जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिटयूटस् तर्फे सुशिला चव्हाण, रत्नप्रभा जगताप, प्रमिला सांकला यांना आदर्श माता पुरस्कार
पुणे : माहेर मध्ये आज अनेक लोक राहतात. जे रस्त्यावर राहतात, त्यांच्यासाठी ही संस्था सुरु केली. संस्थेच्या प्रवेशद्वारासमोर ठेवलेल्या मुलांना आम्ही सांभाळले. मला पैशासाठी काम करायचे नाही. प्रेम हाच धर्म आहे हे मानून मी कार्य करीत आहे. तसेच काम समाजात व्हायला हवे, असे मत माहेर संस्थेच्या संस्थापिका व ज्येष्ठ समाजसेविका सिस्टर लुसी कुरियन यांनी व्यक्त केले.
जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिटयूटस् च्यावतीने सहावा आदर्श माता पुरस्कार न-हे येथील प्राचार्य डॉ. सुधाकरराव जाधवर सभागृहात प्रदान करण्यात आला. यावेळी मुंबईच्या पोलीस उपायुक्त अश्विनी सानप, महाराष्ट्र राज्याचे मृद व जलसंधारण मुख्य सचिव सुनिल चव्हाण, सिद्धीविनायक ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष राजेश सांकला, कर्नल महादेव घुगे, राहुल जगताप, पूजा पारगे, प्राचार्य डॉ.सुधाकर जाधवर, उपाध्यक्ष अॅड. शार्दुल जाधवर, खजिनदार सुरेखा जाधवर आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्याचे मृद व जलसंधारण मुख्य सचिव सुनिल चव्हाण यांच्या मातोश्री सुशिला चव्हाण, पुण्याचे माजी महापौर प्रशांत जगताप यांच्या मातोश्री रत्नप्रभा जगताप आणि सिद्धीविनायक ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष राजेश सांकला यांच्या मातोश्री प्रमिला सांकला यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. साडी, श्रीफळ, पुणेरी पगडी, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे. पुरस्काराचे यंदा सहावे वर्ष असून संस्थेच्या खजिनदार सुरेखा सुधाकरराव जाधवर यांच्या वाढदिवसानिमित्त हा विशेष सोहळा आयोजित करण्यात आला.
अश्विनी सानप म्हणाल्या, निस्वार्थी, त्याग व समर्पण भावनेने मुलांना वाढविले आणि त्या मुलांच्या नावाने आज आपली ओळख करून दिली जाते, हे प्रत्येक मातेचे भाग्य आहे. प्रत्येक माता आपल्याला पाल्याला आदर्श असेच घडवत असते. तरी देखील काही प्रवृत्त्ती वेगळ्या वाटेवर चालतात, त्यावेळी त्या मातेला अतिशय दुःख होत असते. आईच्या संस्कारातून समाज घडविण्याचे कार्य करण्याकरिता प्रत्येकाने प्रयत्न करायला हवा. भारतात वृद्धाश्रम खूप मोठया प्रमाणात वाढत आहेत. विभक्त कुटुंब पद्धतीमध्ये आई-वडिलांना स्थान मिळत नाही. आई-वडिलांच्या कष्टाची जाणीव प्रत्येकाने ठेवायला हवी.
पुरस्काराला उत्तर देताना प्रमिला सांकला म्हणाल्या, आईकडून आपल्याला शिकवण मिळते. समाजसेवेचे गुण मी माझ्या आईकडून घेतले आहेत. समाजातील गरजूंना पाहून खूप दुःख वाटते. त्यामुळे अशांची सेवा करण्याचे व्रत मी घेतले आहे.
अॅड. शार्दुल जाधवर म्हणाले, आईचे महत्व अनन्यसाधारण आहे. नेहमीच पडद्यामागे राहून प्रत्येक आई मुलांना घडवीत असते. आईने लहानपणापासून केलेले संस्कार, योग्य शिक्षण आणि मार्गदर्शन यामुळे प्रत्येक व्यक्ती आपापल्या क्षेत्रात यशाचे शिखर गाठू शकतो. त्या प्रत्येक यशस्वी व्यक्तीमागे त्यांच्या आईचे अमूल्य योगदान असते. त्यामुळे समाजातील अशाच यशस्वी व्यक्तींच्या मातांचा सन्मान संस्थेतर्फे केला जातो, असेही त्यांनी सांगितले. रत्नप्रभा जगताप, सुनील चव्हाण, राजेश सांकला यांनी मनोगत व्यक्त केले.