भोईर यांचा लढण्याचा निर्धार, पत्रकार परिषदेतून केली भूमिका जाहीर
२ ऑक्टोबरला निर्धार मेळावा घेणार
पिंपरी : चिंचवड विधानसभेतून जेष्ठ नेते भाऊसाहेब भोईर हे देखील म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. आज झालेल्या पत्रकार परिषदेत भाऊसाहेब भोईर यांनी आपली राजकीय भूमिका स्पष्ट केली. याच बरोबर येत्या २ ऑक्टोबरला मतदारसंघात कार्यकर्ता निर्धार मेळाव्याचे आयोजन करत आपली राजकीय भूमिका स्पष्ट करणार आहेत.
बुधवारी २ ऑक्टोबरला सायंकाळी ५ वाजता रहाटणी येथील थोपटे लॉन्स मध्ये याठिकाणी हा निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
भाऊसाहेब भोईर म्हणाले की, गेली अनेक वर्षे मी नगरसेवक म्हणून या शहराचे प्रतिनिधित्व करत आलेलो आहे. उद्योगनगरी म्हणून ओळख असलेल्या या शहराला सांस्कृतिक नगरी ही ओळख निर्माण करुन देण्यासाठी मी सतत प्रयत्नशील आहे.
चिंचवड विधानसभेमध्ये असलेल्या घराणेशाही आणि दडपशाहीमुळे या मतदार संघात विकासाचे केंद्रीकरण होऊ शकले नाही. केवळ स्वतःच्या राजकीय आणि आर्थिक फायद्यासाठी इथल्या लोकप्रतिनिधींनी आपल्या सत्तेचा वापर केलाय. मला वैयक्तिक कोणावरही टीका करायची नसली तरी जनतेला सर्व वस्तुस्थिती माहिती आहे. आणि त्यामुळेच या मतदारसंघातील जनतेला आता बदल हवा आहे.
या सर्व परिस्थितीचा विचार करुन माझ्या कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यावर आपण निवडणुकीच्या रिंगणात उतरायचे निश्चित केल्याचे भोईर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. मतदार संघात मतदारांची संख्या वाढली. मात्र, समस्या जैसे थे च आहेत. त्यामध्ये २४ तास पाणी पुरवठ्याचा प्रश्न असू द्या, वाढती वाहतूक कोंडीची समस्या असो की घन कचरा व्यवस्थापन, याकडे आत्तापर्यंत इथल्या सत्ताधाऱ्यांनी सोयीस्कर दुर्लक्ष केलं आहे.
हेच प्रश्न घेऊन मी मतदारांच्या पाठींब्यावर या निवडणुकीच्या रिंगणात उतरतोय. मोरया गोसावींची भक्ती हाच माझा पक्ष आणि चाफेकरांची क्रांती हे माझं ध्येय असल्याचे भोईर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.