भरत नाट्य संशोधन मंदिर, लायन्स क्लब ऑफ पुणे, सहकारनगर यांचा संयुक्त उपक्रम
पुणे : ताना मारणे म्हणजे नाट्यसंगीत नव्हे. नाट्यसंगीत सादर करताना शब्दांमागील विचार समजून घेत हृदयापासून गाणे उमटले पाहिजे. गायन सादर करताना अनुकरण न करता अनुसरण व्हावे. गायकाने आपल्यातील उपजत गुणवैशिष्ट्ये विकसित करावीत, असा ज्येष्ठत्वाचा सल्ला प्रसिद्ध गायक अभिनेत्री फैय्याज यांनी दिला.
भरत नाट्य संशोधन मंदिर, पुणे आणि लायन्स क्लब ऑफ पुणे, सहकारनगर यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र गंधर्व नाट्यसंगीत स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचे पारितोषिक वितरण फैय्याज यांच्या हस्ते आज (दि. 9) झाले. त्या वेळी त्या अध्यक्षपदावरून बोलत होत्या. भरत नाट्य मंदिर येथे स्पर्धा व पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता. भरत नाट्य संशोधन मंदिराचे अध्यक्ष पांडुरंग मुखडे, ज्येष्ठ ऑर्गन वादक राजीव परांजपे, लायन्स क्लबचे माजी प्रांतपाल चंद्रशेखर शेठ, लायन्स क्लब ऑफ पुणे, सहकारनगरच्या अध्यक्षा श्रद्धा हाटे, संयोजक डॉ. प्रसाद खंडागळे, मिलिंद तलाठी मंचावर होते.
स्पर्धेचे उद्घाटन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर यांच्या हस्ते झाले. या वेळी ह. भ. प. नारायण महाराज गोसावी, अशोक जाधव उपस्थित होते. स्पर्धेचे यंदाचे 13वे वर्ष असून स्पर्धेत गोव्यासह महाराष्ट्राच्या विविध भागातून 80 स्पर्धक सहभागी झाले होते. स्पर्धेचे परीक्षण संगीत रंगभूमीवर कार्यरत असलेल्या सुप्रसिद्ध गायक कलाकार चिन्मय जोगळेकर आणि सावनी दातार-कुलकर्णी यांनी केले. स्पर्धेच्या आयोजनासाठी कै. सुधाकर वामन खंडागळे अध्यासन, दुर्गम प्रतिष्ठान तसेच प्रदीप रत्नपारखे, नंदकुमार जाधव, दीपक दंडवते, रवींद्र पठारे यांचे सहकार्य लाभले.
स्पर्धकांशी संवाद साधताना फैय्याज पुढे म्हणाल्या, भविष्यात संगीत रंगभूमीवर पदार्पण करणार असाल तर नाट्यसंगीत सादर करताना चेहऱ्यावर भाव दर्शविता येणे आवश्यक आहे. नाट्यगीत हे संवादातून जे मांडायचे करायचे नाही ते व्यक्त करण्यासाठीचे माध्यम असण्याचे भानही ठेवावे. स्पर्धा संयोजकांचे कौतुक करून युवा कलाकारांसाठी मार्गदर्शक कार्यशाळा घेतल्या जाव्यात अशी सूचनाही त्यांनी केली.
स्पर्धेच्या माध्यमातून नाट्यसंगीत गाणाऱ्यांची नवीन पिढी घडत आहे याबद्दल चंद्रशेखर शेठ यांनी आनंद व्यक्त केला.
प्रास्ताविकात डॉ. प्रसाद खंडागळे म्हणाले, नवीन पिढीला अभिजात संगीताची, मराठी नाट्यसंगीताची ओळख व्हावी आणि ही परंपरा अखंडितपणे प्रवाहित रहावी या हेतूने स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे.
परीक्षकांच्या वतीने मनोगत व्यक्त करताना सावनी दातार-कुलकर्णी म्हणाल्या, स्पर्धकाने आपल्या आवाजाला पूरक गीत निवडावे. नाट्यगीत सादर करताना ती बंदिश वाटू नये याची काळजी घ्यावी तसेच सुरांकडे लक्ष द्यावे.
उद्घाटनसत्रात मनोगत व्यक्त करताना डॉ. पराग काळकर म्हणाले, अभिजात मराठी भाषा विकसित होण्यासाठी संगीत नाटकांची परंपरा जपली गेली पाहिजे. पारंपरिक कला, संस्कृती, ज्ञान पुढील पिढीपर्यंत प्रवाहित ठेवून कलेचा जागर करणे आवश्यक आहे.
मान्यवरांचा परिचय अभय जबडे यांनी करून दिला तर सूत्रसंचालन निलम खंडागळे यांनी केले. आभार प्रसाद कुलकर्णी यांनी मानले. स्पर्धेनिमित्त नाट्यगीताविष्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात ऐश्वर्या भोळे, वज्रांग आफळे, अनुष्का आपटे यांनी नाट्यगीते सादर केली. त्यांना मोहन पारसनीस (तबला), देवेंद्र पटवर्धन (संवादिनी) यांनी साथसंगत केली.
स्पर्धेचा सविस्तर निकाल
गट क्र. 1 : (वयोगट 8 ते 15) प्रथम आर्या लोहकरे, द्वितीय मनवा देशपांडे, मैत्री थत्ते. उत्तेजनार्थ शौनक कुलकर्णी, देव मुळे, ऋत्विक लोणकर.
गट क्र. 2 (वयोगट 16 ते 30) प्रथम श्रुती वैद्य, द्वितीय शार्दुल काणे, प्रणव बापट. उत्तेजनार्थ अर्णव पुजारी, सृष्टी तांबे.
गट क्र. 3 (वयोगट 31 ते 60) प्रथम बिल्वा द्रविड, द्वितीय संतोष बिडकर. उत्तेजनार्थ अमृता मोडक-देशपांडे.
गट क्र. 4 (वयोगट खुला) प्रथम संजय धुपकर, द्वितीय मेघना जोशी. उत्तेजनार्थ श्रीकांत बेडेकर.