14.1 C
New Delhi
Saturday, December 20, 2025
Homeमहाराष्ट्रमहापालिका निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज

महापालिका निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज

खर्च, आचारसंहिता व परवानग्यांबाबत पक्षांना स्पष्ट मार्गदर्शन

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ च्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रक्रिया निर्भय, पारदर्शक आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी महापालिका प्रशासन पूर्णतः सज्ज झाले आहे. या प्रक्रियेत राजकीय पक्षांची भूमिका महत्त्वाची असून, आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करणे सर्वांचे कर्तव्य आहे, असे आवाहन आयुक्त तथा निवडणूक अधिकारी श्रावण हर्डीकर यांनी केले.

पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीतील दिवंगत महापौर मधुकरराव पवळे सभागृहात आयोजित राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीत निवडणूक प्रक्रियेतील तांत्रिक, कायदेशीर आणि प्रशासकीय बाबींबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.

या वेळी अतिरिक्त पोलीस आयुक्त सारंग आव्हाड, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटेविक्रांत बगाडे, मुख्य लेखा परीक्षक प्रमोद भोसले, निवडणूक विभागाचे उपायुक्त सचिन पवार, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी विजय बोरूडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनसंपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, तसेच पोलीस उपायुक्त प्रदीप जाधव आणि विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते.

निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांची माहिती

निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयनिहाय कार्यान्वित करण्यात आलेल्या निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांची माहिती राजकीय पक्षांना देण्यात आली. अर्ज छाननी, हरकती नोंदवणे तसेच दैनंदिन निवडणूक कामकाजासाठी या कार्यालयांशी कसा संपर्क साधावा, याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. उमेदवारांना कोणत्याही तांत्रिक अडचणी येऊ नयेत, यासाठी सर्व आवश्यक व्यवस्था पूर्ण असल्याचे आयुक्त हर्डीकर यांनी स्पष्ट केले.

आचारसंहितेचे उल्लंघन टाळण्याचे आवाहन

अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी आचारसंहिता काळात कोणत्याही प्रकारचे प्रलोभन, सामाजिक तेढ निर्माण करणारी वक्तव्ये किंवा सार्वजनिक मालमत्तेचे विद्रुपीकरण टाळण्याचे आवाहन केले. आचारसंहितेचा भंग झाल्यास कडक कायदेशीर कारवाई होऊ शकते, असा इशाराही त्यांनी दिला. प्रचार सभा आणि रॅलींचे आयोजन नियमांच्या चौकटीतच करावे, जेणेकरून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

उमेदवारी अर्ज भरण्याबाबत सूचना

नामनिर्देशन पत्रे दाखल करताना उमेदवारांनी विहित नमुन्यातच सर्व माहिती सादर करावी आणि कोणतीही चूक होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशा सूचना देण्यात आल्या. शेवटच्या दिवसाची वाट न पाहता वेळेत अर्ज सादर करावेत, जेणेकरून तांत्रिक कारणांमुळे अर्ज बाद होणार नाहीत. शपथपत्रामध्ये मालमत्ता, गुन्हेगारी पार्श्वभूमी, शैक्षणिक पात्रता आणि देणी याबाबत संपूर्ण व अचूक माहिती भरणे बंधनकारक असून, चुकीची किंवा अपूर्ण माहिती आढळल्यास उमेदवारी रद्द होऊ शकते.

मतदान टक्केवारी वाढवण्यावर भर

लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी मतदानाची टक्केवारी वाढवणे हे प्रशासनाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. यासाठी राजकीय पक्षांनी मतदारांमध्ये जनजागृती करावी, विशेषतः ‘नैतिक मतदान’ आणि ‘बहुसदस्यीय मतदान’ पद्धतीबाबत माहिती द्यावी. महापालिकेच्या वतीने ‘स्वीप’ (SVEEP) कार्यक्रमांतर्गत व्यापक जनजागृती मोहीम राबविली जात असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

‘एक खिडकी’ प्रणालीद्वारे परवानग्या

निवडणूक प्रचारासाठी आवश्यक असलेल्या वाहन परवाने, सभांची परवानगी आणि नाहरकत दाखले मिळविण्यासाठी महापालिका व पोलीस आयुक्तालयाच्या वतीने ‘एक खिडकी योजना’ कार्यान्वित करण्यात आली आहे. अनेक सेवा ऑनलाईन उपलब्ध असल्याने उमेदवारांना विविध कार्यालयांच्या फेऱ्या माराव्या लागणार नाहीत. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करूनच प्रचार करावा, असे आवाहन करण्यात आले.

निवडणूक खर्चावर कडक नियंत्रण

राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार निवडणूक खर्चाची अचूक नोंद ठेवणे अनिवार्य आहे. खर्चाची मर्यादा ओलांडल्यास किंवा हिशोबात तफावत आढळल्यास उमेदवारावर अपात्रतेची कारवाई होऊ शकते, असे प्रशासनाने स्पष्ट केले.

मतमोजणी प्रक्रिया पारदर्शक

मतमोजणी केंद्रांवरील प्रतिनिधींची नियुक्ती, ओळखपत्रे आणि प्रवेश नियमांबाबतही स्पष्ट माहिती देण्यात आली. मतमोजणी प्रक्रिया पारदर्शक ठेवण्यासाठी सीसीटीव्ही व सुरक्षा व्यवस्थेचे काटेकोर नियोजन करण्यात आल्याची माहिती निवडणूक विभागाचे उपायुक्त सचिन पवार यांनी दिली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
fog
14.1 ° C
14.1 °
14.1 °
82 %
3.1kmh
77 %
Sat
24 °
Sun
24 °
Mon
26 °
Tue
27 °
Wed
24 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!