पुणे – महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे (मसाप) देण्यात येणारा ज्येष्ठ भाषा अभ्यासक आणि लेखिका डॉ. अंजली सोमण पुरस्कृत मसाप जीवनगौरव पुरस्कार यंदा लेखिका डॉ. मीना प्रभू यांना जाहीर झाला आहे. तसेच डॉ. भीमराव कुलकर्णी कार्यकर्ता पुरस्कार नाशिकचे फ्रान्सिस वाघमारे यांना जाहीर झाला आहे. जीवनगौरव पुरस्काराचे स्वरूप २५ हजार रुपये आणि सन्मानपत्र असे असून कार्यकर्ता पुरस्काराचे स्वरूप ११ हजार रुपये आणि सन्मानपत्र असे आहे. हे पुरस्कार २७ मे रोजी होणाऱ्या ‘मसाप’च्या ११९ व्या वर्धापन दिन सोहळ्यात टिळक रस्त्यावरील माधवराव पटवर्धन सभागृहात ‘मसाप’चे अध्यक्ष डॉ. रावसाहेब कसबे यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहेत. या प्रसंगी विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष डॉ. शिवाजीराव कदम, कार्यकारी विश्वस्त डॉ. पी. डी. पाटील, विश्वस्त यशवंतराव गडाख, उपाध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे, राजीव बर्वे आणि विद्याधर अनास्कर उपस्थित राहणार आहेत.
‘मसाप’चे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, ”डॉ. मीना प्रभू यांनी आपल्या कसदार लेखनातून मराठी साहित्यातील प्रवास वर्णनाचे दालन समृद्ध केले आहे. त्यांच्या या योगदानाबद्दल जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करताना ‘मसाप’ला आनंद होत आहे. फ्रान्सिस वाघमारे यांनी ख्रिस्ती साहित्य परिषदेच्या माध्यमातून साहित्य चळवळ गतिमान करत धार्मिक सुसंवाद, सामाजिक सलोखा आणि राष्ट्रीय एकात्मता यासाठी कार्यकर्ता म्हणून योगदान दिले आहे. त्यांच्या कार्याचा गौरव करताना ‘मसाप’ला समाधान वाटत आहे.”