पुणे : – महाराष्ट्र गर्ल्स एज्युकेशन सोसायटीच्या, हुजूरपागा संस्थेने १४१ व्या वर्षात पदार्पण केलेसमाजात उत्तम नागरिक, सृजनशील व्यक्ती तसेच सक्षम व स्वावलंबी महिला तयार होण्यासाठी कार्यरत असलेल्या महाराष्ट्र गर्ल्स एज्युकेशन सोसायटीच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमाच्या प्रारंभी संस्थेचे मान्यवर पदाधिकारी, नियामक मंडळ सदस्य, मुख्य विश्वस्त यांच्या हस्ते म ग ए संस्थेच्या मूळ संस्थापकांच्या तसेच राष्ट्रपिता महात्मा गांधी, पूर्व पंतप्रधान लाल बहादूर शास्त्रीजी यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. . या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून व्यासंगी व्यक्तिमत्व प्रसिद्ध व ज्येष्ठ इतिहासकार, साहित्यिक आणि संशोधक डॉ. राजा दीक्षित – माजी अध्यक्ष, मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, महाराष्ट्र शासन लाभले. तसेच वर्धापनदिन कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाराष्ट्र गर्ल्स एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा माननीय श्रीमती शालिनी पाटील यांनी भूषविले.
पर्यावरण आणि विज्ञान या द्वयीचा समतोल राखत संस्थेचा कल्पवृक्ष वृद्धिंगत होत आहे असे मत डॉ. अरुणा भांबरे यांनी आपल्या प्रास्ताविकात आवर्जून नमूद केले. तद्नंतर कार्यक्रमाचे मा. प्रमुख पाहुणे आणि मा. अध्यक्षा यांचा परिचय हुजूरपागा कात्रज माध्यमिक विभागाच्या मा. मुख्याध्यापिका श्रीमती सुधा कांबळे यांनी केला. मा. प्रमुख पाहुणे डॉ. राजा दीक्षित यांचा सत्कार संस्था व कार्यक्रम अध्यक्षा मा. शालिनी पाटील यांनी केला तर, कार्यक्रमाच्या अध्यक्षा मा. शालिनी पाटील यांचा सत्कार संस्था सचिव मा. रेखा पळशीकर यांनी केला.
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्रीमती जयश्री वाड या माजी विद्यार्थिनीच्या स्मृतीप्रित्यर्थ एका गरजू विद्यार्थिनीला रु. ५० हजार मनोज वाड आणि आशिष वाड यांनी देऊ केले. श्रीमती ज्योत्स्ना डोळ शिशुमंदिर, हुजुरपागा प्रशालेतील कु. जिजा खुटवड चुणचुणीत चिमुरडीने ‘विनोबा भावे’ यांच्यावर कथाकथन सादर केले.याप्रसंगी महाराष्ट्र गर्ल्स एज्युकेशन संस्थेच्या विविध विभागांत कार्यरत असणाऱ्या उत्कृष्ट शैक्षणिक कार्यकारी शिक्षक, कार्यक्षम शिक्षकेतर कर्मचारी, विविध उपक्रम नाविन्यपूर्ण राबविणारे मुख्याध्यापक, उत्कृष्ट सफाई कर्मचारी व विशेष उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंत विद्यार्थिनींच्या कार्यगुणांचे कौतुक व बक्षीस समारंभ प्रमुख पाहुणे डॉ राजा दीक्षित तसेच संस्थेच्या अध्यक्षा माननीय श्रीमती शालिनी पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. बक्षीस व पुरस्कारांचे वाचन संस्थेच्या मा. सचिव श्रीमती रेखा पळशीकर यांनी केले.
आपल्या मुख्य भाषणात कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय डॉ राजा दीक्षित यांनी, “ऐतिहासिक वारसा” लाभलेल्या हुजूरपागेची महती आणि थोरवी आपल्या व्यासंगी, खुमासदार साहित्यशैलीतून अधोरेखित केली. ‘हुजूरपागा’ विषय घेऊन एम.फिल चा प्रबंध त्यांच्याच एका विद्यार्थिनीने सादर केला असल्याचे त्यांनी नमूद केले. अनेक साहित्यिकांचा दाखला देत त्यांनी हुजुरपागेच्या आठवणींना उजाळा दिला. त्यामध्ये श्री.ज. जोशी या लेखकाने ‘सोनचाफ्याचा सुगंध जसा अविरत दरवळतो, तशी कधीही वार्ध्यक्य न येणारी हुजूरपागा’ अशी सुंदर उपमा दिली आहे
आपल्या मार्गदर्शनात त्यांनी पुढे महात्मा गांधीजी आणि महाराष्ट्र यावर विचार मांडले. महत्मा गांधींच्या विचारधारेवर प्रकाश टाकताना त्यांनी डॉ. रा. गो. भांडारकर, नामदार गोखले आणि म. गांधीच्या मानवतावादी दृष्टिकोनाचा उल्लेख केला. नामदार गोखले यांच्या अहिंसा तत्वाचा व प्रार्थना समाज प्रणालीचा म. गांधींवर पूर्ण प्रभाव होता. नीती हाच धर्म, संस्थात्मकवादाच्या पलीकडे जाणारा मानवतावाद आणि सत्य हाच परमेश्वर हि त्रयी तत्व म. गांधी यांनी जोपासले होती. तसेच म. गांधीजींच्या ऋषितुल्य व्यक्तिमत्वाचा आणि विचारधारेचा मराठी साहित्यिकांवर देखील सखोल प्रभाव आहे, हे त्यांनी सोदाहरण नमूद केले. जगभरात म. गांधींच्या कार्यावर १०० पेक्षा जास्त देशांमध्ये ४०० पेक्षा जास्त ग्रंथसंपदा प्रकशित झालेली आहे. आजही गांधीवादाची प्रस्तुतता आमटे परिवार, डॉ. बंग परिवार, मेधा पाटकर आणि शिक्षणतज्ज्ञ कैलास सत्यार्थी यांच्या कार्यातून दिसून येते. इतकेच नव्हे तर जगभरातील चळवळीतील विचारवंत — मार्टिन ल्युथर किंग आणि नेल्सन मंडेला — यांच्यावरही गांधीविचारांचा प्रभाव स्पष्टपणे जाणवतो.
म. गांधीजीनी सांगितलेल्या मुल्याविहीन राजकारण, कर्माविना ज्ञान, कष्टाशिवाय संपत्ती, चारित्र्यहीन शिक्षण, मानावातारहित विज्ञान, नैतिकताशून्य व्यापार, त्यागविना उपासना इ. ७ दुरितांचा याठिकाणी डॉ. राजा दीक्षित यांनी विशेषत्वाने उल्लेख केला. या दुरितांविषयी आत्मचिंतन करून प्रत्यकाने आपले सेवाव्रत आचरण केलयास म. गांधींच्या स्वप्नातील भारत नक्की साकारला जाईल, असे मत कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. राजा दीक्षित यांनी प्रतिपादित केले.
त्यानंतर आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनात संस्थेच्या अध्यक्षा माननीय श्रीमती शालिनी पाटील यांनी संस्थेची अशीच उत्तरोत्तर प्रगती होत त्याची कीर्ती जगभर पोहोचेल अशी धारणा व्यक्त केली. यानिमित्ताने सर्व शिक्षकांनी वाचन समृद्धी चा संकल्प करावा याबाबत कथेच्या माध्यमातून उद्बोधन केले. वाचन समृद्धीचा वसा घेतलेले शिक्षक निश्चितच विद्यार्थिनींच्या शंकांचे निरांसन करीत त्यांच्यामध्ये वाचनाची गोडी निर्माण करू शकतात, असा विश्वास शालिनीताईंनी जागवला. ज्ञान व प्रगती याची कास धरायची असेल तर वाचन संस्कृती विद्यार्थ्यांमध्ये रुजायला हवी, आणि यासाठी शिक्षकांची भूमिका महत्वाची आहे, असे विचार त्यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात प्रागतिक विचारांची उत्तुंग महत्वाकांक्षा असलेल्या म ग ए संस्था, हुजूरपागेच्या वर्धापनदिनानिमित्त शुभचिंतन करण्यासाठी जमलेल्या सर्व उपस्थितांचे संस्थेच्या कोषाध्यक्षा, डॉ. सुषमा केसकर यांनी आभार मानले. या प्रसंगी संस्थेचे मुख्य विश्वस्त मा. श्रीमती उषा वाघ, विश्वस्त श्री. दुष्यंत घाटगे. उपाध्यक्ष माननीय हिमानीताई गोखले, तसेच संस्थेचे विद्यमान नियामक मंडळ सदस्य, देणगीदार, सभासद, पालक, संस्थेच्या विविध विभागांचे विभाग प्रमुख, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थितीत वर्धापन दिनाचा सोहळा दिमाखात साजरा झाला. सदर सोहळ्याचे सूत्रसंचालन हुजूरपागा कात्रज प्राथमिक विभागाच्या सहशिक्षिका श्रीमती मोनाली तनपुरे यांनी केले. कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली.