15.1 C
New Delhi
Friday, December 27, 2024
Homeमहाराष्ट्रपालखी सोहळ्यात  वारकऱ्यांसाठी आवश्यक सुविधांचे नियोजन करा!

पालखी सोहळ्यात  वारकऱ्यांसाठी आवश्यक सुविधांचे नियोजन करा!

उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पालखी सोहळ्याच्या पूर्वतयारीसाठी आढावा बैठक संपन्न

पिंपरी : आषाढी पालखी सोहळ्यादरम्यान पंढरपूर, पालखी मार्ग, पालखी तळ आदी ठिकाणी पाणी, वीज, आरोग्य आणि स्वच्छतेच्या पुरेशा सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात, असे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. सोहळ्यासाठी शासनातर्फे आवश्यक निधी देण्यात येईल अशी ग्वाहीदेखील त्यांनी दिली.

विधान भवन पुणे येथे झालेल्या श्री क्षेत्र देहू व श्री क्षेत्र आळंदी पालखी सोहळा-२०२४ पूर्वतयारी आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस आमदार दिलीप मोहिते पाटील, संजय जगताप, दत्तात्रय भरणे, समाधान आवताडे, बबनदादा शिंदे,संजय शिंदे, सुनील कांबळे, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पुणे महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, पीएमआरडीए आयुक्त राहुल महिवाल, पुणे आणि सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, वरिष्ठ पोलीस अधिकारी, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील,  शहर अभियंता मकरंद निकम,  मुख्य अभियंता रामदास तांबे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, उपआयुक्त रविकिरण घोडके, अण्णा बोदडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, मुख्य आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर आदी उपस्थित होते.

श्री.पवार म्हणाले, पालखी सोहळ्यासाठी फिरते शौचालय आणि टँकरची पुरेशी व्यवस्था करण्यात यावी. शौचालयाच्या स्वच्छतेवर विशेष लक्ष द्यावे. राज्य शासनाकडून पालखी सोहळ्यासाठी आवश्यक कामासाठी उपलब्ध करून देण्यात येणारा निधी प्राप्त होईपर्यंत जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून खर्च करावा.

इंद्रायणी नदी स्वच्छतेचे काम तातडीने करण्यात यावे. पालखी सोहळा झाल्यानंतर पंढरपूर शहरात स्वच्छतेसाठी आवश्यक नियोजन करण्यात यावे. मानाच्या पालख्यांसह इतर पालख्यांसाठी रात्रीच्या वेळी विद्युत व्यवस्था करण्यात यावी. पालखी मार्गाला लागून असलेल्या जागा सोहळ्याच्यादृष्टीने कायमस्वरूपी ताब्यात घेऊन त्याचा पालखी सोहळा वगळता इतर वेळी अन्य उपयोग करण्याबाबत प्रस्ताव तयार करावा. अशा जागांवर अतिक्रमण होणार नाही याची दक्षता घ्यावी. पालखी मार्गावरील कायमस्वरुपी सुविधेच्यादृष्टेने विभागीय आयुक्तांकडे  बैठकीचे आयोजन करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

पालखी सोहळ्याच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या सूचनांची अधिकाऱ्यांनी नोंद घेऊन आवश्यक कार्यवाही करावी. पालखी सोहळा चांगल्यारितीने संपन्न व्हावा यासाठी शासन- प्रशासनातर्फे आवश्यक सर्व सहकार्य करण्यात येईल. शासनाचे सर्व विभाग सकारात्मक राहून सोहळा यशस्वी करण्यासाठी काम करतील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

अन्य जिल्ह्यातून येणाऱ्या पालखी सोहळ्यासाठी सुरक्षा आणि अन्य व्यवस्था देण्याबाबत राज्य स्तरावरून सूचना देण्यात येतील. वारी दरम्यान दुर्घटना घडल्यास शासनातर्फे आर्थिक सहकार्य करण्यात येईल, असेही श्री.पवार यांनी सांगितले.

विभागीय आयुक्त श्री. पुलकुंडवार यांनी सादरीकरणाद्वारे करण्यात आलेल्या नियोजनाची माहिती दिली. यावर्षी फिरते शौचालय आणि स्वच्छतेसाठी मनुष्यबळ अधिक संख्येने ठेवण्यात आले आहेत. रस्त्याची सुरू असलेली कामे पालखी सोहळ्यापूर्वी पूर्ण करण्यात येणार आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे आषाढी वारीसाठी ॲप आणि प्रशासनातर्फे संपर्क पुस्तिका तयार करण्यात येईल. स्वच्छ आणि निर्मल वारीसाठी विशेष नियोजन करण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.

पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी सुरक्षा आणि वाहतूक नियोजनाबाबत माहिती दिली.

यावेळी लोकप्रतिनिधींनी पालखी सोहळ्यासाठी आवश्यक सूचना केल्या. उपमुख्यमंत्री श्री.पवार यांच्या हस्ते पालखी सोहळ्यादरम्यान करण्यात येणाऱ्या शौचालय सुविधांची माहिती देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या ॲपचे लोकार्पण करण्यात आले.

पुणे जिल्ह्यात तयारी अंतिम टप्प्यात
जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे यांनी पुणे जिल्ह्यात केलेल्या पूर्वतायरीची माहिती दिली. पालखी सोहळ्यासाठी ३ हजारपेक्षा अधिक अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जेजुरी पालखी तळाची कामे सुरू करण्यात आली आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासाठी १ हजार ८००, श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी १ हजार २०० आणि संत सोपान महाराज पालखी सोहळ्यासाठी २५०  शौचालयांची सुविधा करण्यात येणार आहे.

आषाढी वारीसाठी २०० पाण्याच्या टँकरची व्यवस्था करण्यात आली असून ४५ ठिकाणी पाणी भरण्याची सुविधा असणार आहे. ११२ वैद्यकीय अधिकारी आणि ३३६ कर्मचाऱ्यांची आरोग्यसेवेसाठी पालखी मार्गावर नियुक्ती करण्यात आली आहे. ११५ आरोग्य पथके, warkari ५७ फिरते वैद्यकीय पथक आणि १७९ रुग्णवाहिकेद्वारे आरोग्य सुविधा करण्यात येणार आहे. १२ ठिकाणी हिरकणी कक्ष उभारण्यात येईल.waripandharichi

अन्न व औषध प्रशासनातर्फे खाद्य आणि पेय पदार्थांची तपासणी करण्यात येणार आहे. मोबाईल टॉवरची नेटवर्क फ्रिक्वेंसी वाढविण्यात येणार आहे. पालखी मार्गावर असलेल्या शासकीय आणि खाजगी रुग्णालयातील १० टक्के खाटा आरक्षित ठेवण्यात येणार आहेत. जिल्हा परिषद, पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेतर्फे आवश्यक नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

सातारा जिल्ह्यातील नियोजन
अपर जिल्हाधिकारी जीवन गलांडे यांनी सातारा जिल्ह्यातील नियोजनाची माहिती दिली. दत्त घाटाचे काम ३० जूनपर्यंत पूर्ण करण्यात येईल. पालखी तळ आणि विसाव्याच्या ठिकाणी आवश्यक सुविधा व दुरुस्ती करण्यात येत आहे. लोणंद पालखी तळावर नियंत्रण कक्ष उभारण्यात येणार आहे. येथे २५ फिरते आरोग्यदूत आणि ८ आरोग्य पथके असतील.ashadhiwari

पालखी सोहळ्यासाठी आवश्यक सुरक्षा, पिण्याचे पाणी आणि वाहतूक नियोजनाबाबत व्यवस्था करण्यात आली आहे. पालखी मुक्कामाच्या ठिकाणी पुरेशा प्रमाणात औषधांची सुविधा करण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली.

सोलापूर जिल्ह्यातील नियोजन
जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांनी सोलापूर जिल्ह्यातील नियोजनाची माहिती दिली.  सोलापूर जिल्ह्यात करण्यात आलेल्या आरोग्य सुविधा, नियुक्त करण्यात आलेले आरोग्यदूत, घटना प्रतिसाद प्रणाली, आपत्ती व्यवस्थापन व मदत केंद्र याबाबत नियोजन  करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

मागील वर्षी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या सूचनेनुसार दर्शन बारीमधील प्रत्येक वारकऱ्याला एक लिटर पाण्याची बाटली व लिंबू पाणी देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच पंढरपूर शहर व परिसरात स्वच्छता, पिण्याचे स्वच्छ पाणी, शौचालय, वारकऱ्यांच्या राहण्याच्या व्यवस्थेसह स्वच्छ वारी, निर्मल वारीच्यादृष्टीने सर्व नियोजन करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.ajit_pawar

यावेळी पालखी प्रमुखांनी प्रशासनाला सूचना केल्या. त्या सूचनेनुसार आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी दिले. बैठकीस श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान समिती, श्री संत तुकाराम महाराज  संस्थान, श्री संत सोपान महाराज पालखी सोहळा, श्री संत निळोबाराय संस्थान, श्री संत चांगावटेश्वर महाराज पालखी  सोहळ्यातील पदाधिकारी आणि विविध विभागांचे अधिकारी  उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
mist
15.1 ° C
15.1 °
15.1 °
77 %
0kmh
40 %
Fri
22 °
Sat
18 °
Sun
20 °
Mon
22 °
Tue
19 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!