पुणे,- – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या महिन्यात उद्घाटन केलेल्या “ज्ञान-भारतम्” मिशनशी भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेचा सामंजस्य करार नुकताच दिल्ली येथे संपन्न झाला. केंद्र सरकारच्या संस्कृति-मंत्रालयाच्या वतीने नवी दिल्ली येथे झालेल्या एका विशेष कार्यक्रमामध्ये या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. हा करार पाच वर्षांचा असून त्याद्वारे भांडारकर संस्थेला ज्ञान-भारतम् मिशनमध्ये क्लस्टर सेंटरचा दर्जा देण्यात आलेला आहे. संस्थेच्या स्वतःच्या संग्रहाबरोबरच इतर संस्था आणि व्यक्तींच्या संग्रहांमधील हस्तलिखितांची नोंदणी, जतन, डिजिटायझेशन, भाषान्तर, प्रकाशन आणि हस्तलिखितांवरील संशोधन अशा विविध बाबींची जबाबदारी या कराराद्वारे भांडारकर संस्थेवर सोपवण्यात आलेली आहे. केंद्रीय संस्कृति-मंत्रालयाच्या वतीने सहसचिव समर नंदा आणि भांडारकर संस्थेच्या वतीने नियामक परिषदेचे सदस्य मनोज एरंडे यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या. संस्थेचे निबंधक डॉ. श्रीनन्द बापट हे कार्यक्रमाला उपस्थित होते.
देशातील एक कोटी हस्तलिखितांचे डिजिटायझेशन आणि ती हस्तलिखिते लोकांना अभ्यासाकरिता उपलब्ध करून देणे हे या योजनेचे प्राथमिक उद्दिष्ट असल्याचे केंद्रीय संस्कृति-मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी या प्रसंगी सांगितले. भांडारकर संस्थेच्या आजवरच्या कामाची विशेष दखल त्यांनी घेतली. चालू आर्थिक वर्षाच्या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये घोषित करण्यात आलेल्या या योजनेची कार्यवाही आता होत असून तपशीलवार कार्ययोजनेसह तिचे काम लवकरच सुरू होईल असे प्रतिपादन संस्कृति-विभागाचे सचिव विवेक आगरवाल यांनी या प्रसंगी केले. अशा प्रकारचा क्लस्टर सेंटरचा दर्जा देशातील एकूण बारा संस्थांना देण्यात आलेला आहे, त्यामध्ये भांडारकर संस्थेला हा बहुमान मिळाला आहे.


