पुणे – संगीतातून निर्माण होणारा भक्तिरस, आत्म्याला भिडणारा अनुभव, लय व माधुर्य आणि आध्यात्मिक अनुभव या सर्वांची अनुभूती तसेच नृत्याच्या माध्यमातून भारतीय अध्यात्मातील ९ रसांची अनुभूती घटस्थापनेच्या मुहूर्तावर माईर्स एमआयटीच्या प्रांगणात जाणवली.
निमित्त होते माईर्स एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांनी स्थापन केलेल्या ‘फनकार फोरमच्या माध्यमातून सादर करण्यात अलेल्या “पंढरीचा राजा पंढरीनाथ, विश्व माऊली विश्वनाथ” या अध्यात्मिक गीत आणि नृत्याच्या कार्यक्रमाचे. भारतीय संस्कृती, परंपरा व अध्यात्माची महती युवक व विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्याचा मुख्य उद्देश्य ठेऊन याचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी माईर्स एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस.एन.पठाण, डब्ल्यूपीयूचे कुलसचिव प्रा.गणेश पोकळे, सीएओ डॉ. प्रसाद खांडेकर, पीस स्टडीजचे डॉ. मिलिंद पात्रे, डॉ. अंजली साने, डॉ.रोहिणी काळे व डॉ. महेश थोरवे यांची प्रमुख उपस्थिती होते.
विठोबा व ज्ञानेश्वर माऊली या थीम वर आधारित ‘कानडा राजा पंढरीचा’,‘जरा ज्ञानदेवा मुक्ताईचे ऐका’, सारखे अनेक भक्ती गितांचे सादरीकरणाने उपस्थितांना साक्षात माऊलीचे दर्शन घडल्यासारखे झाले. सुयश चांडोलकर व सर्वेश रोटकर त्यांच्या चमुने ही भक्ती गिते सादर केली. नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने नवरस जसे श्रृंगार, हास्य, करुणा, रौद्र, वीर, भयानक, बीभत्स, अभ्दुत आणि शांत रसांवर आधारित नृत्य भरतनाट्यम् व कथ्थकच्या माध्यमातून सादर करण्यात आले. त्याच प्रमाणे माँ कालीच्या नृत्य सादरीकरणाने सर्वांना मंत्रमुग्ध केले. कोरिओग्राफर वेल्लरी व श्रेया या विद्यार्थी चमूने या संपूर्ण नृत्यांचे नियोजन केले.
या प्रसंगी विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ दा.कराड यांनी ‘फनकार फोरम’च्या सर्व सदस्यांचा सत्कार केला. तसेच, फोरमच्या पदाधिकार्यांनी प्रा.डॉ. विश्वनाथ दा कराड यांचा विशेष सत्कार केला.
डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले,“या सृष्टीवर एकच व्यक्ती विश्व माऊली होऊ शकते, ती म्हणजे संत ज्ञानेश्वर माऊली. यांच्या तत्वज्ञानावर आज प्रत्येक व्यक्ती जीवन व्यतीत करीत आहे. विश्वशांतीसाठी विज्ञान आणि अध्यात्माच्या समन्वयातून दिले जाणारे ज्ञान हेच सर्वश्रेष्ठ आहे. येथील विद्यार्थ्यांना दिले जाणारे ज्ञान हे विश्वगुरूच्या दिशेने वाटचाल करणारे आहे. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या या कार्यक्रमातून हे सिद्ध होते की देश विश्वशांतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे.”
डॉ. मिलिंद पात्रे म्हणाले,“जगप्रसिद्ध संगणक शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर सांगतात की ज्या दिवशी या देशात शिक्षित विद्यार्थी हा भजन, कीर्तन, व वारीत माऊलीच्या तालावर नाचतील तेव्हाच भारत खर्या अर्थाने विश्वगुरू म्हणून उद्यास येईल. ”‘फनकार फोरम’चे संस्थापक सदस्य सुदीप दहीफळे, प्रज्वल गुप्ता, आदिती, जिज्ञासा व प्रतिक्षा यांनी कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन केले.डॉ. सचीन गाडेकर यांनी सूत्रसंचालन केले.