32.1 C
New Delhi
Friday, May 9, 2025
Homeमहाराष्ट्रसंविधानाच्या माध्यमातून शिवरायांचे विचार भीमरायांनी प्रत्यक्षात आणले!' - किरण माने

संविधानाच्या माध्यमातून शिवरायांचे विचार भीमरायांनी प्रत्यक्षात आणले!’ – किरण माने

शिव - फुले - शाहू - आंबेडकर - लोकमान्य व्याख्यानमाला - पुष्प दुसरे

पिंपरी- ‘संविधानाच्या माध्यमातून शिवरायांचे विचार भीमरायांनी प्रत्यक्षात आणले!’ असे प्रतिपादन सुप्रसिद्ध अभिनेते किरण माने यांनी श्री दत्त मंदिर चौक, मोहननगर, चिंचवड येथे केले. जय भवानी तरुण मंडळ आयोजित सहा दिवसीय शिव – फुले – शाहू – आंबेडकर – लोकमान्य व्याख्यानमालेत ‘शिवराय ते भीमराय’ या विषयावरील दुसरे पुष्प गुंफताना किरण माने बोलत होते. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे अध्यक्षस्थानी होते; तसेच पिंपरी – चिंचवड व्याख्यानमाला समन्वय समिती अध्यक्ष राजाभाऊ गोलांडे, संदीपान गायकवाड, शिवलिंग ढवळेश्वर, प्रताप गुरव, अनिल सूर्यवंशी, गणेश लंगोटे, मुख्य संयोजक मारुती भापकर यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.

मारुती भापकर यांनी प्रास्ताविकातून, ‘आपल्या देशातील राजकीय परिस्थिती अतिशय विदारक आहे. तथापि, सर्व महापुरुषांचे विचार सोबत घेऊन कार्य करणारे आम्ही कार्यकर्ते आहोत. त्यामुळे राजकीय आणि वैचारिक मतभेद बाजूला ठेवून सद्य:स्थितीत आपल्या शूर सैनिकांच्या पाठीशी आम्ही आहोत. शिवराय ते भीमराय आपल्या महाराष्ट्राचा श्वास आहे म्हणूनच या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे!’ अशी भूमिका मांडली. राजाभाऊ गोलांडे यांनी पिंपरी – चिंचवड व्याख्यानमाला समन्वय समितीची माहिती दिली. मानव कांबळे यांनी अध्यक्षीय मनोगतातून, ‘सामाजिक विषमता पुन्हा प्रस्थापित व्हावी म्हणून राजकीय व्यवस्थेकडून प्रयत्न केले जात आहेत. सरकारच्या विरोधात बोलले की तो देशद्रोह ठरतो. या पार्श्‍वभूमीवर संविधान नावाच्या तलवारीच्या साहाय्याने शाहू – फुले – आंबेडकरवादी कार्यकर्त्यांना लढावे लागेल!’ असे विचार मांडले.

किरण माने पुढे म्हणाले की, ‘चवदार तळ्याच्या सत्याग्रहातून आपणही या समाजाची माणसे आहोत, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सिद्ध केले. त्यानंतर त्यांनी मनुस्मृतीदहन केले. रायगडाला भेट दिली. बुद्धिप्रामाण्यवादी बाबासाहेबांच्या या कृतीमागे तार्किक भूमिका होती. मुस्लिमांसह अठरापगड जातींना सोबत घेऊन शिवरायांनी स्थापन केलेले स्वराज्य का लयास गेले याविषयी त्यांनी जाहीर भाषणातून ऊहापोह केला. शिवशाहीचे रूपांतर पेशवाईत कसे झाले, हा अंतर्मुख करणारा प्रश्न आहे. छत्रपतींचे आणि बाबासाहेबांचे अनुयायी यांच्यात भिंत का निर्माण करण्यात आली. शिवरायांचा पराक्रम लढायांपुरताच मर्यादित होता का? याची उत्तरे मिळू नयेत याची सोय एका व्यवस्थेने करून ठेवली; परंतु बाबासाहेबांच्या ‘क्रांती आणि प्रतिक्रांती’ या पुस्तकात याचे विश्लेषण आहे. शाळेत या गोष्टी शिकवल्या गेल्या नाहीत; कारण ब्राह्मण्यवादी लेखकांनी इतिहासाची रचना बदलून टाकली. खरा इतिहास समोर आलाच नाही. वास्तविक छत्रपती शिवरायांनी ब्राह्मणांसहित अठरापगड जातींचे रक्षण केले असतानाही ‘गोब्राह्मण प्रतिपालक’ हे त्यांना लावण्यात आलेले बिरुद खोटे आहे; तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भोपटकर वकील यांच्या भेटीचा किस्साही तद्दन खोटा आहे. शिवरायांच्या मनात मुस्लीमद्वेष नव्हता. काही इतिहासकारांनी खरे शिवराय शोधून काढले आहेत. ज्या इतिहासाचे वर्तमानकाळाशी नाते जोडता येते त्यालाच खरा इतिहास म्हणून ओळखता येते. शिवरायांची महानता लढायांतील पराक्रमापेक्षाही रयतेसाठी केलेल्या कल्याणकारी कार्यात आहे म्हणूनच त्यांच्यासाठी मावळे प्राणाची बाजी लावत असत. शिवरायांवर तुकोबांचा प्रभाव होता आणि तोच प्रभाव बाबासाहेब यांच्यावरही होता. त्यांच्या ‘मूकनायक’ या वर्तमानपत्रावर तुकोबांचा अभंग उद्धृत केलेला असे. संविधानाची मांडणी करताना माझ्या मनात तुकोबांचे अभंग होते, असे बाबासाहेबांनी सांगितले आहे. बाबासाहेब यांनी सर्व समाजासाठी कार्य केले असूनही वर्चस्ववादी व्यवस्थेने त्यांना जातीपुरते मर्यादित केले आहे. त्यामुळेच शिवराय आणि भीमराय यांच्या अनुयायांनी हेवेदावे बाजूला ठेवून एकत्र यावे!’ असे आवाहन माने यांनी केले. छत्रपती शिवराय आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील विविध प्रसंग, त्यांचे विचार आणि कार्य याबाबत त्यांनी विविध संदर्भ उद्धृत केले.

दिगंबर बालुरे, नकुल भोईर, महादू नल्लेकर, राम नलावडे, महेश पाटील, सखाराम वलवणकर यांनी संयोजनात सहकार्य केले. राहुल शिंपले यांनी सूत्रसंचालन केले. प्रकाश जाधव यांनी आभार मानले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
haze
32.1 ° C
32.1 °
32.1 °
45 %
1.5kmh
20 %
Fri
33 °
Sat
40 °
Sun
41 °
Mon
43 °
Tue
43 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!