पुणे. – : “बलात्कार आणि स्त्रीदास्यांचे मूळ ही असमानता आहे. विज्ञानवादी आणि समतावादी समाज घडवण्याची आवश्यकता असून महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी पुरुषांशी संवाद साधायला हवा. समाजात आज स्पष्ट आणि निकोप लैंगिकता शिक्षणाची गरज निर्माण झाली आहे.” असे विचार जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि अन्नपूर्णा परिवाराच्या प्रमुख डॉ. मेधा सामंत – पुरव यांनी व्यक्त केले. लेखक विवेक काशीकर लिखित आणि साहित्यविश्व प्रकाशन प्रकाशित “बलात्कार एक अटळ वास्तव?” या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून यावेळी एस.एम. जोशी सोशलिस्ट फाउंडेशन, पुणे येथे त्या बोलत होत्या.
यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभिजीत वैद्य, कॉ. मुक्ता मनोहर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच विवेक काशीकर, प्रकाशक विक्रम मालन आप्पासो शिंदे, संविधान प्रचारक संदीप बर्वे आदी यावेळी उपस्थित होते.
डॉ. अभिजीत वैद्य म्हणाले,”बलात्कार ही अनैतिकतेची परिसीमा आहे. सत्ता आणि धाक निर्माण करण्यासाठी स्त्रियांवर बलात्कार केला जातो. स्त्रीचं वस्तुकरण हे बलात्कारच एक महत्वाचं कारण आहे. जेव्हा भांडवलशाही स्त्रीला पुढे घेऊन जायला लागते तेव्हा बलात्कार हे अटळ बनायला सुरुवात होते. बलात्कार एक अटळ वास्तव या पुस्तकात लेखकाने बलात्कार या विकृतीला विविध सामाजिक अंगांनी मांडणी केली आहे.
कॉ. मुक्ता मनोहर म्हणाल्या,” देशात बलात्काराच्या घटनांचे प्रमाण वाढले आहे. चंगळवादी संस्कृतीने स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टिकोन हा उपभोगाची वस्तू असा केला आहे. पुरुषत्व गाजवण्याचा बलात्कार हा प्रकार असून ते शस्त्र म्हणून वापरले जाते. हे सर्व बदलण्याची आज वेळ आली आहे.
विवेक काशीकर म्हणाले,” सामाजिक समस्या सोडवण्यासाठी त्यामागील मूळ कारणे शोधावे लागतात. बलात्कारासारख्या घृणास्पद घटनेची चिकित्सा करून योग्य व व्यवहार्य उपाय सुचविण्याचा प्रयत्न या पुस्तकात केला आहे.
या कार्यक्रमाची सुरुवात श्रुती शालिनी यांच्या संविधानाच्या प्रास्ताविका वाचनाने झाली. डिझायनर नंदू लोखंडे, चित्रकार मिलिंद जोशी यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी प्रकाशक विक्रम मालन आप्पासो शिंदे यांनी पुस्तक प्रकाशनामागची भूमिका व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार संविधान प्रचारक नीलम पंडित यांनी केले.