पुणे – विश्व संवाद केंद्र आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्यावतीने माध्यम क्षेत्रात उल्लेखनीय कार्यासाठी देण्यात येणाऱ्या आद्य पत्रकार देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कार २०२४ ची घोषणा करण्यात आली आहे. ज्येष्ठ पत्रकार पुरस्काराने सकाळ माध्यम समूहाचे संपादक सम्राट फडणीस,महाराष्ट्र टाईम्सचे पुण्यातील बातमीदार प्रसाद पानसे, मराठी किडा या सोशल मीडिया पेजचे निर्माते सूरज खटावकर आणि प्रशांत दांडेकर, कोल्हापूर येथील टोमॅटो एफ.एम.च्या कार्यकारी निर्मात्या रसिका कुलकर्णी यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. अशी माहिती विश्व संवाद केंद्राचे अध्यक्ष अभय कुलकर्णी आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे परिषद व नियामक मंडळाचे कार्यवाह आनंद काटीकर यांनी पत्रकार परीषदेत दिली. यावेळी डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे कार्यकारिणी सदस्य मिलिंद कांबळे उपस्थित होते.
गुरूवार दि. 22 ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० वाजता फर्ग्युसन महाविद्यालयाच्या अॅम्फी थिएटरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येईल. ‘सांस्कृतिक राष्ट्रवाद आणि प्रसार माध्यमे’ या विषयावर यावेळी सुनील आंबेकर यांचे व्याख्यान होणार आहे.
या वेळी अभय कुलकर्णी म्हणाले, पुरस्कार उपक्रमाचे हे १३ वे वर्ष असून आद्य पत्रकार देवर्षी नारद यांच्या नावे हे पुरस्कार दरवर्षी देण्यात येतात. माध्यम क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या पश्चिम महाराष्ट्र प्रांतातील चार माध्यमकर्मींचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो. पुरस्काराचे स्वरूप ज्येष्ठ पत्रकार यांना २१ हजार रुपये रोख व देवर्षी नारद मूर्ती तर अन्य तीन पुरस्कार ११ हजार रुपये रोख व देवर्षी नारद मूर्ती असे आहे . भारतीय परंपरेतील आद्य पत्रकार म्हणून देवर्षी नारद यांना ओळखले जाते. दरवर्षी त्यांच्या नावाने हे पुरस्कार प्रदान करण्यात येतात. या पूर्वी हे पुरस्कार ’ए बी पी माझा’चे संपादक राजीव खांडेकर, ’झी २४ तास’चे डॉ. उदय निरगुडकर, ’तरुण भारत’ बेळगावचे संपादक किरण ठाकूर, ’दिव्य मराठी’चे संपादक प्रशांत दीक्षित, ’महाराष्ट्र टाईम्स’चे संपादक पराग करंदीकर, ’लोकसत्ता’ पुण्याचे निवासी संपादक मुकुंद संगोराम, ज्येष्ठ पत्रकार कै. दिलीप धारूरकर, ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर ’आज का आनंद’चे संपादक श्याम अग्रवाल, ज्येष्ठ पत्रकार अमित परांजपे, अभिजित अत्रे, नाशिकच्या देशदूतच्या संपादक वैशाली बालाजीवाले आदिंना देण्यात आले आहेत अशी माहिती त्यांनी दिली.
राष्ट्रीय विचारांनी प्रेरित विश्व संवाद केंद्राचे देशभर कार्य असून विविध राज्यातून ३० केंद्र कार्यरत आहेत. पुण्यातील केंद्राची स्थापना २०१४ मध्ये झाली असून पश्चिम महाराष्ट्र हे केंद्राचे कार्यक्षेत्र आहे. विश्व संवाद केंद्र राष्ट्रीय विचारांच्या प्रसार-प्रचाराचे कार्य करते. त्यासाठी केंद्रातर्फे माध्यमांशी माहितीची देवाणघेवाण करून समन्वय ठेवला जातो.
यावेळी आनंद काटीकर यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या वतीने विविध माध्यमांच्या क्षेत्रात उपलब्ध असणाऱ्या शिक्षणाच्या संधी आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या स्वायत्त डीईएस पुणे विद्यापीठ याविषयी माहिती दिली. त्यात माध्यम क्षेत्रात आता बातमीदारांसोबतच सर्व प्रिंट, इलेक्ट्रोनिक मीडियासाठी आवश्यक फोटोग्राफी,व्हिडीओग्राफी, वेब डिझायनर, ग्राफिक डिझायनर यासारखे विविध प्रकारचे शिक्षण अनेक विद्यार्थी घेत आहेत. अशी माहिती दिली. समारंभास माध्यम क्षेत्रातील पत्रकार व नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन विश्व संवाद केंद्र आणि डेक्कन एज्यूकेशन सोसायटीच्या वतीने करण्यात आले आहे.