पिंपरी- यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी अत्यंत लक्षवेधी असलेल्या भोसरी विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भाजपा-महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार महेश लांडगे येत्या मंगळवारी ( दि. २९) उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. आता ही निवडणूक भोसरीचे ग्रामस्थ, कार्यकर्ते यांनी हातात घेतली असून, उमेदवारी अर्ज भरताना कार्यकर्ते शक्तीप्रदर्शन करणार आहेत.
भाजपा- शिवसेना- राष्ट्रवादी- आरपीआय व मित्र पक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार महेश लांडगे हे तिसऱ्यांदा विधानसभेची निवडणूक लढविणार आहेत. २०१४ मध्ये अपक्ष निवडणुकीला सामोरे जात आमदार महेश लांडगे यांनी संघटन, ग्रामस्थांचा एकोपा, कार्यकर्ते पदाधिकारी यांच्याशी जोडलेली नाळ, विधायक राजकारण करण्याची हातोटी यातून यश खेचून आणले होते. त्यानंतर पाच वर्षात विकास कामांचा झंजावात लांडगे यांनी उभा केला. त्यामुळे २०१९ आणि आता २०२४ मध्ये पहिल्याच यादीमध्ये भाजपाने आमदार लांडगे यांना निवडणूक लढवण्याची संधी दिली. या संधीचे सोने करण्याची शपथच भोसरीच्या ग्रामस्थ, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे.
भोसरी मतदारसंघांमध्ये भाजपा विकास कामांचा मुद्दा घेऊन निवडणुकीला सामोरे जात आहे. गेल्या दहा वर्षातील महत्त्वाचा ठरलेला सरसकट शास्तीकर माफी, गायरानाची जागा शहरवासीयांसाठी उपलब्ध करून देणे, समाविष्ट गावांमधील रस्त्यांचा प्रश्न सोडवणे , पाण्याची उपलब्धता मोशी कचरा डेपो येेथे वेस्ट टू एनर्जी, बायोमायनिंग, बायोगॅस निर्मिती, सीएन्डडी वेस्ट प्रकल्प कार्यान्वयीत करणे बफर झोनची हद्दी कमी करणे, आंतरराष्ट्रीय औद्योगिक प्रदर्शन केंद्र, संविधान भवन, पिंपरी-चिंचवड न्यायालय संकूल, आयआयएम कॅम्पस आणि विशेष म्हणजे जगातील सर्वांत उंच छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा ‘स्टॅच्यु ऑफ हिंदुभूषण’ उभारण्यात येत आहे. यासह विविध विकासकामे आणि प्रलंबित प्रश्न सोडवण्यात आले आहेत.
***
गेल्या १० वर्षांमध्ये भोसरी मतदारसंघांमध्ये केलेल्या विकास कामांची यादी मोठी आहे. ही विकास कामे घेऊनच आम्ही निवडणुकीला सामोरे जात आहोत. कामे नागरिकांच्या समोर ठेवलेली आहेत. नागरिक या विकास कामांना नाकारू शकत नाही. १० वर्षात झालेला बदल त्यांना स्पष्ट दिसत आहे. मतदार राजा सूज्ञ आहे. त्यामुळे विकासाच्या मुद्यांवर माझ्यासोबत राहील, असा विश्वास आहे.
– महेश लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा, भाजपा, पिंपरी-चिंचवड