पुणे, -: काव्य हे साहित्याला प्रसवते. साहित्याची आई कविता आहे. कवितेला जगवायचे असेल तर वेळेला महत्व द्यावे लागेल. भावना, विचार, अनुभव आणि कल्पना व्यक्त करते ते साहित्य म्हणजे कविता. कविता हे एक शक्तिशाली माध्यम असून यातून सामाजिक बदल घडविला जाऊ शकतो. असे विचार दुसर्या राज्यस्तरीय काव्यविश्व साहित्य संमेलनाचे अध्यक्ष देशभक्तकोषकार चंद्रकांत शहासने यांनी व्यक्त केले.काव्यमित्र संस्था पुणे आणि अपेक्षा मासिक परिवार यांच्या वतिने श्रमिक पत्रकार भवन येथे आयोजित ‘दुसरे राज्यस्तरीय काव्यविश्व साहित्य संमेलन २०२६’ च्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.यावेळी स्वागताध्यक्ष सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ. संजय जगताप, उद्घाटक साहित्यप्रेमी प्रमोद कुमार बेलसरे, पहिल्या काव्यविश्व साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा चंद्रलेखा बेलसरे, ज्येष्ठ साहित्यिक श्याम भुर्के हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच अपेक्षा मासिक परिवारचे संस्थापक संंपादक दत्तात्रय उभे आणि काव्यमित्र संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र सगर उपस्थित होते.
या प्रसंगी “स्मरणिका प्रकाशन”आणि अपेक्षा मासिक “महिलादिन विशेषांक” चे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
आयोजित संमेलनात मान्यवरांच्या हस्ते जीवन गौरव पुरस्कार, साहित्य गौरव पुरस्कार आणि विशेष कृतज्ञता सन्मान प्रदान करण्यात आले. तसेच, निमंत्रित कवी व कवयित्री यांचे वेगवेगळ्या विषयांवरील कवितांचे सादरीकरण, हास्य कविसंमेलन, मराठी काव्य विश्वातील संत साहित्याचे महत्व या विषयावर परिसंवाद सारखे काव्यविश्वातील वेगवेगळ्या विषयांवरील कार्यक्रमाचे सादरीकरण झाले.
चंद्रकांत शहासने म्हणाले, कविता या देवदूत आहेत. त्या सामाजिक मनाचा मागोवा घेतात. अंगाई, पोवाडा, भुपाळी हे कवितांचे प्रकार म्हणू शकतो. भावनात्मक अभिव्यक्ति, लाघवी भाषा, छंद आणि ताल, कल्पना आणि प्रतिक याचा उत्तम संगम म्हणजे कविता.
प्रमोदकुमार बेलसरे म्हणाले, कविता आणि लेखणीतून समाजातील सर्व गोष्टींवर प्रहार केला जातो. हे काव्यविश्व सम्मेलन नाही तर ज्यांचे विश्वच काव्य आहे अशांच्या या संमेलनात भाषेचा गोडवा कळतो.
श्याम भुर्के म्हणाले, सातवहन राजाने हजारो वर्षापूर्वी जतन केलेल्या ग्रंथ संकलनामध्ये असे आढळून आले की शेतकरी काम करतांना मराठी भाषेत कविता व गाणे गुणगुणायचे. आज या नोंदी मुळेच मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळालेला आहे.
चंद्रलेखा बेलसरे म्हणाल्या, प्रत्येक साहित्यकाराच्या साधनेतून कवितेत भावना व्यक्त होत असते. अभिव्यक्ती, घटनांचा मागोवा, वर्तमानातील परिस्थिती या सर्वांमुळे कविता ही घडविली जाते ती सर्वांना आपली वाटत असते.
डॉ. संजय जगताप यांनी स्वागतपर भाषणात सांगितले, साहित्यक्षेत्रात सर्वाधिक मराठी साहित्यांचे प्रकाशन होणे हे अभिमानस्पाद आहे. मराठी बोलणाऱ्या १५ कोटी लोकांमुळेच ९५ देशात मराठी मंडळ निर्माण झाले आहेत. आज ऑस्ट्रेलियात मराठी शाळा असून येथेे २९ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला आहे.अपेक्षा मासिक परिवाराचे संस्थापक संपादक दत्तात्रेय उभे यांनी प्रस्तावना मांडली.
सूत्रसंचालन राजेंद्र सगर यांनी केले.


