पुणे – काँग्रेस पक्षाने आपल्या जाहीरनाम्यात पाच न्याय आणि 25 हमी दिल्या आहेत, त्यातील शैक्षणिक कर्जमाफीची हमी ही ऐतिहासिक स्वरूपाची आहे. कोणत्याही राजकीय पक्षांनी अशा स्वरूपाची गॅरंटी देण्याचा हा पहिलाच प्रकार आहे आणि त्यातून असंख्य पालकांना आणि विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे असे प्रतिपादन काँग्रेस आणि इंडिया आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी केले आहे.
यासंदर्भात आज प्रसिद्धीला दिलेल्या एका निवेदनात धंगेकर यांनी म्हटले आहे की, मार्च 2024 पूर्वी ज्यांनी शैक्षणिक कर्ज घेतले आहे ते कर्ज माफ करण्याची हमी काँग्रेसने दिली आहे. सध्या महागाईमुळे मध्यमवर्गीय तसेच गरिबांना आपल्या मुलांचा शैक्षणिक खर्चही परवडेनासा झाला आहे. त्यातच इंजीनियरिंग किंवा अन्य व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रचंड रकमेची फी पालकांना भरावी लागते. त्यासाठी हजारो पालकांनी शैक्षणिक कर्जाचा मार्ग निवडून पोटाला चिमटा घेऊन मुलांच्या शिक्षणाची सोय केली आहे. या शैक्षणिक कर्जाचे हप्ते, व्याज आणि परतफेड करणे जिकीरीचे बनले आहे, त्यामुळे देशातील विद्यार्थी व पालकांची ही अडचण लक्षात घेऊन काँग्रेसने शैक्षणिक कर्जमाफीची क्रांतिकारी हमी जाहीर केली आहे. या शैक्षणिक कर्जमाफीचा लाभ पुण्यातल्याही असंख्य विद्यार्थी आणि पालकांना होणार असल्याने त्यांनी या निर्णयावर समाधान व्यक्त केले आहे. स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजपर्यंत शैक्षणिक कर्जाच्या माफीची गॅरंटी कोणत्याच राजकीय पक्षांनी दिलेली नाही त्यामुळे काँग्रेसची ही गॅरंटी ऐतिहासिकही ठरली आहे असेही धंगेकर यांनी म्हटले आहे. त्याखेरीज पदवीधर झालेल्या विद्यार्थ्यांना किंवा पदविका मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना वार्षिक एक लाख रुपये मदतीची अप्रेंटिसशिप योजना काँग्रेसने या जाहीरनाम्यात सादर केली आहे. त्याचाही देशभरातील सर्वच पदवी व पदविका धारक युवकांना लाभ होणार आहे. पहिली नोकरी पक्की या नावाने काँग्रेसने दिलेली ही हमी देशात कोणीही बेरोजगार राहणार नाही याचीच गॅरंटी आहे असेही धंगेकर यांनी म्हटले आहे. गरीब महिलांना दरमहा साडेआठ हजार रुपये याप्रमाणे वर्षाला एक लाख रुपयाची थेट मदत देण्याची काँग्रेसची गॅरंटीही गेम चेंजर आहे असेही या पत्रकात धंगेकर यांनी नमूद केले आहे.