पुणे – पुणे शहरात मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच उष्णतेची तीव्रता वाढू लागली असून नागरिकांना उन्हाचा तडाखा बसू लागला आहे. गेल्या २४ तासांत कमाल तापमानात एक ते दीड अंशांनी वाढ झाली असून शनिवारी शहरातील लोहगाव परिसरात तापमान तब्बल ३९ अंशांपर्यंत पोहोचले.
कोरेगाव पार्क, शिवाजीनगर आणि चिंचवड परिसरातही उष्णतेचा वाढता चटका जाणवत असून दुपारच्या वेळेत नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे. मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात शहरासह जिल्ह्यात दुपारी १२ ते ३ या वेळेत सूर्याचा तडाखा अधिक जाणवत आहे.
शहराच्या मध्यवर्ती भागासह कोरेगाव पार्क, पाषाण, मगरपट्टा, हडपसर तसेच जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्येही उष्णतेच्या झळा वाढत आहेत. विदर्भानंतर आता पुणे शहरातही उन्हाची तीव्रता वाढत असल्याचे दिसून येत आहे.
आज विदर्भात तापमान ४१ अंशांपर्यंत गेले असताना पुणे शहरातही पारा ३९ अंशांपर्यंत पोहोचला आहे. लोहगाव आणि कोरेगाव पार्क येथे सर्वाधिक ३८.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. लवळे येथे ३७.१, चिंचवड येथे ३६.८, शिवाजीनगर येथे ३६.६ तर मगरपट्टा परिसरात ३५.९ अंश कमाल तापमान नोंदवले गेले.
सलग चौथ्या दिवशी तापमानात वाढ होत असल्याने पुणेकर घामाघूम झाले आहेत. वाढत्या उष्णतेमुळे चक्कर येणे, डोकेदुखी, पोटदुखी, अशक्तपणा यांसारखे त्रास होण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे नागरिकांनी दुपारी १२ ते ४ या वेळेत घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन करण्यात येत आहे. कामानिमित्त बाहेर पडणाऱ्यांनी डोक्यावर टोपी वापरणे, नाका-तोंडाला रुमाल बांधणे तसेच अंग झाकणारे कपडे घालणे आवश्यक असल्याचा सल्लाही देण्यात आला आहे.
दरम्यान, शहरासह जिल्ह्यात पुढील तीन ते चार दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. कमाल आणि किमान तापमानात आणखी वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला असून येत्या दिवसांत उन्हाचा चटका आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.


