कैवल्यसम्राट ज्ञानेश्वरमाउलींच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या चऱ्होलीच्या पावन भूमीत सव्वाशे वर्षांपासून गावाच्या जडणघडणीत तापकीर कुटुंबाचे महत्त्वाचे योगदान राहिले आहे. जुन्या काळातील लोक लक्ष्मण गणपत तापकीर यांची आठवण काढतात. त्यांनी चऱ्होलीची पाटिलकी भूषविली होती. वारकरी संप्रदायातील असल्याने विनामोबदला त्यांनी गावकऱ्यांना सातबारासारख्या महत्त्वाच्या कागदपत्रांबाबत मदत केली. गावातील भजनकरी मंडळींपैकी एक प्रमुख भजनकरी असल्याने त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी तापकीर यांच्या निवासस्थानी भजनाचा कार्यक्रम आयोजित केला जातो. त्यांचे सुपुत्र ह. भ. प. भानुदासमहाराज लक्ष्मण तापकीर हे श्री वाघेश्वर विद्यालयाच्या पहिल्या वर्षाचे प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेले विद्यार्थी होत. त्यांनी गावामध्ये श्री वाघेश्वर व्हॉलीबॉल संघ स्थापन करून त्याद्वारे केवळ चऱ्होली पंचक्रोशीतच नव्हेतर महाराष्ट्रभर गावाचे नाव पोहोचवले होते. खेळाच्या माध्यमातून त्यांना आर. टी. ओ. मध्ये नोकरी मिळाली होती. मागील पिढीतील उत्कृष्ट व्हॉलीबॉलपटू अशी ख्याती, आर.टी.ओ.मधील सेवानिवृत्त कर्तव्यदक्ष अधिकारी हा लौकिक आणि अध्यात्मातल्या संतसाहित्याचे व्यासंगी अभ्यासक ही आदरयुक्त प्रतिमा लाभलेल्या ह. भ. प. भानुदासमहाराज तापकीर यांच्या संस्कारातून संदीपआबा, श्रीकांतअण्णा, सिद्धार्थअप्पा आणि सारंगनाना यांनी वेगवेगळ्या क्षेत्रांत आपल्या कार्यकर्तृत्वाची नाममुद्रा कोरलेली आहे. संदीपआबा तापकीर हे प्रथितयश साहित्यिक सुप्रसिद्ध शिवव्याख्याते आणि इतिहासअभ्यासक म्हणून अवघ्या महाराष्ट्रभर सुपरिचित आहेत. त्यांनी महाराष्ट्रातील
४५० पेक्षा अधिक किल्ले पाहिले आहेत. त्यांची १७ हून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांनी महाराष्ट्रातील किल्ल्यांवरचा पहिला दिवाळी अंक सुरू केला असून त्याला अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. त्यांनी गावात श्री भैरवनाथ आदर्श ग्रंथालय सुरू केले होते. त्यामार्फत अनेक मान्यवरांना गावात सर्वप्रथम आणले. ‘मृत्युंजय’कार शिवाजी सावंत, पद्मश्री नारायण सुर्वे अशा अनेक दिग्गजांचा त्यामध्ये समावेश आहे. संदीपआबा हे इंद्रायणी साहित्य परिषदेचे अध्यक्ष असून ही साहित्यिक चळवळ ते जोमाने चालवत आहेत. श्रीकांतअण्णा तापकीर यांनी समाजाभिमुख राहून चऱ्होली आणि आसपासच्या पंचक्रोशीत सामाजिक कार्यकर्ता म्हणून कीर्ती मिळवली आहे. विशेषत: २००७ पासून कार्यसम्राट आमदार महेशदादा लांडगे यांच्या प्रभावळीतील निष्ठावान कार्यकर्ते म्हणून ते ओळखले जातात. सिद्धार्थअप्पा तापकीर हे कोल्हापूरच्या तालमीत पैलवानकीचे प्रशिक्षण घेऊन आले आहेत; तर सारंग उर्फ नवनाथनाना तापकीर वाघेश्वर महाराजांच्या उत्सवातील नियोजनात नेहमीच अग्रेसर असतात. त्यामुळे गावकरी त्यांना ‘कारभारी’ या नावाने संबोधित असतात. सिद्धार्थअप्पा आणि सारंगनाना यांनी कष्टकऱ्यांच्या हाताला काम देणारे सहृदयी लेबर काॅन्ट्रक्टर म्हणून असंख्य श्रमिकांचे आशीर्वाद अन् शुभेच्छांचे संचित आपल्या गाठीशी बांधले आहे.
पिंपरी – चिंचवडच्या राजकीय परिप्रेक्ष्यात २००७ मध्ये मोठ्या प्रमाणावर बदलाचे वारे वाहू लागले. त्यातूनच सन्माननीय महेशदादा लांडगे यांच्या आमदारकीची मुहूर्तमेढ चऱ्होली गावातच रोवली गेली. शिवशंकर प्रतिष्ठान आणि चऱ्होली सोशल फाउंडेशन या दोन संस्थांच्या माध्यमातून निष्ठावान कार्यकर्त्यांचे मोठे पाठबळ महेशदादांच्या मागे उभे करण्यात आले. अर्थातच, त्याची परिणती म्हणजे महाराष्ट्रातील राजकीय पटलावर सन्माननीय आमदार महेशदादा लांडगे यांच्या दूरदर्शी नेतृत्वाचा उदय झाला. सदैव त्यांच्या ठायी समर्पित भावनेने निष्ठा अर्पण केलेल्या कार्यकर्त्यांच्या वरच्या फळीतील एक नाव म्हणजेच
श्रीकांतअण्णा तापकीर होय.
नुकतेच महानगरपालिकेच्या निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत. प्रभाग क्रमांक तीनमध्ये चऱ्होली, डुडुळगाव, मोशी आणि आसपासचा परिसर येतो. सुमारे ७२,५०० मतदारांचा हा प्रभाग त्यामुळेच महत्त्वाचा मानला जातो. या प्रभागातील चार जागांपैकी सर्वसाधारण महिला या निकषावर सौ. मनीषाताई सिद्धार्थअप्पा तापकीर यांची उमेदवारी जाहीर करावी, अशी संपूर्ण प्रभागातील नागरिकांची मनापासून इच्छा अन् आग्रहाची मागणी आहे; कारण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून अर्थशास्त्र या विषयात पदवीधर असलेल्या मनीषाताई या सुस्वभावी आहेत. त्यामुळेच समाजाच्या सुखदुःखाशी त्यांची नाळ जुळलेली आहे. पूर्वीची छोटी खेडी असलेल्या चऱ्होली, डुडुळगाव, मोशी अन् लगतचा परिसर हा खूप झपाट्याने बदलत चालला आहे. विशेषत: पिंपरी – चिंचवड महानगरपालिकेत समावेश झाल्यानंतर गावाची मराठमोळी संस्कृती जपून शहरीकरणाच्या आधुनिक, स्मार्ट रूपाचे हार्दिक स्वागत करणे गरजेचे आहे. वेगाने होत असलेले शहरीकरण, जवळपास असलेल्या औद्योगिक वसाहतींमुळे भारताच्या सर्व भागांतून उपजीविकेसाठी मोठ्या संख्येने स्थलांतरित होत असलेला जनप्रवाह यांमुळे मूलभूत नागरी सुविधा, प्रशस्त रस्ते, लहान मुले – महिला आणि ज्येष्ठ नागरिक यांच्या वेगवेगळ्या समस्या आणि प्रश्न यांची नेमकी जाण मनीषाताईंना आहे. त्यामुळेच त्यांची उमेदवारी ही शाश्वत विकासाची नांदी ठरणार आहे. त्यांतून लहान मुलांसाठी क्रीडांगण, संस्कार केंद्र, अत्याधुनिक शाळा, तरुणांना स्पर्धा परीक्षांसाठी आत्मविश्वास देणाऱ्या अभ्यासिका, महिलांच्या सुप्त कलागुणांना वाव देणारी सांस्कृतिक केंद्र, बचत गट, ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र, आरोग्य सुविधा पुरविणारी रुग्णालये, सर्वांसाठी समृद्ध ग्रंथालये, मनोहर उद्याने अशी अनेक विकासकामे साध्य करायची असतील, तर त्यासाठी नगरसेविका पद हे एक अत्यावश्यक साधन आहे. सुदैवाने सौ. मनीषाताईंकडे अठरा सदस्य असलेल्या एकत्र कुटुंबपद्धतीचा, सुसंस्कृत अन् सुसंवादी घराचा उत्तम अनुभव आहे. आजतागायत राजकीय पदापासून दूर राहूनही ह. भ. प. भानुदासमहाराज तापकीर यांच्या कुटुंबीयांनी सामाजिक संस्थांच्या माध्यमातून अनेक साहित्यिक, सामाजिक, सांस्कृतिक उपक्रम राबविले आहेत. हळदीकुंकू, खेळ पैठणीचा, रक्तदान शिबिर, आरोग्यदूतांचा सन्मान, मराठवाडा आणि सोलापूर येथील महापूरग्रस्तांना मदतीचा हात, क्रिकेट स्पर्धा, अष्टविनायक यात्रा, स्नेहमेळावा, प्रबोधनात्मक व्याख्याने अशी कितीतरी मोठी जंत्री याबाबत सांगता येईल. यासाठीच महानगरपालिकेची निवडणूक लढविणे हा लोकशाहीमधील एक सर्वमान्य मार्ग आहे; आणि म्हणूनच कार्यकर्त्यांच्या
जनादेशाचा आदर करणे, हे मनीषाताईंचे आद्यकर्तव्य आहे.
जागतिक स्तरावर भारताची विश्वगुरू म्हणून दमदार वाटचाल सुरू झाली आहे. अतिशय वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था म्हणूनही संपूर्ण जग भारताच्या प्रगतीकडे थक्क होऊन पाहत आहे. केंद्रीय नेतृत्वाने सर्व क्षेत्रांत महिला सक्षमीकरणाचे धोरण राबवून नारीशक्तीला सातत्याने मानवंदना दिली आहे. अर्थातच, त्यामुळेच जे दिल्लीत तेच गल्लीतही घडले पाहिजे. ग्रामदैवत श्री वाघेश्वराचे कृपाछत्र, ज्ञानेश्वरमाउली अन् जगद्गुरू तुकोबाराय यांचे आशिष, ह. भ. प. भानुदासमहाराजांचे आशीर्वाद, समस्त तापकीर कुटुंबीयांची साथ, आमदार महेशदादा लांडगे यांचे मार्गदर्शन आणि सुजाण मतदारांचा हार्दिक पाठिंबा यांच्या बळावर सौ. मनीषाताई सिद्धार्थ तापकीर नक्कीच विजयश्री खेचून आणतील, यांत काहीच शंका नाही!


