स्नेहभावे लाडुली मुक्ताईस l
साडी चोळी देती नवलाई ll
ते निवृत्ती सोपान ज्ञानाई l
अत्यादरे ll
महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या श्री विठ्ठलाचे दर्शनास आषाढी वारीने माहेरच्या ओढीने पंढरीस आलेल्या संत मुक्ताबाईस बंधू ज्ञानेश्वर माऊलीकडून साडी चोळी हा माहेरचा आहेर देवून बोळवण करण्यात आले .
पंढरपूरात दरवर्षी आषाढी वारीत कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती महावैष्णव संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या कडून भगीनी आदिशक्ती मुक्ताबाईस साडीचोळी भेट देण्याचा ऐतिहासिक भावनिक सोहळा शुक्रवारी मुक्ताबाई मठात पार पडला. त्यावेळी भावीक भावविभोर झाले होते.
शेकडो वर्षांची परंपरा जपत श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमीटी आळंदी तर्फे पालखी सोहळा प्रमुख योगी निरंजननाथ यांनी मुक्ताबाई पादूकांना मंत्रोच्चारात पंचामृत अभिषेक पुजा करून साडीचोळी अर्पण करुन आरती केली .
यावेळी आळंदी संस्थानचे व्यवस्थापक माउली वीर , श्री संत मुक्ताबाई संस्थान कोथळी- मुक्ताईनगरचे अध्यक्ष भैय्यासाहेब पाटील, विश्वस्त शंकरराव पाटील , पंजाबराव पाटील, पालखी सोहळा प्रमुख रविंद्र महाराज हरणे, उध्दव जुनारे महाराज, सम्राट पाटील, भागवत धर्म प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सूर्यकांत भिसे , उमेश बागडे , संदीप महाराज मोतेकर, बबलू पाटील कासारखेड,अजाबराव पाटील, ज्ञानेश्वर हरणे , शशी पाटील व भाविक उपस्थित होते. भाऊ बहिण भेटीचा सोहळा अनुभवतांना भाविक भक्त भावनिक झाले होते.
आज सकाळी ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज पाळधीकर व दुपारी सद्गुरू सखाराम महाराज ईलोरा दिडीं परंपरेचे गादीपती व वंशज विश्वंभर महाराज तिजारे यांचे कीर्तन झाले.