तळेगाव दाभाडे, :
मराठी भाषेला जिवंत ठेवण्यासाठी आपल्याला स्वाभिमानाने प्रयत्न करावे लागतील. मराठी भाषेत एखाद्याला स्टार करण्याची ताकद आहे. बदलत्या काळात बदललेली भाषा समजून घेऊन वाटचाल करणे ही काळाची गरज आहे. 16 व्या शतकात छत्रपती शिवाजी महाराजांनी ‘मराठी
भाषा राज्य व्यवहार कोश’ तयार करून कालातीत विचार मराठीच्या अनुषंगाने रुजवला, ही अतिशय प्रेरणादायी बाब आहे. खरे तर हे मराठी भाषेला जिवंत ठेवण्याचे पहिले पाऊल आहे. मराठी मातृभाषेतील ज्ञान ही उद्याची स्वप्न पूर्ण करणारी समृद्ध भाषा आहे. त्यामुळे भाषेचा न्यूनगंड न बाळगता प्रगतीच्या शिखरावर जाण्यासाठी युवकांनी धडपडले पाहिजे, असे गौरवोद्गार ‘जग बदलणारा बाप माणूस’ या पुस्तकाचे लेखक, साहित्यिक जगदीश ओव्हाळ यांनी काढले.
इंद्रायणी महाविद्यालय मराठी विभागातर्फे आयोजित ‘मराठी भाषा गौरव दिना’च्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे, मराठी विभागप्रमुख डॉ. विजयकुमार खंदारे, सचिन शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
‘मराठी भाषा आणि साहित्य’ यांची गुंफण करत पुढे बोलताना ओहोळ म्हणाले, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे इतर भाषांचा द्वेष न करता मातृभाषेतून शिक्षण घेऊन आपल्याला ज्ञानाचे शिखर चढता येणे सहज शक्य झाले आहे. मराठी ही अभिजात भाषा कशी आहे? हे सिद्ध करण्यासाठी अनेक तज्ज्ञांनी आपले कसब पणाला लावले आहे. नाणेघाटातील शिलालेख हा अडीच हजार वर्षांपूर्वीचा असल्याचे सिद्ध झाल्याने मराठी भाषा किती जुनी आहे हे आपल्याला समजते. यादवकाळ, बामणीकाळ, शिवकाळ, पेशवेकाळ ते इंग्रजकाळ यात मराठी भाषेत होत गेलेली संक्रमणे ओहोळ यांनी अधोरेखित केली. हल राजांच्या ‘गाथा सप्तशती’ पासून ते अण्णा भाऊ साठे यांच्या ‘माझा रशियाचा प्रवास’ इथपर्यंतचा प्रवास ओहोळ यांनी उलगडून दाखवला. त्याचप्रमाणे ‘जग बदलणारा बापमाणूस’ या पुस्तकाचा निर्मिती प्रवासही उलगडून दाखवला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. संभाजी मलघे यांनी मराठी भाषा विकासासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करूया. भाषा कोणतीही असू द्या, त्यातील ज्ञान घेण्याचा प्रयत्न करा. छोट्या छोट्या वचनांपासून ते महाकाव्यपर्यंतचा मराठी भाषेचा समृद्ध करणारा प्रवास हा अभिमानास्पद असल्याची भावना व्यक्त केली. कवी कुसुमाग्रज यांच्या साहित्याचा आढावा त्यांनी यावेळी घेतला.
यावेळी कला, वाणिज्य, विज्ञान शाखेतील विद्यार्थी, प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे आणि कार्यवाह चंद्रकांत शेटे यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या.
डॉ. विजयकुमार खंदारे यांनी प्रास्ताविक, सूत्रसंचालन प्रा. डॉ. संदीप रतन कांबळे यांनी, तर आभार प्रा. राजेंद्र आठवले यांनी मानले.