डब्लयूपीयूत १४ व्या भारतीय छात्र संसदेचे उद्घाटन
उत्तर प्रदेश विधानसभेचे अध्यक्ष सतीश महाना यांना आदर्श विधानसभा अध्यक्ष पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
पुणे,: आयुष्यभर साधी जीवनशैली आत्मसात करून, वाटचाल करणारे राजकारणी देशात कमी आहेत. सत्ता म्हणजे अहंकार करणे नाही, तर तो लोकांसाठी कामे करण्याचा आणि समस्या सोडविण्याचा एक मार्ग आहे, हे लक्षात घेऊन काम करणारे लोकप्रतिनिधी यशस्वी होतात, असे मत लोकसभेच्या माजी अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी व्यक्त केले. राजकारणाचा मार्ग रेड कार्पेटसारखा दिसत आला, तरी खाचखळग्यांनी भरलेला असतो. यावर विचारपूर्वक मार्गक्रमण करणारे लोकप्रतिनिधी राजकारणात योग्य पदांवर जातात, असेही महाजन यांनी स्पष्ट केले.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे आणि एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट, पुणे यांच्या वतीने आयोजित १४ व्या भारतीय छात्र संसदेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या.एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे अध्यक्ष डॉ. विश्वनाथ दा. कराड अध्यक्षस्थानी होते.

याप्रसंगी उत्तरप्रदेश विधानसभेचे अध्यक्ष सतीश महाना, राजस्थान विधानसभेचे माजी अध्यक्ष डॉ.सी.पी.जोशी, बोट कंपनीचे सहसंस्थापक आणि उद्योजक अमन गुप्ता, भारतीय छात्र संसदेचे संस्थापक व एमआयटी डब्ल्यूपीयूचे कार्याध्यक्ष डॉ.राहुल कराड, कुलगुरू डॉ. आर. एम. चिटणीस, विद्यार्थी प्रतिनिधी पृथ्वीराज शिंदे, अपूर्वा भेगडे, नितीश तिवारी उपस्थित होते.
यावेळी लोकशाहीला बळकट करण्यासाठी मान्यवरांनी प्रातिनिधिक स्वरूपात ’बेल ऑफ डेमोक्रसी’चा घंटानाद केला. या समारंभात लोकसभेच्या माजी अध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्या हस्ते सतीश महाना यांना आदर्श विधानसभा अध्यक्ष पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
सुमित्रा महाजन म्हणाल्या, आपण जीवनात कधीच परिपूर्ण नसतो. त्यामुळे आपल्याला विद्यार्थी राहायला हवे आणि नाविन्यपूर्ण गोष्टींचे ज्ञान घ्यायला हवे. देशातील नागरिकांना सुखी ठेवण्यासाठी ध्येयधोरणे ठरविण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी युवापिढीने पुढाकार घ्यायला हवा. देशातील नागरिक हुशार असून, त्यांना बर्या-वाईट गोष्टी कळतात. सतीश महानासारख्या राजकारणातील चांगल्या लोकांना ओळखून, त्यांचा सन्मान करणे, ही अत्यंत चांगली बाब आहे.
सतीश महाना म्हणाले, भारतीय छात्र संसदेत सुमित्राताई महाजन यांच्या हस्ते सत्कार होणे ही माझ्यासाठी खूप सन्मानाची गोष्ट आहे. निवडणुकीच्या दिवशी नागरिकांनी आपण लोकप्रतिनिधी का निवडत आहोत, याचा विचार करायला हवा. निकालानंतर लोकांनी आपल्याला का निवडून दिले, याचा आमदारांनी विचार केल्यास आदर्श लोकप्रतिनिधी तयार होण्याची प्रक्रिया घडेल. चांगले लोकप्रतिनिधी निवडून देणे ही देशातील प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे २०४७ मध्ये विकसित भारताचे स्वप्न साकार करण्याची जबाबदारी छात्र संसदेत उपस्थित असलेल्या युवा प्रतिनिधींची आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी सकारात्मक काम केल्यास आपला देश नक्कीच विकसित भारत होईल.
डॉ.सी. पी. जोशी म्हणाले, चांगल्या व्यक्तींना निवडून त्यांना सन्मानित करणे ही बाब समजासाठी प्रेरणादायी असते. सात वेळा एकाच विधानसभा क्षेत्रातून निवडून येणे ही फार कठीण बाब आहे. उत्तरप्रदेश विधानसभा अध्यक्ष सतीश महाना यांचा सन्मान करून भारतीय छात्र संसदेने चांगले काम केले आहे. देशाच्या लोकशाहीला बळकट करण्यासाठी सुरू केलेल्या, भारतीय छात्र संसदेमुळे आज युवा पिढीला देशभरातून आलेल्या लोकप्रतिनिधींशी संवाद साधण्याची संधी मिळत आहे. याचा उपयोग चांगल्या समाजाच्या निर्मितीसाठी आणि देशाच्या प्रगतीसाठी होत आहे.
डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले, जगात भरपूर तणाव आणि अशांतता आहे. अशावेळी जगातील देशांचे लक्ष आपल्या भारताकडे लागले आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी काम करीत आहेत. नागरिक म्हणून आपल्यालाही यात पुढाकार घेऊन काम करायचे आहे. भारताला विश्वगुरू होण्यासाठी आपल्याला जाती-पातींच्या पलीकडे जाऊन काम करावे लागेल. जगाला शांततेचा मार्ग दाखविण्यासाठी अध्यात्म आणि मूल्याधिष्ठित शिक्षणाची सांगड घालून आपल्याला पुढे जावे लागेल.
डॉ. राहुल कराड म्हणाले, या संसदेच्या माध्यमातून लोकशाहीचे बळकटीकरण होत असून, समाजामध्ये सुशासन प्रस्थापित करण्यासाठी त्याचा फायदा होत आहे. राजकारण दिसते तेवढे सोपे नाही. त्यामध्ये राजकारणी लोकांना खूप कष्ट घ्यावे लागतात. राजकारणात उच्च शिक्षित युवा प्रतिनिधी यायला हवे, या उद्देशाने छात्र संसदेची सुरुवात झाली आहे. प्रत्येक राज्याच्या सरकारने युवा छात्र संसदेची सुरुवात करायला हवी. त्यामुळे देशातील भेदभाव दूर होऊन, सामाजिक प्रश्न सुटण्यासाठी मदत होईल आणि आपल्या देशाची प्रगती होण्यास मदत होणार आहे.
डॉ. आर. एम. चिटणीस यांनी स्वागतपर भाषण केले.
डॉ. गौतम बापट यांनी सूत्रसंचालन केले.
सन्मान मागितल्याने नाही, तर व्यवहाराने मिळतो
….
लोकप्रतिनिधीने आपण काय बोलावे आणि काय बोलू नये, याचा अभ्यास करायला हवा.त्याचप्रमाणे कसे बोलावे आणि मत व्यक्त करावे, हेही शिकणे गरजेचे आहे. ध्येयधोरणे आखण्यासाठी त्यावर मते मांडण्यासाठी चांगले वकृत्व आवश्यक आहे. सन्मान मागितल्याने नाही, तर आपल्या व्यवहाराने मिळतो, असे सुमित्रा महाजन यांनी लोकसभेच्या एका उदाहरणाद्वारे सांगितले.