पुणे : दिव्यांग व्यक्तींना समाजाच्या मूळ प्रवाहात आणण्या सोबतच त्या स्वावलंबी व्हाव्या, तसेच समाजाला त्यांच्यातील कौशल्यांची ओळख व्हावी, या उद्देशाने पुण्यातील समविचारी मैत्रिणींनी एकत्र येऊन प्रोत्साहन २०२५ या प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. शनिवार, दिनांक २० सप्टेंबर ते रविवार, दिनांक २१ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते ८ यावेळेत कर्वे रस्त्याजवळील अश्वमेध हॉल येथे हे प्रदर्शन होणार आहे. महाराष्ट्रातील विविध भागातील ३१ दिव्यांग व्यक्ती आणि ९ संस्था या प्रदर्शनात सहभागी होत आहेत.
प्रदर्शनाचे संयोजन रंजना आठल्ये, रेखा कानिटकर, आरती पटवर्धन, माधुरी पाटणकर, शुभदा करंदीकर, गीता पटवर्धन, आबेदा खान, नीलम भाटवडेकर, अमृता पटवर्धन, रोहिणी अभ्यंकर यांनी केले आहे. प्रदर्शनाचे उद््घाटन शनिवार, दिनांक २० सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता दिव्यांगांसाठी कार्यरत असलेल्या इंटिग्रेटेड एज्युकेशन सेंटरच्या अमृता भागवत आणि गती मंद असलेल्या पूजा मुनोत यांच्या हस्ते होणार आहे. फक्त दिव्यांग व्यक्तिंचाच सहभाग असलेल्या या प्रदर्शनात त्यांनी साकारलेल्या उपयुक्त कलात्मक वस्तू आणि खाद्यपदार्थ यांचे प्रदर्शन व विक्री केली जाते. त्यांच्या कलागुणांचे सादरीकरण हे या प्रदर्शनाचे वैशिष्ट्य आहे.
रंजना आठल्ये म्हणाल्या, सन २००३ पासून हे प्रदर्शन दरवर्षी आयोजित केले जाते. प्रदर्शनात सर्व वयोगटातील दिव्यांग व्यक्ती सहभागी होतात. दिव्यांग व्यक्ती, त्यांच्यासाठी काम करणा-या संस्था आणि सामान्य नागरिक यांच्यात परस्पर संवाद व सहकार्य स्थापन करणे, हा या मागचा उद्देश आहे. दृष्टिहीन व्यक्ती आपले दैनंदिन आयुष्य कसे व्यतीत करत असतील याचे कौतुक आणि कुतूहल प्रत्येकाला असते. याबाबतीत त्यांच्याशी संवाद साधण्यात येणार आहे. दिव्यांगाना सक्षम करणे हाच प्रदर्शनाचा मुख्य उद्देश आहे.
प्रदर्शनात विद्या ज्योती स्पेशल स्कूल, प्रिझम फाउंडेशन, शिर्डी साईबाबा अंध महिला वृद्धाश्रम, संवाद, नंदनवन, स्मित फाऊंडेशन, उन्मेष फाउंडेशन, मैत्र फाऊंडेशन, मोहोर एंटरप्रायझेस इत्यादी भाग घेणार आहेत. प्रदर्शना दरम्यान धायरी येथील दृष्टीहिन वृद्ध महिला वायरचे बास्केट, मण्यांचे शोपीस तयार करण्याचे प्रात्यक्षिक सादर करतील . त्याशिवाय वेळोवेळी दिव्यांग कलाकार करमणुकीचे कार्यक्रम सादर करतील. प्रदर्शनाला प्रवेश विनामूल्य असून पुणेकरांनी मोठया संख्येने प्रदर्शनाला भेट द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.