पुणे –
कला, संस्कृती, गायन, वादन, भजन, नृत्य, संगीत यांचा मनोहारी संगम असणारा पुणे नवरात्रौ महोत्सव यंदा ३१वे वर्ष दिमाखात साजरा होत आहे. सोमवार दि. २२ सप्टेंबर रोजी सायं. ४.३० वा. श्री. गणेश कला क्रीडा रंगमंच येथे महाराष्ट्राचे महसूलमंत्री मा. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते महोत्सवाचे भव्य उद्घाटन होणार आहे.
या प्रसंगी केंद्रीय नागरी हवाई उड्डाण व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, ज्येष्ठ गांधीवादी व माजी आमदार उल्हास पवार, राज्याच्या नागरी विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, खा. मेधा कुलकर्णी, आ. डॉ. विश्वजीत कदम, भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे, माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे, मनपा आयुक्त नवल किशोर राम, पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार, अप्पर पोलीस आयुक्त संजय पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
उद्घाटनाचे खास आकर्षण
या उद्घाटन सोहळ्यात मराठी सिनेतारका भार्गवी चिरमुले, तेजा देवकर, सानिया चौधरी, शितल अहिरराव, राधा सागर, सिया पाटील, ऋजुता जुन्नरकर, अमृता धोंगडे व वैष्णवी पाटील यांची उपस्थिती खास ठरणार आहे. महोत्सवातील सर्व कार्यक्रम रसिकांसाठी विनामूल्य असतील, अशी माहिती आयोजक अध्यक्ष आबा बागुल यांनी दिली.
महर्षी – लक्ष्मीमाता जीवनगौरव पुरस्कार वितरण
दरवर्षी दिला जाणारा महर्षी पुरस्कार यंदा भटक्या व विमुक्त समाजातील मुलांच्या शिक्षणासाठी अविरत कार्य करणारे समाजसेवक पद्मश्री गिरीश प्रभुणे यांना जाहीर करण्यात आला आहे. तसेच लक्ष्मीमाता जीवनगौरव पुरस्कार डॉ. पराग काळकर, डॉ. शैलेंद्र देवळाणकर, डॉ. मेघा पुरव सामंत, शिरीष देशपांडे आणि प्रमिला लोदगेकर यांना प्रदान करण्यात येणार आहे. याशिवाय डॉ. मयूर कर्डिले व डॉ. अरविंद खोमणे यांचाही विशेष सन्मान केला जाणार आहे.
सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी
उद्घाटन सोहळ्यात सितार, व्हायोलिन, बासरी व तबल्याची जुगलबंदी असलेला ‘आनंद तरंग’ कार्यक्रम, पं. शमा भाटे यांचा कथ्थक नृत्याविष्कार, तसेच ‘जागर शक्ती पिठांचा’ देवीचा गोंधळ हे कार्यक्रम रंगणार आहेत. मराठी सिनेतारकांचा ‘जल्लोष’ हा नृत्याविष्कार उद्घाटनाचे खास आकर्षण ठरेल.
यानंतर सलग ११ दिवस महोत्सवात दररोज संध्याकाळी ७ वाजता विविध सांस्कृतिक कार्यक्रम होतील. त्यामध्ये ‘नाईनटीज मेलडी’, ‘इश्क सुफियाना’, ‘स्वर साम्राज्ञीयाँ’, ‘म्युझिकल मास्टर्स’, ‘अस्मिता महाराष्ट्राची’, तसेच रसिकांच्या आकर्षणाचा ‘लावणी महोत्सव’ आणि सांगता सोहळ्यातील ‘सोलफुल किशोर कुमार’ यांचा समावेश आहे.