पुणे, वारजे –”तुमची क्षमता किती आणि तुम्ही त्याचा वापर कसा करता, यावर तुमचं प्रावीण्य ठरतं,” असं मोलाचं विचारधन भाजपचे नव्याने नियुक्त झालेले शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी वस्तीतील मुलांना दिलं. मात्र यावेळी हा सन्मान ना हार-तुर्यांचा होता, ना ढोल-ताशांचा… तर तो होता मुलांच्या हस्ते, मुलांसाठी, मुलांसोबत!

वारजे येथील छत्रपती शाहू महाराज वसाहतीत सेवाव्रत फाउंडेशनच्या ‘वृंदावन शैक्षणिक व सर्वांगीण विकास प्रकल्प’ अंतर्गत धीरज घाटे यांचा सत्कार करण्यात आला. भाजपचे प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर आणि नगरसेविका मंजूष्री खर्डेकर यांनी यासाठी एक आगळावेगळा उपक्रम आखला.
शहराध्यक्ष घाटे यांच्या हस्ते वस्तीतील मुलांना क्रिकेट बॅट, बॉल, बास्केटबॉल, फुटबॉल आणि गोष्टींची पुस्तकं भेट देण्यात आली. मुलांनीदेखील स्वहस्ते तयार केलेल्या ग्रीटिंग कार्ड्स देऊन घाटे यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी धीरज घाटे म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराज, संत ज्ञानेश्वर यांसारख्या थोर व्यक्तींनीही प्रतिकूल परिस्थितीतूनच प्रगतीचा मार्ग काढला. त्यामुळे वस्ती किंवा परिस्थिती नव्हे, तर तुमचं काम महत्त्वाचं!“
या कार्यक्रमाला प्रकल्प समन्वयक प्रदीप देवकुळे, भाजयुमो क्रीडा आघाडी अध्यक्ष प्रतीक खर्डेकर, तसेच परिसरातील नागरिक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भाजप प्रवक्ते संदीप खर्डेकर म्हणाले, “धीरजजींचा सत्कार हार-तुरे न वापरता समाजोपयोगी उपक्रमाद्वारे व्हावा, यामागे समाजकारणाची भावना होती.” त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने प्रकल्प भेटीच्या वेळी मुलांनी क्रीडासाहित्याची मागणी केल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.
छोट्यांच्या हस्ते झालेल्या या विशेष सत्कारात स्वागतगीत, शिवपाळणा आणि प्रश्नोत्तरांची रंगतदार मैफल रंगली.
धीरज घाटे यांनी मुलांशी संवाद साधत, “मोठ्या सभांपेक्षा या कार्यक्रमात मिळालेला सन्मान अधिक स्पर्शून गेला,” अशी भावना व्यक्त केली.