इंदापूर : तालुक्यातील निमसाखर येथे श्री स्वामी समर्थ महाराजांची चैत्र पौर्णिमा मोठ्या भक्तिभाव आणि उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
सकाळी श्री स्वामी समर्थांची ग्रामप्रदक्षिणा काढण्यात आली. गावभर भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते. यावेळी हरिभक्त परायण नागनाथ महाराज क्षिरसागर (पंढरपूर) यांचे प्रवचन झाले. त्यांच्या प्रवचनाने उपस्थित भाविकांना आध्यात्मिक प्रेरणा मिळाली.
यानंतर श्री स्वामींची आरती आणि जप करण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व स्वामीभक्तांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. महाप्रसादाची व्यवस्था लहू पांडुरंग दरेकर यांच्या वतीने करण्यात आली.
पालखीची आकर्षक फुलांनी सजावट राजेंद्र मारुती घोडे यांनी केली होती, तर मंदिर परिसरातील सुंदर रांगोळीची सेवा शितल सुनील टकले यांनी साकारली.
तसेच मंदिरात विनोद हनुमंत चव्हाण यांचा भजनाचा कार्यक्रम पार पडला. त्यांना महादेव भजनी मंडळाने साथ दिली.
या धार्मिक सोहळ्यासाठी गावातील स्वामीभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. संपूर्ण कार्यक्रम भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.


