हिवाळी अधिवेशनाची सुरुवात येत्या सोमवारपासून नागपूर येथे होत असून, यंदाच्या अधिवेशनात पिंपरी-चिंचवडचा मुद्देसूद आणि प्रभावी आवाज दणदणून ऐकू येणार आहे. शहराचे युवा, तरुण, अभ्यासू आणि सुशिक्षित नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे आमदार अमित गोरखे हे पिंपरी-चिंचवडसह संपूर्ण महाराष्ट्रातील महत्त्वाचे प्रश्न जसे अनुसूचित जाती आरक्षणात उपवर्गीकरण, ग्रामीण भागातील स्मशानभूमीचा ज्वलंत सामाजिक प्रश्न प्रभावीपणे उपस्थित करणार आहेत.
पावसाळी अधिवेशनात त्यांच्या कामगिरीने राज्य विधानपरिषदेत वेगळी छाप उमटवली होती. शहरातील शासकीय कर्मचारी, महापालिका, तसेच YCM रुग्णालयातील सुविधांचा अभाव, प्रलंबित योजनांची अंमलबजावणी, शैक्षणिक व सामाजिक प्रश्न, आरोग्यविषयक अडचणी, महिला सुरक्षेचे मुद्दे, क्रीडाविकास, तसेच युवांसाठी आवश्यक असलेली भविष्योन्मुख युवा धोरण असे अनेक ज्वलंत विषय त्यांनी मागील अधिवेशनात भक्कमपणे मांडले होते.
या हिवाळी अधिवेशनातही आमदार अमित गोरखे शहरातील विविध प्रश्न, लोकांच्या अपेक्षा आणि विकासाच्या मागण्या स्पष्टपणे मांडणार आहेत. विशेषतः युवांसाठी आवश्यक असलेल्या सुविधा, प्रशिक्षण, रोजगार, अनुसूचित जातीतील उपवर्गीकरण तसेच ग्रामीण भागातील अनुसूचित समाजातील स्मशानभूमीच्या ज्वलंत समस्या याबाबत धोरणात्मक निर्णय आणि सरकारी योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ते ठोस मुद्दे उपस्थित करणार असल्याची माहिती त्यांच्याकडून देण्यात आली आहे.
शहराच्या दीर्घकालीन विकासदृष्टीसाठी त्यांनी अलीकडेच मांडलेले PCMC Vision 2032 हे सर्वसमावेशक धोरणात्मक लेखन विशेष चर्चेत राहिले. पिंपरी-चिंचवडच्या पुढील दशकातील शहरी नियोजन, पायाभूत सुविधा, स्मार्ट सेवा, उद्योग वाढ, वाहतूक व्यवस्थापन, हरित शहर संकल्पना आणि युवांसाठीच्या संधी यांचा सखोल रोडमॅप या लेखातून मांडण्यात आला आहे. शहराच्या भविष्यकालीन दिशादर्शक मार्गदर्शिकेच्या रूपात Vision 2032 ने सर्व स्तरांवर चर्चेला उधाण आणले होते, ज्यामुळे आमदार गोरखेंचे कामकाज अधिक ठळकपणे पुढे आले.
पिंपरी-चिंचवडच्या विकासाला गती देणे, सर्वसामान्यांच्या अडचणी सरकारपर्यंत पोहोचवणे आणि शहराचा आवाज ठामपणे मांडणे या भूमिकेतून आमदार गोरखे हिवाळी अधिवेशनातही लक्षवेधी ठरणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


