पिंपरी, – : स्वच्छ भारत मिशन अंतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या पुढाकाराने शहरात रीड्यूस – रीयुज – रिसायकल (आर.आर.आर ) सेंटर सुरू करण्यात आले आहेत. मोरवाडी येथील कापसे उद्यानातील आर.आर.आर. सेंटरला महापालिकेचे उपायुक्त सचिन पवार यांनी भेट देऊन उपक्रमाचा सविस्तर आढावा घेतला.
शहरातील आठही प्रभागांत उभारण्यात आलेल्या या केंद्रांमधून नागरिकांकडून घरात पडून असलेल्या पण अजूनही उपयोगी वस्तू संकलित केल्या जात आहेत. त्यानंतर या वस्तू गरजूंपर्यंत मोफत पोहोचवल्या जातात. या उपक्रमामुळे शहरातील कचऱ्याचे प्रमाण कमी होत असून गरजूंना उपयुक्त साहित्य सहज उपलब्ध होत आहे.

“घरातील वापरण्यायोग्य वस्तू कचऱ्यात न टाकता जर या केंद्रांवर आणल्या, तर त्या इतरांना उपयोगी पडू शकतात. हे पर्यावरण संवर्धनासह सामाजिक जाणीवेचेही काम आहे. त्यामुळे नागरिकांनी आर.आर.आर. उपक्रमात सक्रीय सहभाग नोंदवावा,” असे आवाहन उपायुक्त सचिन पवार यांनी यावेळी केले.
महापालिका आयुक्त व प्रशासक शेखर सिंह आणि अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली व उपायुक्त सचिन पवार यांच्या अधिपत्याखाली हा उपक्रम राबवला जात आहे. संकलित साहित्याचे प्रथम विलगीकरण करून त्यातील उपयुक्त वस्तू गरजूंना मोफत दिल्या जातात, तर उर्वरित वस्तू रिसायकल प्रक्रियेद्वारे नव्या स्वरूपात आणल्या जातात.

यावेळी “अ” क्षेत्रीय सहाय्यक आरोग्य अधिकारी राजू साबळे, मुख्य आरोग्य निरीक्षक दत्तात्रय गणगे, आरोग्य निरीक्षक स्नेहा चांदणे, ओंजळ संस्थेचे पदाधिकारी व अन्य कर्मचारी आदी उपस्थित होते.
चौकट:
नागरिक आर.आर.आर. सेंटरवर खालील वस्तू जमा करू शकतात :
पुस्तके, वह्या, शालेय साहित्य, चांगल्या स्थितीतील कपडे, चादरी, पडदे, खेळणी, शैक्षणिक साधने, घरगुती साहित्य, भांडी, फर्निचर, छोटे-मोठे इलेक्ट्रॉनिक उपकरणे, चपला तसेच पुनर्वापर करता येणाऱ्या इतर वस्तू