पुणे : व्यक्तिमत्व विकास झालेला माणूसच समाजाला दिशा देऊ शकतो, अशी माणसे शिक्षकच घडवू शकतात, परंतु शिक्षकांना जर नैतिकता नसेल तर त्या शिक्षणाचा काहीही अर्थ नसतो. आज केवळ शिक्षणाची गरज नाही तर शिक्षणाला नैतिकतेची गरज आहे, असे मत महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांनी व्यक्त केले.
लिटमस फाउंडेशन तर्फे आदर्श सेवा व आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान सोहळा नवी पेठेतील पत्रकार भवन च्या सभागृहात आयोजित करण्यात आला. यावेळी माजी आमदार उल्हास पवार , अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे सह आयुक्त गिरीश हूकरे, ज्येष्ठ साहित्यिक श्रीकांत देशमुख, जेष्ठ पत्रकार अशोक वानखेडे, ज्येष्ठ विधीज्ञ ऍड. सुधाकरराव आव्हाड आदी यावेळी उपस्थित होते.
लिटमस फाउंडेशन तर्फे अमोल परदेशी, संतोष मोरे, अभिलाष कदम आदीनी काम बघितले. कार्यक्रमाचे आणि पाहुण्याचे स्वागत प्रियांका परदेशी यांनी केले. अनिल बेलकर यांनी फाउंडेशनच्या कार्याची माहिती दिली , कार्यक्रमाचे प्रास्ताविक रोहित माने यांनी सादर केले, तसेच कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन फाउंडेशनचे अभिलाष मोरे यांनी मानले.
ऍड.सुधाकरराव आव्हाड म्हणाले, देशाला आज राज्यकर्त्यांची नव्हे तर अर्थतज्ज्ञांची गरज आहे. विचारशील तरुण चांगला समाज घडवू शकतात, त्यासाठी शिक्षक आणि शाळांची समाजाला गरज आहे. उल्हास पवार म्हणाले, मोबाईल आणि लॅपटॉप सारख्या तंत्रज्ञानाच्या तुरुंगामध्ये आज माणूस अडकला आहे. या तुरुंगातून बाहेर पडून या माणसाने समाजामध्ये वावरले पाहिजे तरच खऱ्या अर्थाने समाज प्रगती पथावर जाऊ शकेल.
अशोक वानखेडे म्हणाले, आज सर्वाधिक जबाबदारी ही शिक्षकांवर आहे. परंतु दुर्दैवाने सर्वाधिक दुर्लक्षित घटकही शिक्षकच आहेत. देश आपला आहे ही भावना तरुणांमध्ये निर्माण केली पाहिजे. या देशांमध्ये संविधानानुसार काम सुरू राहिले पाहिजे यासाठी पत्रकारांनी दक्ष राहिले पाहिजे.
श्रीकांत देशमुख म्हणाले, तरुणांमध्ये अस्वस्थता वाढली तरच देशांमध्ये चळवळ निर्माण करू शकतो. इतिहासाच्या नायकांना खलनायक बनवण्याचे काम सध्या सुरू आहे ही प्रवृत्ती बंद झाली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
आदर्श सेवा पुरस्कार प्रसन्न जगताप, संजय शहा, निशा भोसले, प्रदीप सिंग ठाकूर, जयंत येलुलकर, गणेश निंबाळकर, पप्पू गुजर यांना ,युवा उद्योजक पुरस्कार विनीत देसाई, विकास काळे यांना प्रदान करण्यात आला. क्रीडा रत्न पुरस्कार श्रद्धा वाल्हेकर, कल्याणी जोशी यांना, तसेच आदर्श शिक्षक पुरस्कार राजेंद्र पाटील, राजेंद्रसिंग परदेशी, वैशाली बांगर, रत्नमाला कांबळे, मानसी बुवा, कुसुम खेडकर, संजीवनी दौंड ,राहुल इंगळे, धायबर निवेदिता आदींना सन्मानित करण्यात आले.