निगडी- शहरातील रस्त्यांवरील पायाभूत सुविधांचा कायापालट करण्याच्या उद्देशाने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महत्त्वाकांक्षी हरित सेतू प्रकल्पाला 19 सप्टेंबर रोजी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.निगडी – शहरातील नागरिकांना आरोग्यदायी वातावरण उपलब्ध व्हावे तसेच पर्यावरणपूरक जीवनमान अधिक उंचावण्यासाठी हा उपक्रम पथदर्शी ठरणार आहे. तसेच पर्यावरणपूरक साधनांचा प्रभावी वापर करून शहरभर पसरलेल्या हरित क्षेत्रांना एकमेकांना जोडल्यास शहराची पर्यावरणीय गुणवत्ता वाढून त्याचा लाभ शहरवासियांना व्हावा यासाठी हा प्रकल्प उपयुक्त ठरणार आहे.
पिंपरी-चिंचवडमधील वाढती रहदारी आणि शहरी विस्तारामुळे रस्त्यांचा विकास आराखडा ( Nigdi) तयार करून पादचारी, सायकलस्वार आणि सार्वजनिक वाहतूक वापरकर्त्यांसह सर्व नागरिकांच्या गरजा याद्वारे पुर्ण करण्यावर महापालिकेने भर दिला आहे. आंतरराष्ट्रीय मानांकनांच्या आधारे आधुनिक रस्त्यांचे जाळे तयार करण्यासाठी हरित सेतू प्रकल्पाची अंमलबजावणी शहरात करण्यात आली आहे. या प्रकल्पाला ब्लूमबर्ग फिलान्थ्रॉपीज आणि ग्लोबल डिझायनिंग सिटीज इनिशिएटिव्ह (जीडीसीआय) सारख्या जागतिक संस्थेचे सहकार्यही मिळाले आहे, जेणेकरून तज्ञ मार्गदर्शक या प्रकल्पास जोडले गेले आहेत. पिंपरी-चिंचवड शहरातील प्राधिकरण भागातील 5 चौ.कि.मी क्षेत्राची या पायलट ( Nigdi) प्रोजेक्टसाठी निवड करण्यात आली असून त्यामध्ये अच्छादित पदपथ व सायकल ट्रॅक विकसित करण्याचे महापालिकेचे नियोजन आहे. अर्बन स्ट्रीट डेव्हलपमेंट अंतर्गत विकसित करण्यात येणाऱ्या या प्रकल्पाचे उद्दिष्ट नागरिकांसाठी आरोग्यपूर्ण, स्वच्छतापुर्ण आणि पर्यावरणपूरक परिसर तयार करणे हे आहे. यामुळे खासगी मोटार वाहनावरील अवलंबित्व कमी होण्यास मदत मिळेल तसेच लहान मुले, दिव्यांग आणि वयोवृद्धांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण होईल.