23.1 C
New Delhi
Friday, November 22, 2024
Homeमहाराष्ट्रदगडूशेठ' च्या जटोली शिवमंदिर सजावटीचे उद्घाटन शनिवारी

दगडूशेठ’ च्या जटोली शिवमंदिर सजावटीचे उद्घाटन शनिवारी

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट ; श्री दत्त सांप्रदायाचे श्री ज्ञानराज महाराज माणिकप्रभू (हुमनाबाद, कर्नाटक) यांच्या हस्ते श्रीं ची प्राणप्रतिष्ठापना ; सायंकाळी विद्युतरोषणाईचे उद््घाटन

पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने ट्रस्टच्या १३२ व्या वर्षी गणेशोत्सवात हिमाचल प्रदेशमधील जटोली शिवमंदिराची प्रतिकृती साकारण्यात येत आहे. गणेश चतुर्थीला शनिवार, दिनांक ७ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजून ११ मिनिटांनी कर्नाटक हुमनाबाद येथील श्री दत्त सांप्रदायाचे श्री ज्ञानराज महाराज माणिकप्रभू यांच्या हस्ते श्रीं ची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. तर, मंदिरावरील विद्युतरोषणाईचे उद््घाटन सायंकाळी ७ वाजता केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते होईल, अशी माहिती ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी व सरचिटणीस हेमंत रासने यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण, उपाध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस हेमंत रासने, उत्सव प्रमुख अक्षय गोडसे, सहचिटणीस अमोल केदारी, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, मंगेश सूर्यवंशी, सौरभ रायकर, विशाल केदारी, राजाभाऊ घोडके, सिद्धार्थ गोडसे आदी उपस्थित होते.

शनिवारी (दि.७) प्राणप्रतिष्ठापनेपूर्वी सकाळी ८.३० वाजता मुख्य मंदिरापासून सिंह रथातून श्रीं ची आगमन मिरवणूक काढण्यात येणार आहे. आकर्षक फुलांचा रथ साकारण्यात आला असून २ सिंहाच्या प्रतिकृती रथावर लावण्यात येणार आहेत. प्रतिष्ठापनेनंतर उत्सवमंडपात दुपारी १२ पासून भाविकांनी श्रीं च्या दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे. सायंकाळी विद्युत रोषणाई व सजावटीचे उद्घाटन होणार आहे.

आशियातील सर्वात उंच शिवमंदिर म्हणून जटोली मंदिर ओळखले जाते. उत्तुंग हिमालयाच्या सानिध्यात प्रतिष्ठित आणि अत्यंत पवित्र असलेल्या मंदिराची तेजस्वी प्रतिकृती साकारण्यात आली आहे. यंदाची प्रतिकृती असलेले हिमाचल प्रदेशच्या सोलन मधील जटोली शिव मंदिर हे डोंगराच्या माथ्यावर वसलेले भव्य मंदिर आहे. जटोली हे नाव महादेवाच्या लांब जटावरून पडले आहे. हे मंदिर स्थापत्यकलेचा चमत्कार आहे. भगवान शिवाच्या सर्वात प्राचीन मंदिरांपैकी एक असून हे मंदिर एकेकाळी भगवान शंकराचे विश्रामस्थान होते, असे मानले जाते.

गणेशोत्सवात साकारण्यात आलेल्या जटोली शिवमंदिराच्या प्रतिकृतीचा आकार १२५ फूट लांब, ५० फूट रंद आणि १०० फूट उंच असणार आहे. मंदिराची प्रतिकृती फायबर मध्ये उभारण्यात येत असून त्यावर रंगकाम करण्यात आले आहे. मुख्य सभामंडपातील खांबांची रचना सुटसुटीत असून भाविकांना लांबून सहजतेने श्रीं चे दर्शन घेता येईल. कलादिग्दर्शक अमन विधाते यांनी मंदिराचे काम, विद्युतरोषणाइचे काम वाईकर बंधू, मंडपव्यवस्था काळे मांडववाले यांनी केली आहे.

विसर्जन मिरवणुकीत यावर्षी ही दुपारी ४ वाजता सहभागी होणार

पुण्याच्या गणेश विसर्जन मिरवणुकीचे मुख्य आकर्षण असलेला दगडूशेठ गणपती बाप्पा हे विसर्जन मिरवणुकीत रात्री सहभागी होतात. पण मागील वर्षाप्रमाणे यंदा देखील परंपरेप्रमाणे विसर्जन मिरवणुकीत रात्री सहभागी न होता, दगडूशेठ गणपती दुपारी चार वाजता मिरवणुकीत सहभागी होणार आहे.

  • ॠषिपंचमीनिमित्त ३१ हजार महिलांचे अर्थवशीर्ष पठण

रविवार, दिनांक ८ सप्टेंबर रोजी पहाटे ६ वाजता ॠषिपंचमीनिमित्त दरवर्षीप्रमाणे ३१ हजार महिला सामुदायिकरित्या अथर्वशीर्ष पठण करणार आहेत. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. अरुणा ढेरे उपस्थित राहणार आहेत. रात्री १० ते १२ वाजेपर्यंत हरी जागर च्या माध्यमातून महाराष्ट्रातील वारकरी बंधू वारकरी गजर करीत गणरायाचरणी सेवा अर्पण करणार आहेत. उत्सवांतर्गत सूर्यनमस्कार, अग्निहोत्र, वेदपठण, महिला हळदीकुंकू असे विविध कार्यक्रम होणार आहेत. दररोज पहाटे ५ पासून महाअभिषेक पूजा होणार असून सकाळी ८ ते दुपारी १२ यावेळेत मिलींद राहुरकर शास्त्री हे गणेशयाग आणि दुपारी १२ ते ४ यावेळेत दाक्षिणात्य पद्धतीने नटराजशास्त्री यांच्या उपस्थितीत गणेशयाग होणार आहे. भाविकांना स्वहस्ते अभिषेक पहाटे ५ ते सायंकाळी ५ यावेळेत मंडपात करता येणार आहेत.

  • उत्सवमंडपात सोमवारी (दि.१६) सामुहिक सत्यविनायक पूजेचे आयोजन

उत्सवमंडपात दिनांक १६ सप्टेंबर रोजी सामुहिक सत्यविनायक पूजेचे आयोजन करण्यात आले आहे. सत्यविनायक पूजा ही भगवान शंकर व पार्वती मातेला ब्रह्मा, विष्णू, महेश, आदिशक्ती, सूर्य या पाच देवतांनी सांगितली असल्याचे सत्यविनायक पोथीत सांगण्यात आले आहे. सत्यविनायक पूजेला अनन्यसाधारण महत्व असून ते भाविकांपर्यंत यामाध्यमातून पोहोचविण्यात येणार आहे.

उत्सवात श्रीं ना दररोज विविध पदार्थांचा भोग लावण्यात येणार आहे. तसेच सायंकाळी भक्तांना प्रसाद म्हणून त्याचे वितरण केले जाईल. मंदिर व उत्सव मंडप परिसरात येणा-या भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था देखील करण्यात आली आहे. दररोज पहाटे ५ ते ६ यावेळेत विविध शाळांतील विद्यार्थी अथर्वशीर्ष पठण करणार आहेत. एकादशीच्या दिवशी दिनांक १४ सप्टेंबर रोजी दुपारी ३ ते ५ यावेळेत मंत्र जागर होणार आहे. अनंत चतुर्दशीला दिनांक १७ सप्टेंबर रोजी श्रींची वैभवशाली सांगता मिरवणूक श्री उमांगमलज रथातून निघणार आहे.

  • गणेशोत्सवात जय गणेश आरोग्यसेवा अभियानांतर्गत ३ ठिकाणी केंद्र, मोफत रुग्णवाहिका सेवा आणि आयसीयू

जय गणेश आरोग्यसेवा अभियानांतर्गत जय गणेश प्रांगणासह मंदिर परिसरात ३ ठिकाणी सुसज्ज अशी २४ तास मोफत वैद्यकीय मदत केंद्र सिटी पोस्ट, गणपती मंदिर व मांगल्य मंगल कार्यालय येथे असणार आहेत. याशिवाय भारती हॉस्पिटल रिसर्च सेंटर धनकवडी, सूर्या सह्याद्री हॉस्पिटल, जहांगिर हॉस्पिटल, रुबी हॉल क्लिनिक, सिल्व्हर बर्च मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, डॉ.डी.वाय. पाटील हॉस्पिटल पिंपरी, ससून सर्वोपचार रुग्णालय, संचेती हॉस्पिटल येथे मोफत वैद्यकीय सेवा उपलब्ध होणार आहे. गणपती मंदिराजवळ महाराष्ट्र राज्य उपसंचालक आरोग्य सेवा पुणे यांच्यातर्फे २४ तास मोफत व्हेंटिलेटर/ आयसीयू बेड सुविधा देण्यात येईल.

एन.एम.वाडीया ह्रदय रुग्णालय पुणे स्टेशन येथे मोफत कार्डियाक रुग्णवाहिका सेवा विनामूल्य मिळणार आहे. तर, ट्रस्टच्या ११ रुग्णवाहिका उत्सवकाळात पुणे शहर, पिंपरी-चिंचवड परिसरात विनामूल्य स्वरुपात कार्यरत असणार आहेत. वैद्यकीय मदत केंद्रावर तसेच रुग्णवाहिकांच्या येथे मोफत औषधे देण्यात येणार असून आरोग्यविषयक सर्वतोपरी मदत भाविकांना देण्याची सुविधा ट्रस्टने उपलब्ध करुन दिली आहे.

  • गणेशभक्तांसाठी ५० कोटींचा विमा व उत्सवावर तब्बल १५० कॅमे-यांचा वॉच व ४ एलईडी स्क्रिनची सोय
    पुणे शहर मनपा, पिंपरी-चिंचवड मनपा यांसह कॅन्टोनमेंट बोर्ड हद्दींतर्गत गणेशभक्तांसाठी तब्बल ५० कोटींचा विमा ट्रस्टतर्फे काढण्यात आला आहे. यामध्ये चेंगराचेंगरी, अतिरेकी हल्ला वा हवाई हल्ला झाल्यास विम्याचे सुरक्षाकवच मिळणार आहे. यामध्ये अपघाती मृत्यु झाल्यास प्रति व्यक्तीला ५ लाख रुपये, अपघातात अंशत: अपंगत्त्व आल्यास २ लाख रुपये आणि अपघातात जखमी झालेल्या प्रत्येक व्यक्ती ५० हजार रुपयांपर्यंत औषधाचा खर्च देण्यात येईल. उत्सवकाळात ही विम्याची सुविधा असणार आहे.

श्रीं चे दर्शन भाविकांना एलईडी स्क्रिनद्वारे घेता यावे, याकरिता ४ एलईडी स्क्रिन लावण्यात येणार आहेत. उत्सव मंडपात लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर व मूळचंद दुकानाशेजारी अशा तीन एलईडी स्क्रिन तसेच बुधवार चौक येथे एक स्क्रिन लावण्यात येणार आहेत. श्रीं चे आॅनलाईन दर्शन घेण्याची व्यवस्था देखील ट्रस्टने केली आहे. ट्रस्टच्या वेबसाईट, अ‍ॅप, फेसबुक, यू ट्यूब, ट्ट्विटर या माध्यमांद्वारे www.dagdushethganpati.com, http://bit.ly/Dagdusheth-Live, iOS : http://bit.ly/Dagdusheth_iphone_App Android: http://bit.ly/ Dagdusheth_Android_App या लिंकवर उत्सवकाळात २४ तास दर्शनाची सोय करण्यात आली आहे. तरी भाविकांनी आॅनलाईन दर्शनाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहनही ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.

सुरक्षेच्या कारणास्तव देखाव्याच्या परिसरात सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. तसेच फरासखाना चौक, बाबू गेनू गणपती, कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर, सिटीपोस्ट अशा परिसरात देखील सीसीटिव्ही कॅमेरे असणार आहेत. याशिवाय मंदिर परिसरात कायमस्वरुपी असलेल्या कॅमे-यांचा वॉच उत्सवावर असणार आहे. त्यामुळे तब्बल १५० कॅमे-यांद्वारे या परिसरावर पोलीस यंत्रणेसोबत ट्रस्टची २५० पुरुष व महिला यांची खासगी सुरक्षाव्यवस्था लक्ष ठेवणार आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
smoke
23.1 ° C
23.1 °
23.1 °
43 %
2.1kmh
0 %
Fri
27 °
Sat
28 °
Sun
29 °
Mon
29 °
Tue
28 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!