परिसरातील सुमारे १५ हजार सदनिकाधारकांना दिलासा
पिंपरी –
चोविसावाडी-चऱ्होली येथील प्रस्तावित घनकचरा स्थानांतरण केंद्र रद्द करुन, अन्य ठिकाणी स्थलांतरीत करण्याचा मोठा निर्णय महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी घेतला. या परिसरात मोठ्या प्रमाणात गृहप्रकल्प निर्माण झाले असून, नागरिकांना त्रास होवू नये. या करिता हा निर्णय घेतल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. त्यामुळे सुमारे १५ हजार सदनिकाधारकांना दिलासा मिळाला आहे.
भोसरी विधानसभा मतदार संघातील भारतीय जनता पार्टीचे आमदार महेश लांडगे Mahesh landage यांनी सोसायटी फेडरेशन आणि स्थानिक नागरिकांच्या मागणीनुसार, प्रस्तावित घनकचरा स्थानांतरण केंद्र (कचरा ट्रान्फर स्ट्रेशन) रद्द करावे. यासाठी महापालिका प्रशासन व राज्य सरकारकडे मागणी केली होती. त्याला यश मिळाले असून, महापालिका आयुक्तांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे.
सध्या पिंपरी-चिंचवड pcmc शहरातील वेगवेगळ्या भागातून दररोज सरासरी १००० ते ११०० मे. टन कचरा मोशी येथील डेपोत येतो. शहरात सुमारे २५ ते ३० ठिकाणी रस्त्याच्या कडेला किंवा मोकया जागेवर कचरा संकलन केंद्र कार्यान्वयीत आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने इंदौर शहराच्या धर्तीवर महापालिका हद्दीत ८ क्षेत्रीय कार्यालयात प्रत्येकी २ असे १६ ठिकाणी घनकचरा स्थानांतरण केंद्र उभारण्याचे नियोजन केले. महापालिका विकास आराखड्यात (DP) मध्ये घनकचरा स्थानांतरण केंद्र (SWT) करिता चोविसावाडी येथील जागा आरक्षीत केली होती.
**
‘या’ सोसायटींमधील नागरिकांत आनंदोत्सव…
महापालिका विकास आराखडा तयार केला. त्यावेळी या भागात नागरीवस्ती नव्हती. मात्र, गेल्या आठ-दहा वर्षांमध्ये या भागातील लोकसंख्या व गृहप्रकल्प मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. परिणामी, कचरा स्थानांतरण केंद्र मध्यवस्तीमध्ये येत आहे. महापालिकेतर्फे चोविसावाडी येथे प्रस्तावित कचरा संकलन केंद्राच्या शेजारीच तनिष ऑर्चिड फेज -1, तनिष ऑर्चिड फेज -2, डेस्टिनेशन ओशियान, ग्लोबल हाईट या आणि इतर सहकारी गृहरचना संस्था आहेत. हा सर्व रहिवासी परिसर असून या भागामध्ये 30 पेक्षा जास्त सहकारी गृहरचना संस्था आहेत. १२ ते १५ हजार सोसायटीधारक या ठिकाणी राहतात. या प्रायोजित कचरा स्थानांतरण केंद्रामुळे या भागामध्ये असणाऱ्या सर्व नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागण्याची भिती व्यक्त केली जात होती. महापालिका प्रशासनाने हा निर्णय मागे घेतला. त्यामुळे या भागातील नागरिकांनी आनंदोत्सव केला आहे.
**
प्रतिक्रिया :
पिंपरी-चिंचवड महापालिकेची १९९७ मध्ये हद्दवाढ करण्यात आली. त्यावेळी चोविसावाडी-चऱ्होलीचा महापालिकेत समावेश झाला. मात्र, समाविष्ट गावांमध्ये पायाभूत सोयी-सुविधांपासून दुर्लक्षीत राहिली होती. महापालिका विकास आराखडा तयार केला. त्यावेळी येथे कचरा स्थानांतरण केंद्र प्रस्तावित करण्यात आले. स्थानिक नागरिकांसोबत या केंद्राला सुरूवातीपासून आम्ही विरोध केला. मात्र, प्रशासनाकडून कार्यवाही सुरू केली होती. त्यामुळे व्यापक जनहिताच्या दृष्टीने सदर केंद्र रद्द करावे, अशी आग्रही मागणी प्रशासनाला केली होती. आम्ही केलेला तीव्र विरोध पाहता महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी सदर कचरा स्थानांतरण केंद्र रद्द केले. याबाबत मी प्रशासनाचे आभार व्यक्त करतो.
– महेश लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा, भाजपा, पिंपरी-चिंचवड.