पुणे : थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा थोरले बाजीराव पेशवे शौर्य पुरस्कार पद्मश्री मुरलीकांत पेटकर यांना प्रदान करण्यात येणार आहे. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या ३२४ व्या जयंती दिनी रविवार, १८ ऑगस्ट रोजी टिळक रस्त्यावरील आय. एम. ए. बिल्डिंग संचेती सभागृहात सायंकाळी ५.३० वाजता पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. अशी माहिती प्रतिष्ठानचे सचिव कुंदनकुमार साठे यांनी दिली.
खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या शुभहस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार डॉ.मेधा कुलकर्णी, पुष्करसिंह पेशवा, प्रतिष्ठानचे अध्यक्ष निवृत्त एअर मार्शल भूषण गोखले व इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
पद्मश्री मुरलीकांत पेटकर भारतीय सैन्य दलात कार्यरत होते. युद्धात गंभीर जखमी होऊन त्यांना अपंगत्व आले. तरीही खचून न जाता जलतरण क्षेत्रात दैदीप्यमान कामगिरी करून पॅरालिम्पिक स्पर्धेत स्वर्ण पदक प्राप्त केले. असे पदक मिळवणारे ते पहिले भारतीय ठरले.