पुणे – “संविधानानुसार समाजनिर्मिती हीच आपली दिशा आणि ध्येय असयाला पाहिजे असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात डॉ.रमेश पांडव यांनी केले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने विशेष व्याख्यानाचे आयोजन संत ज्ञानेश्वर सभागृहात करण्यात आले होते. त्याप्रंसगी ते बोलत होते. यावेळी प्र – कुलगुरू प्रा. डॉ. पराग काळकर यांनी विद्यापीठ परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉ. रमेश माधवराव पांडव, व्यवस्थापन परिषद सदस्य रविंद्र शिंगणापूरकर, अधिष्ठाता प्रा. (डॉ.) विजय खरे, डॉ. संजय तांबट, अधिसभा सदस्य शंतनू लामदाडे, प्रा. (डॉ.) राजेंद्र घोडे, प्रा. (डॉ.) विलास आढाव, डॉ. संजय देसले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाचे प्रमुख डॉ. सुधाकर बोकेफोडे, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अध्यासनाचे प्रमुख डॉ. सुनिल भंडगे, डि. एस. सावकार अध्यासनाचे प्रमुख डॉ. अशोक कांबळे, प्रा. (डॉ.) राधाकृष्ण पंडित आदी मान्यवरांनी पुष्पांजली अर्पण आदरांजली वाहिली. याप्रसंगी विविध शैक्षणिक व प्रशासकीय विभागांचे विभागप्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर सेवक, विविध कर्मचारी आणि विद्यार्थी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संत ज्ञानेश्वर सभागृहात विशेष व्याख्यानासाठी आमंत्रित प्रमुख वक्ते डॉ. रमेश माधवराव पांडव यांनी राष्ट्रपुरुष : डॉ. बाबासाहेब या विषयावर व्याख्यान दिले. त्यांनी महापुरुषांचे स्मरण म्हणजे इतिहास पठण करणे नाही तर बाबासाहेबांने आपल्याला दिलेल्या संविधानानुसार समाज उभारण्याची दिशा ठरवण्याचा क्षण आहे.” त्यांच्या मते, सामाजिक समता, आर्थिक स्वावलंबन, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि मानवी मूल्ये ही संविधानाची तत्त्वे प्रत्येकाने आपल्या प्रत्यक्ष कृतीत आणणे हीच खरी महापरिनिर्वाण दिनाची कृतज्ञ आठवण असल्याचे यावेळी सांगितले. आपल्या अनुभवातून समाजातील विषमता अधोरेखित करत त्यांनी सेवा वस्त्यांचे वास्तव आणि गरिबीचे कटू चित्र मांडले. पुणे, नाशिक आणि संभाजीनगरातील शेकडो सेवा वस्त्यांचा उल्लेख करत “अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि संस्कार या प्रत्येक भारतीयाच्या मूलभूत गरजा आहेत; एका कुटुंबालाही उभे केल्यास समाज उभा राहतो,” असे ते म्हणाले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा संदर्भ देत जातव्यवस्थेचा इतिहास, तिच्या विघटनातील अडथळे, आणि परिवर्तनासाठीची दोन उपाययोजना — व्यवसायबदल व आंतरजातीय विवाह — यावरही त्यांनी स्पष्ट आणि मार्मिक भाष्य केले. “भिंती मोडल्या शिवाय एकसंघ भारत घडणार नाही,” या बाबासाहेबांच्या संदेशाचे स्मरण त्यांनी उपस्थितांना करून दिले.“महापुरुषांची जयंती–पुण्यतिथी म्हणजे परंपरेची पूर्तता नव्हे; ती आपल्या कृतींचा आढावा घेण्याची वेळ आहे. भेदभाव कमी करण्यासाठी, समाज बदलण्यासाठी आणि स्वतःच्याही भविष्याची दिशा ठरवण्यासाठी प्रत्येकाने एक ठोस ध्येय निश्चित केले पाहिजे.” असे डॉ. पांडव यांनी विद्यार्थ्यांना आवाहनही केले.
“महापुरुषांचे स्मरण ही परंपरा नसून आपल्या कृतीचे आणि कर्तव्यभावनेचे वर्षभराचे आत्मपरीक्षण आहे. बाबासाहेबांचे विचार भावना जागवण्यासाठी नव्हे, तर कृतिशील होण्यासाठी आहेत. आपण ठरवलेला सामाजिक टप्पा वर्षात पूर्ण झाला तर आनंद; न झाल्यास ‘का नाही?’ याचा प्रामाणिक विचार व्हावा. बाबासाहेबांचे २५ नोव्हेंबर १९४९ चे भाषण आणि त्यांचा ‘प्रथम भारतीय, अंतिम भारतीय’ हा संदेश आपल्या दैनंदिन कृतीत उतरला तरच स्मरणाला अर्थ प्राप्त होतो. मूर्तिपूजन नव्हे, तर विचारांचे आचरण—यातूनच खरे परिवर्तन आणि संविधानानुसार समाजनिर्मिती शक्य आहे.” असे व्यवस्थापन परिषद सदस्य रविंद्र शिंगणापूरकर यांनी यावेळी उपस्थितांना संबोधित करतांना सांगितले. याप्रसंगी उपस्थितांनी बुद्धवंदनेने बाबासाहेबांना अभिवादन केले. अधिष्ठाता डॉ. संजय तांबट यांनी उपस्थितांना प्रमुख वक्त्यांचा परिचय करून दिला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजानन जाधव यांनी केले तर कार्यक्रमाचा समारोप भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाचे अध्यासनप्रमुख डॉ.सुधाकर बोकेफोडे यांनी केले.


