पिंपरी :- साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे प्रबोधन पर्वानिमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात समाज परिवर्तनाचा संदेश देणाऱ्या अण्णाभाऊंच्या कार्याचा गौरव करत पारंपरिक लोककलांचा अनोखा कार्यक्रम सादर करण्यात आला.

या कार्यक्रमास जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष बाबासाहेब रसाळ,सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब आडागळे, संदीपान झोंबाडे, नाना कसबे,संजय ससाणे,अरूण जोगदंड,सतिश भवाळ,नितीन घोलप,युवराज दाखले,भगवान भगवान शिंदे,आशाताई शहाणे,केसरताई लांडगे, चंद्रकांत लोंढे ,डी.पी.खंडाळे, आण्णा कसबे,शिवाजी साळवे,विशाल कसबे,शांताराम खुडे,यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जगद्गुरू तुकाराम महाराज,छत्रपती शिवाजी महाराज,त्यांचे मावळे आणि लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या हुबेहूब सादर केलेल्या व्यक्तिरेखा..
विठ्ठल रखुमाई दिंडी भजन मंडळ, तालुका मालवण, जिल्हा सिंधुदुर्ग यांच्या ६५ कलाकारांच्या भव्य दिंडी महोत्सवाने तसेच पारंपरिक वेशभूषा, टाळ-मृदुंगाचा गजर, भक्तीमय अभंग आणि उत्स्फूर्त जयघोष यामुळे संपूर्ण परिसर विठ्ठलमय झाला होता. भगव्या पताकांच्या लहरी आणि भजनांच्या सुरांनी वातावरण भारावून गेले होते तर विठू माऊली,जगद्गुरू तुकाराम महाराज,छत्रपती शिवाजी महाराज,त्यांचे मावळे आणि लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या हुबेहूब सादर केलेल्या व्यक्तिरेखा श्रोत्यांनी मोबाईलमध्ये काढून घेतल्या.
त्यानंतर संध्याकाळी ७ वाजता रंगला "लोकगीतांचा भव्य कार्यक्रम". या सत्रात नृत्य कलाकार आरती पुणेकर आणि त्यांच्या सहकार्यांनी आपल्या बहारदार सादरीकरणाने प्रेक्षकांची मने जिंकली. पारंपरिक मराठी लोकगीतांच्या माध्यमातून त्यांनी स्त्रीजीवन, श्रमसंस्कृती,आणि ग्रामीण भावभावनांचे सुंदर दर्शन घडवले. त्यांच्या लोकगीतातील सहजता आणि रसिकांशी जोडलेली नाळ यामुळे कार्यक्रमात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
कार्यक्रमाची सांगता प्रसिद्ध गायक मिठू पवार यांच्या कार्यक्रमातून झाली. "मराठी साज हा कलेचा बाज" याचे जिवंत दर्शन घडवत भावगीते, चित्रपट गीते आणि सुफी छटांची गाणी प्रेक्षकांना एका वेगळ्याच भावविश्वात घेऊन गेली. त्यांचा अलौकीक स्वर, बोलक्या भावनांची मांडणी आणि दर्जेदार सादरीकरण यामुळे सभागृहातील रसिक मंत्रमुग्ध झाले होते.
या कार्यक्रमांतून अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांची, समाजाभिमुखतेची आणि लोककलांशी असलेल्या नात्याची उजळणी झाली. त्यांच्या कार्याची प्रेरणा आजही नव्या पिढीला मार्गदर्शक ठरते, हे या सांस्कृतिक सादरीकरणातून स्पष्ट झाले.