पिंपरी,: राज्य सरकारने प्राथमिक शिक्षणात हिंदी भाषा सक्तीची अंमलबजावणी करण्याचा निर्णय अखेर मागे घेतल्याची घोषणा केल्यानंतर, राज्यभरातून याचे स्वागत होत आहे. पिंपरीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे भव्य आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
या वेळी मनसेचे पिंपरी शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी जनतेला संबोधित करत सांगितले, “‘माझ्या मराठीची बोलू कौतुके’ या ज्ञानेश्वरीतील अभंगातून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेचे महत्त्व अधोरेखित केले आहे. महाराष्ट्रात मराठीला पर्याय म्हणून कोणतीही भाषा लादली जाऊ शकत नाही.”
चिखले पुढे म्हणाले, “हिंदी सक्तीविरोधात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ५ जुलै रोजी महामोर्चाची घोषणा केली होती. जनतेतून मिळणारा जबरदस्त प्रतिसाद, वाढता विरोध आणि संभाव्य आंदोलनांची शक्यता लक्षात घेता सरकारला अखेर माघार घ्यावी लागली. हा विजय केवळ मनसेचा नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राच्या भाषिक अस्मिता आणि जनशक्तीचा विजय आहे.”
या ऐतिहासिक निर्णयाच्या पार्श्वभूमीवर, मनसेच्या कार्यकर्त्यांनी पिंपरी चौकात फटाक्यांची आतषबाजी, तसेच नागरिकांना पेढे व लाडू वाटून आनंदोत्सव साजरा केला. परिसरात एकंदरीत उत्साह, अभिमान आणि मराठी भाषेप्रती प्रेमाचे वातावरण निर्माण झाले.
या कार्यक्रमाला मनसेच्या अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यामध्ये सीमा बेलापूरकर, बाळ दानवले, मनोज लांडगे, रुपेश पटेकर, दत्ता देवतरासे, आदिती चावरिया, तसेच विद्या कुलकर्णी, श्रीकांत पाटील, गणेश शिंदे, आकाश सागरे, रोहित थोरात, अण्णा कापसे यांच्यासह इतर अनेक कार्यकर्त्यांचा समावेश होता.