डॉ. विश्वनाथ दा. कराड यांना पुणे फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशनतर्फे ‘विश्वशांती व मानवता समर्पित जीवन गौरव पुरस्कार’ प्रदान. कौटुंबिक न्यायालयात ग्रंथालयाचे उद्घाटन.
पुणे,- “भारतीय कुटुंबव्यवस्था ही जगातील सर्वोत्तम आहे. प्रेम, आदर आणि सहकार्याच्या मूल्यांवर आधारित ही व्यवस्था व्यक्तीला सामाजिक आणि भावनिक आधार देते. हीच आपली खरी शक्ती आहे,” असे मत माईर्स एमआयटी विश्वशांती विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांनी व्यक्त केले.
द पुणे फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशन यांच्या वतीने डॉ. कराड यांना ‘विश्वशांती व मानवता समर्पित जीवन गौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. यावेळी कौटुंबिक न्यायालयात नव्याने उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक ग्रंथालयाचे उद्घाटन डॉ. कराड आणि मुख्य न्यायाधीश सौ. मनिषा काळे यांच्या हस्ते झाले.
कार्यक्रमाला ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. सुधाकर आव्हाड यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. अॅड. गणेश कवडे (अध्यक्ष), अॅड. स्मिता देशपांडे (उपाध्यक्ष), अॅड. कल्पना डिसले निकम, अॅड. प्रथम भोईटे (सचिव), अॅड. कोमल देशमुख (सहसचिव), अॅड. भूषण कुलकर्णी (खजिनदार) यांनी संयोजनाची जबाबदारी सांभाळली.
पुणे फॅमिली भूषण पुरस्काराने अॅड. अजीत कुलकर्णी, अॅड. विजया खळतकर आणि अॅड. प्रफुल्ल भावसार यांना सन्मानित करण्यात आले. अॅड. रेखा कोल्हटकर यांचे नुकतेच निधन झाल्यामुळे त्यांचा पुरस्कार त्यांच्या घरी जाऊन देण्यात येणार आहे.
विशेष सत्कारप्राप्त मान्यवर: डॉ. महेश थोरवे, अॅड. स्मिता देशपांडे, रोहिणी पवार, वैशाली चांदे, दीपा मॅडम, सुधीर रेड्डी, मर्चंट मॅडम, विद्या मॅडम, सचिन झांडे पाटील, श्वेता पांडे आणि अंबादास बनसोडे.
डॉ. कराड यांचे प्रेरणादायी विचार:
“सद्गुणांची पूजा हीच खरी ईश्वरपूजा आहे. आज देशात जाती-धर्माचे विष पसरले आहे, अशा परिस्थितीत विज्ञान आणि अध्यात्म यांचा समन्वय साधत मानवकल्याणासाठी कार्य करणे गरजेचे आहे. वकिलांनी राष्ट्रीय पातळीवर राउंड टेबल कॉन्फरन्स घेऊन ‘मानवाचे अंतिम सत्य काय आहे’ हे शोधण्याचा प्रयत्न करावा,” असे आवाहन त्यांनी केले.
न्यायाधीश मनिषा काळे म्हणाल्या, “आज कौटुंबिक न्यायालयाने ज्ञानाच्या दालनांचे दरवाजे उघडले आहेत. वाचन हीच वैचारिक समृद्धीची गुरुकिल्ली आहे.”
अॅड. सुधाकर आव्हाड यांनी सांगितले, “वाचन संस्कृती ही आपली प्राचीन परंपरा आहे. श्रवण, मनन, चिंतन, लेखन आणि संवाद या प्रक्रियेतूनच वैचारिक उन्नती साधता येते.”
अॅड. गणेश कवडे यांनी सांगितले, “पुण्यात १९८९ मध्ये कौटुंबिक न्यायालयाची स्थापना झाली. अनेक अडचणींवर मात करून उच्च न्यायालयाच्या परवानगीने अत्याधुनिक ई-लायब्ररीची स्थापना झाली असून हे कोर्ट आता देशातील एक आदर्श मॉडेल म्हणून ओळखले जाते.”
सूत्रसंचालन: अॅड. कोमल देशमुख
आभार प्रदर्शन: अॅड. भूषण कुलकर्णी