाकारांच्या सादरीकरणाला रसिकांची उत्स्फूर्त दाद

एस. एन. बी. पी. आयोजित स्वरयज्ञ महोत्सवाला सुरुवातकलाकारांच्या सादरीकरणाला रसिकांची उत्स्फूर्त दाद

पुणे : उस्ताद रईस बाले खान यांचे बहारदार सतार वादन आणि पंडित जयतीर्थ मेवुंडी यांच्या सुरेल गायनाने स्वरयज्ञ महोत्सवाला उत्साहात सुरुवात झाली.
येरवडा परिसरातील प्रतिष्ठित एस. एन. बी. पी. माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातर्फे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त कलाकारांचा सहभाग असलेला दोन दिवसीय स्वरयज्ञ महोत्सव महाविद्यालयातील सरस्वती हॉलमध्ये आयोजित करण्यात आला आहे. रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात महोत्सवाला सुरुवात झाली आहे. ज्येष्ठ टाळवादक माऊली टाकळकर, प्रसिद्ध गायक डॉ. रवींद्र घांगुर्डे, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. डी. के. भोसले, अध्यक्षा डॉ. वृषाली भोसले, संचालिका देवयानी भोसले, ऋतुजा भोसले, जयश्री व्यंकटरमण, प्राचार्या रश्मी शुक्ला आदी उपस्थित होते.
महोत्सवाची सुरुवात विद्यालयातील 40 विद्यार्थ्यांच्या गायन-वादनाने झाली. विद्यार्थ्यांनी विविध रचनांद्वारे पूरिया धनाश्री रागाचे सादरीकरण केले.
त्यानंतर उस्ताद रईस बाले खान यांनी आपल्या सतार वादनाची सुरुवात यमन रागाने केली. ‌‘जबसे बलम परदेस‌’ ही मिश्र पहाडीतील धून सतारीवर सादर करताना वादनाबरोबर गायनाची झलक दर्शवून रईस बाले खान यांनी रसिकांची मने जिंकली. सतारीवर लीलया फिरणारी बोटे आणि त्यातून उमटलेले झंकार रसिकांना स्तिमित करून गेले. मुक्ता रास्ते यांनी समर्पक तबलासाथ केली.
मैफलीच्या उत्तरार्धात किराणा घराण्याचे सुप्रसिद्ध गायक पंडित जयतीर्थ मेवुंडी यांचे दमदार गायन झाले. त्यांनी मैफलीची सुरुवात राग दुर्गाने केली. ‌‘तू रस कान्हा रे‌’, ‌‘चतर सुखदा बालमवा‌’ या बंदिशी सादर केल्या. दुर्गोत्सवाचे निमित्त साधून ‌‘दुर्गे भवानी चामुंडेश्वरी शक्तीदायिनी भक्तसहायिनी‌’ ही पूरिया धनाश्रीमधील स्वरचित दुर्गास्तुती पंडित मेवुंडी यांनी अतिशय प्रभावीपणे सादर केली. त्यानंतर आदीशक्तीचे रूप दर्शविणारी ‌‘जय दुर्गे दुर्गती परिहारिणी‌’ ही रचना ऐकविली. संत तुकाराम महाराज रचित ‌‘पोटा पुरते देई विठ्ठला लई नाही मागणे देवा‌’ हा अभंग रसिकांच्या मनाचा ठाव घेणारा ठरला. राघवेंद्रस्वामी रचित ‌‘संगीत प्रियमंगळ‌’, तसेच संत पुरंदरदास रचित सुप्रसिद्ध ‌‘लक्ष्मी बारम्मा‌’ या रचना उपस्थितांना विशेष भावल्या. पंडित मेवुंडी यांनी मैफलीची सांगता भैरवी रागातील ‌‘शारदा विद्यादायिनी दयानिधी‌’ या देवीस्तुतीपर रचनेने केली. त्यांना विनायक गुरव (तबला), शुभम शिंदे (पखवाज), तुषार केळकर, (संवादिनी), ललित मेवुंडी (सहगायन), योगिनी ढगे, अबोली सेवेकर (तानपुरा) तर माऊली टाकळकर (टाळ) यांनी सुरेल साथ केली.
वयाच्या 98व्या वर्षात पदार्पण केलेले ज्येष्ठ टाळवादक माऊली टाकळकर यांचा डॉ. डी. के. भोसले, अध्यक्षा डॉ. वृषाली भोसले यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला.
डॉ. रवींद्र घांगुर्डे म्हणाले, एस. एन. बी. पी. संस्थेतर्फे पुस्तकी अभ्यासाबरोबरच कलेच्या शिक्षणासाठी करण्यात येत असलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत. संस्कारक्षम विद्यार्थी घडल्यास चांगला समाज निर्माण होतो. संस्थेच्या सर्व शाखांमध्ये सांगीतिक वातावरण निर्माण होत असून स्वरांचे नंदनवन फुलविले जात आहे, ही मोलाची कामगिरी आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
mist
15.1 ° C
15.1 °
15.1 °
82 %
0kmh
0 %
Fri
27 °
Sat
28 °
Sun
29 °
Mon
29 °
Tue
25 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!