पुणे : बँकेच्या हिताच्या दृष्टीने काही गोष्टी चुकत असतील, तर महिला संचालकांनी त्याचा विरोध केला पाहिजे. संचालक मंडळाच्या बैठकीला त्यांचा ज्ञानाधिष्ठित सहभाग असावा. महिलांचा सहभाग बँकेच्या शिस्तीला कारणीभूत ठरते. त्यामुळे महिला संचालकांची मोठी गरज बँकिंग क्षेत्राला आहे. त्यांचा सहभाग पुणे नागरी सहकारी बँक क्षेत्राला वरदान ठरेल, असे मत विद्याधर अनास्कर यांनी व्यक्त केले.
पुणे जिल्हा नागरी बँक्स असोसिएशनच्या वतीने आणि अमनोरा येस फाऊंडेशन पुरस्कृत देण्यात येणारा कै. मीरा देशपांडे उत्कृष्ट योगदान पुरस्कार सोहळ्याचे आयोजन असोसिएशनच्या अरण्येश्वर येथील सभागृहात करण्यात आले होते. यावेळी पुणे जिल्हा नागरी बँक्स असोसिएशनचे अध्यक्ष अॅड.सुभाष मोहिते, सिटी कॉर्पोरेशन लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक अनिरुद्ध देशपांडे, अमनोरा येस फाऊंडेशनचे विवेक कुलकर्णी उपस्थित होते.
मीरा देशपांडे यांनी ४० वर्षे भगिनी निवेदिता सहकारी बँकेच्या संचालिका म्हणून काम पाहिले. त्यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार देण्यात येतो. बँकांच्या दैनंदिन कामकाजामध्ये महिलांचे योगदान वाढावे, सहकार क्षेत्रामध्ये त्यांचा ठसा उमटावा यासाठी प्रोत्साहन म्हणून हा पुरस्कार देण्यात येतो.
पुणे शहरातून महेश सहकारी बँकेच्या संचालिका संगीता मणियार, राजर्षी शाहू सहकारी बँकेच्या मंगल जाधव तसेच ग्रामीण भागातून श्री गजानन लोकसेवा सहकारी बँकेच्या अनुराधा गोरखे आणि संत सोपानकाका सहकारी बँकेच्या राजवर्धिनी जगताप यांना मीराताई देशपांडे उत्कृष्ट योगदान पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. सन्मानचिन्ह, २१ हजार रुपये धनादेश असे पुरस्काराचे स्वरूप होते.
विद्याधर अनास्कर म्हणाले, बँकिंग क्षेत्रात महिला संचालकांचे योगदान मोठे आहे परंतु त्यांना वाव दिला जात नाही. संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये महिलांनी प्रश्न विचारल्यास पुरुषांना त्याचे वावडे असते. स्त्रियांची ताकद विलक्षण आहे. एखाद्या अडचणीच्या काळात पुरुष हतबल होतो परंतु स्त्री ताकदीने उभी राहते. त्यामुळे बँकेच्या अडचणीच्या काळात महिला सक्षमतेने बँकेला पुढे नेऊ शकतात.
अॅड.सुभाष मोहिते म्हणाले, मीरा देशपांडे या भगिनी निवेदिता सहकारी बँकेच्या सुमारे ४० वर्षे संचालिका होत्या. बँकेच्या जडणघडणीमध्ये त्यांचे मोलाचे सहकार्य होते. सिटी कॉर्पोरेशन लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि मीरा देशपांडे यांचे पुत्र अनिरुद्ध देशपांडे यांनी आपल्या आईच्या स्मरणार्थ पुणे जिल्हा नागरी बँक असोसिएशनकडे ठेव ठेवली व यातून येणाऱ्या व्याजातून हा पुरस्कार देण्याची तरतूद केली.सहकारी बँकांमध्ये काम करणा-या महिला संचालिकांना उल्लेखनिय काम करण्यासाठी प्रोत्साहन या माध्यमातून मिळते.
विवेक कुलकर्णी म्हणाले, मीरा देशपांडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ रुग्णसेविकांना मीरा देशपांडे सेवा सन्मान पुरस्कार आणि बँकिंग क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या महिला संचालिकांना कै. मीरा देशपांडे उत्कृष्ट योगदान पुरस्कार देण्यात येतो. महिला आपले घर, कुटुंब सांभाळून काम करीत असतात. त्यांच्या कामाचा सन्मान करणे हे आपले कर्तव्य आहे, या विचारातून दरवर्षी पुरस्कार देण्यात येतात.