पुणे : ऐतिहासिक एच.एन.डी. जैन बोर्डिंगचा मौल्यवान भूखंड गोखले लँडमार्क एलएलपी या बिल्डरला विकला गेल्याच्या प्रकरणात आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहन सुरवसे पाटील यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. “हा व्यवहार समाजाच्या विश्वासाला तडा देणारा आहे. या प्रकरणातील ट्रस्टी, बिल्डर, धर्मादाय आयुक्त आणि राजकीय प्रभाव वापरून मदत करणाऱ्या सर्वांवर गुन्हे दाखल करा,” अशी मागणी सुरवसे पाटील यांनी केली आहे.
यासंदर्भात त्यांनी ट्विट करत अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी विचारले की, “जैन बोर्डिंगचा भूखंड कायदेशीर दृष्ट्या रद्द कधी होणार?” हा प्रश्न अद्याप अनुत्तरीत आहे. जैन बोर्डिंगचा भूखंड काही ट्रस्टींनी गुपचूप पद्धतीने खासगी बिल्डरला विकल्याचे उघड झाल्यानंतर जैन समाजात संताप उसळला आहे. समाजाने मोठा मोर्चा काढून या विक्रीविरोधात तीव्र भूमिका घेतली आहे. तरीदेखील गेल्या काही महिन्यांपासून चर्चा आणि आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाही अद्याप ठोस कारवाई झालेली नाही.

दस्तऐवजांनुसार या व्यवहारात कायदेशीर प्रक्रिया आणि पारदर्शकतेचा अभाव स्पष्टपणे दिसून येतो. काही राजकीय हस्तक्षेप झाल्याचाही संशय समाजात व्यक्त केला जात आहे. रोहन सुरवसे पाटील यांनी आणखी एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला, “भूखंड पुन्हा ट्रस्टच्या नावावर करण्यासाठी लागणारे मुद्रांक शुल्क कोण भरणार?” ट्रस्टींच्या चुकीमुळे झालेल्या या व्यवहाराचा आर्थिक भार समाजावर टाकणे अन्यायकारक ठरेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
त्यामुळे या प्रकरणात समाजाची फसवणूक करून फायदा घेणाऱ्या ट्रस्टी, बिल्डर, चॅरिटी कमिशनर तसेच राजकीय प्रभाव वापरणाऱ्या मास्टरमाइंड व्यक्तींवर गुन्हे दाखल करून कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी सुरवसे पाटील यांनी केली आहे.


