27.3 C
New Delhi
Tuesday, August 26, 2025
Homeमहाराष्ट्र'भारूड म्हणजे बहुरूढींचे दर्शन!' - ह. भ. प. लक्ष्मणमहाराज राजगुरू

‘भारूड म्हणजे बहुरूढींचे दर्शन!’ – ह. भ. प. लक्ष्मणमहाराज राजगुरू

शिव - फुले - शाहू - आंबेडकर - लोकमान्य व्याख्यानमाला - अंतिम पुष्प

पिंपरी- ‘भारूड म्हणजे बहुरूढींचे दर्शन होय!’ असे प्रतिपादन भारुडसम्राट ह. भ. प. लक्ष्मणमहाराज राजगुरू यांनी सोमवार, दिनांक १२ मे २०२५ रोजी श्री दत्त मंदिर चौक, मोहननगर, चिंचवड येथे केले. जय भवानी तरुण मंडळ आयोजित सहा दिवसीय शिव – फुले – शाहू – आंबेडकर – लोकमान्य व्याख्यानमालेत ‘अरे अरे माणसा तू कधी होशील रे माणूस? जगण्याचे अंतिम सत्य!’ या विषयावरील अंतिम पुष्प गुंफताना बहुरंगी, बहूढंगी भारुडांचे सादरीकरण करीत त्यांनी श्रोत्यांना हसवत हसवत अंतर्मुख केले. यावेळी विधानपरिषद आमदार उमा खापरे, अमित गोरखे, माजी नगरसेविका ॲड. वैशाली काळभोर, माजी नगरसेवक प्रमोद कुटे, अजित गव्हाणे, शीतल शिंदे, सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे, महेश कुलकर्णी, राजाभाऊ गोलांडे, रवींद्र नामदे, विशाल काळभोर, नेताजी शिंदे, संदीप म्हेत्रे, नामदेव ढाके, अनिल कुंकूलोळ, मुख्य संयोजक मारुती भापकर आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. प्रमोद कुटे यांनी, ‘समाजात स्वार्थाच्या पलीकडे जाऊन कार्य करणारे कार्यकर्ते दुर्मीळ झालेले असताना सुमारे पंचवीस वर्षांपासून जय भवानी तरुण मंडळाच्या माध्यमातून सामाजिक कार्य अविरतपणे सुरू आहे. मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या व्याख्यानमालेत महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरील अनेक विचारवंतांनी आजतागायत प्रबोधनात्मक योगदान दिलेले आहे!’ असे गौरवोद्गार काढले.

लक्ष्मणमहाराज राजगुरू पुढे म्हणाले की, ‘लोकरंजन आणि मनोरंजनाच्या माध्यमातून प्रापंचिक माणूस परमार्थाकडे वळावा यासाठी एकनाथ महाराजांनी भारुडे रचली. त्यामुळे भारुडांमधील शब्दार्थ न पाहता त्यांचा लाक्षणिक अर्थ विचारात घेतला पाहिजे. भगवंताने आपल्याला दिलेला नरदेह हा अनमोल आहे म्हणून त्याचा विधायक कामासाठी उपयोग केला पाहिजे. मांसाहार आणि मद्यपान हा आसुरी आहार असून कोणत्याही देवदेवता बकरे – कोंबडे मागत नाहीत. नवससायास करणे, अंगात येणे या अंधश्रद्धा आहेत. देव निरपेक्ष भक्तीचा भुकेला आहे, हे सर्व संतांनी पोटतिडकीने सांगितले आहे!’

आई भवानी, गोंधळी, बोहारीण, बहुरूपी अशी विविध सोंगे घेऊन लक्ष्मणमहाराज यांनी श्रोत्यांचे मनोरंजन करीत प्रभावीपणे प्रबोधन केले. याप्रसंगी ज्ञानेश्वरमाउली, तुकोबाराय, एकनाथमहाराज, कबीर, जनाबाई यांच्या भक्तिरचना सादर करीत किसन साळुंखे, देवा भिसे, विशाल दराडे, प्रसाद राजगुरू आणि घाडगेमहाराज यांनी सुश्राव्य सांगीतिक साथसंगत केली. जय भवानी तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी व्याख्यानमालेच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. राहुल शिंपले यांनी सूत्रसंचालन केले. मारुती भापकर यांनी आभार मानले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
overcast clouds
27.3 ° C
27.3 °
27.3 °
88 %
3.7kmh
100 %
Mon
27 °
Tue
35 °
Wed
35 °
Thu
36 °
Fri
34 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!